स्मार्ट पुण्याच्या निर्मितीत स्मार्ट नागरिक म्हणून माझी भूमिका
- सागर नवनाथ ननावरे
"कितीही फिरू द्या दुनिया सारी
आमच्या पुण्याची गोष्टच न्यारी "
खरं तर 'पुणे तिथे काय उणे',विद्येचे माहेरघर, 'सांस्कृतिक शहर'असे पुण्याची ओळख सांगणारे शब्द ऐकले कि उर कसा अभिमानाने फुलून येतो. मनात आपण पुण्यासारख्या मराठमोळ्या शहराचा नागरिक असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. काही दिवसांपूर्वी शासनाने नियोजित स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पुण्याची निवड केली काय आणि माझ्यातला 'स्मार्ट नागरिक' आपोआपच जागा झाला. एक कर्तव्यदक्ष आणि सजग नागरिक म्हणून माझं अंतर्मन मला क्षणोक्षणी, जागोजागी कृतीद्वारे मिरवायला लागलं. माझ्या पुण्याच्या स्मार्टनेस साठी एक स्मार्ट नागरिक म्हणून माझी भूमिका काय असावी याची चक्रे डोक्यात वेगाने फिरू लागली. माझी स्वप्ने हि स्मार्ट पुण्यासाठी स्मार्ट झाली.मनात मी माझ्या भावी स्मार्ट पुण्याच्या कल्पनांना उजाळा द्यायला लागलो.
माझ्याप्रमाणेच माझ्या मित्रपरिवाराचीही काहीशी अवस्था झाली होती आणि पुण्यातल्या पुण्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांचीही तीच अवस्था असणार याची पूर्ण खात्री होती.
म्हणून स्मार्ट पुण्यासाठी स्मार्ट आणि कर्तव्यदक्ष नागरिकांची एक मोठी संघटना उभी करण्याचा मी प्रथम प्रयत्न करेल. कारण या संघटनेच्या माध्यमातून एक चळवळ उभी राहील आणि लोकसहभागानेच स्मार्ट पुण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. अशा लोकांच्या एकीसाठी मी सोशल मिडिया, जनजागृती,प्रबोधनपर तसेच मनोरंजनाच्या साधनांमार्फत प्रयत्न करेल आणि एक स्मार्ट नागरिक म्हणून संघटनेच्या आणि लोकसहभागाच्या माध्यमातून कार्यास प्रारंभ करेल.
“मी पुण्याचा स्मार्ट नागरिक अन पुणे माझी शान
स्वतःपासून करुनी सुरुवात जागवू पुणेरी स्वाभिमान”
स्मार्ट पुण्यासाठी मी माझ्या कल्पक मनाने आखलेल्या 'स्मार्ट पंचतंत्र' अंमलात आणेन. आणि ती पंचतंत्री किंवा पंचसूत्री म्हणजेच…
1) सुरक्षित पुणे ( सुरक्षित)
२) हरित पुणे- संमृद्ध पुणे (पर्यावरण पोषक)
३) ऐतिहासिक-सांस्कृतिक पुणे
४) डिजिटल पुणे ( आधुनिक व तंत्रज्ञानयुक्त )
५) सुंदर पुणे ( स्व्च्छ, शिस्तप्रिय व नीटनेटके )
गेली अनेक दशके सुरक्षित शहर म्हणून प्रसिध्द असणार्या पुण्याला बॉम्बस्फोट,चोरी, गुन्हेगारी,दहशत आणि दुर्घटना यांनी ग्रहण लावले आहे. म्हणूनच आपल्या शहरात महत्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत यासाठी आम्ही आग्रही असू. तसेच याव्यतिरिक्त आपल्या परिसराच्या किंवा सोसायटीच्या सुरक्षिततेसाठी संबधित सोसायट्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशी जनजागृतीही करू. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीसाठी काही टक्के रक्कम शासनाकडूनही मंजूर करून आणण्यासाठी पाठपुरावा करता येईल. त्याचप्रमाणे गुन्हेगारांचे धाबे दणाणावेत यासाठी Fight Against Crime नामक सुजान नागरिकांची व सुशिक्षित तरुणांची एक शासनमान्य संघटना कार्यरत करता येईल. तसेच या संघटनेच्या माध्यमातून गुन्हेगारी क्षेत्रात प्रबोधनात्मक उपाय करण्यासाठी प्रबोधन संस्थांचाही यात सहभाग करून घेऊ. त्यामुळे माझ्या शहरातील सर्व नागरिक भयमुक्त संचार करू शकतील . पर्यटकांनाही पुण्यात एक कमालीची सुरक्षितता जाणवेल त्यातून आर्थिक व औद्योगिक उलाढालींना चालना मिळेल. थोडक्यात स्मार्ट सिटी अगोदर पुणे हि सेफ सिटी व्हावी यासाठी मी नेहमीच प्रयत्न करेल.
सुरक्षिततेनंतर माझी सिटी हि समृद्ध म्हणजेच हरित असावी यासाठी मी आग्रही असेल. वृक्षतोड पूर्णपणे बंद व्हावी यासाठी वृक्षांचेही वर्गीकरण करून त्यास एक ठराविक मुल्य देता येईल व वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई म्हणून तेवढी रक्कम व दंडही करण्यात यावा अशी उपाययोजना करता येईल.
शहरात वाढदिवशी फ्लेक्स लावून शहर खराब करण्यापेक्षा " वाढदिवस हा झाडदिवस " हि संकल्पना राबवता येईल. प्रत्येक वाढदिवसाला आठवण म्हणून एकतरी झाड लावायचे आणि त्याचे संवर्धन नियमितपणे करायचे अशाप्रकारची हि संकल्पना असेल. यात शहरातील डोंगर,ओसाड जागा, गड किल्ले, बगीचे आणि रस्त्यांच्या दुतर्फा असणार्या पडीक जागेचाही विनियोग करू. त्याचप्रमाणे देवाज्ञेने आपल्याला सोडून जाणाऱ्याअप्तेष्टांसाठी व आपल्यांसाठी त्यांची आठवण म्हणून एक तरी झाड लावायचे आणि त्या जणू व्यक्तीची काळजी घेतो त्याप्रमाणे त्या झाडाचीही काळजी घेत येईल. हि संकल्पना जनमानसात " स्मृतीवन एक पुनरुज्जीवन " हि संकल्पना त्या व्यक्तीच्या स्मृती त्या झाडाच्या रूपाने जणू पुनर्जीवित झाल्याची साक्ष देतील. त्यामुळे शहराला मोठा ऑक्सिजनचा साठ उपलब्ध होईल व लोकांचे आरोग्यही निरोगी राहील. वृक्षांची मोठ्या प्रमाणात होणारी लागवड नक्कीच प्रदूषणाला आळा घालेल. स्मार्ट शहरात प्रदूषण व वाहतुकीच्या समस्येवर प्रभावी उपाय म्हणजे सायकलचा अधिकाधिक वापर. सायकल वापरासाठी लोकांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी ' सगळ्यात भारी
सायकल सवारी '
अशी महीम सुरु करता येईल व विविध क्षेत्रातील सेलेब्रिटींच्या सहकार्याने हि मोहीम अधिक प्रभावी करता येईल. ध्वनी,जल आणि वायू प्रदूषणावर कायमस्वरूपी व प्रभावी उपाययोजना करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली काम करता येईल.
यानंतर पंचसुत्रीतील तिसरा आणि पुण्याच्या नावलौकिकात मनाचा तुरा रोवणारा घटक म्हणजेच सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचे जतन व विकास. छत्रपती शिवराय,संत महंत,स्वातंत्र्यसेनानी यांच्या धगधगत्या समर्पणाची साक्ष देणार्या पुण्याला एक ऐतिहासिक व सांस्कृतिक शहर म्हणून जगभरात मिरविण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहील. शनिवारवाडा,लालमहाल,सिंहगड व इतर प्रेक्षणीय स्थळे,बगीचे, संग्रहालये,शतकपुर्तीकडे वाटचाल करणार्या संस्था, कॉलेजेस अशा प्रत्येक वस्तूचे जतन करण्यासाठी " दिमाखदार पुणे आमचा अभिमान " या नवे एक जनचळवळ सुरु करू.
"संस्कृतीच्या वारशाची
साक्ष देतात गडकिल्ले
मौजमजेच्या नावावर नको
वास्तूंवर हल्ले"
म्हणूनच संस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता,त्यांचे जतन व त्यांच्या संवर्धनासाठी' पुण्यात इतिहासप्रेमी मित्रमंडळ' ची स्थापना कार्यात येईल. त्याचप्रमाणे या कार्यात तरुणाईचा व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा यासाठी शाळा व कॉलेजेसमध्ये प्रत्येक सहा महिन्यांतून एकदा वास्तू संवर्धनासाठी एक दिवसभर आपले कार्यरूपी योगदान देता यावे यासाठी कार्यशिक्षण किंवा अनैच्छिक ( सक्तीच्या ) प्रात्यक्षिकाचा समावेश करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
यानंतर आजच्या आधुनिक जगात आपली आधुनिकता सिध्द करण्यासाठीचे चौथे तंत्र म्हणजेच "डिजिटल पुणे".
डिजिटल पुणे हा पुण्याच्या विकासरथाचा गाभा ठरणारा घटक असणार आहे त्यामुळे सरकारी कामात लोकसहभाग वाढवण्यासाठीतसेच ते काम अधिक पारदर्शी बनवण्यासाठी ते अधिक लोकाभिमुख करण्यासाठी डिजिटल पुणे संकल्पना महत्वपूर्ण ठरणार आहे. यामाध्यमातून आयटी क्षेत्रातील मुरब्बी लोकांच्या सहाय्याने ई-एज्युकेशन, ई-हेल्थ, ई-साईन,नागरी इंटरनेट, ई-गव्हर्नन्स, डिजिटललॉकरची व्यवस्था, पेपरलेस कार्यालये आणि एकूणच जागतिक दर्जाचे डिजिटल तंत्रज्ञान अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करू. या संपूर्ण डीजीटलायझेशन संकल्पनेमुळे नागरिकांची शक्ती वेळ आणि पैशाची बचत तर होईलच परंतु सर्व कारभार पारदर्शक होऊन भ्रष्टाचारालाआळाही बसेल. डिजिटल पुण्यासाठी खास अॅप्स तयार करुन- त्यात डिजिटल पुणे पोर्टल, मायगोव्ह मोबाईल अॅप, चर्चा कृतीआणि वापर या तत्त्वांवर आधारित मोबाईल सेवा अॅपच्या माध्यमातून पुणेकरांना देउ. म्हणूनच मला एक सजग नागरिक म्हणूनलोकसहभागाच्या जोरावर डिजिटल पुणे या संकल्पनेच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानावर आधारित ताकदवान अर्थसत्ता म्हणूनपुण्याला नावलौकिक मिळवून द्यायचा आहे.
माझ्या दृष्टीने शेवटचे आणि महत्वाचे तंत्र म्हणजे सुंदर पुणे. यामध्ये केवळ पुणे शहर रंगरंगोटीने सुंदर नाही तर बेशिस्तपण,वाहतूक समस्या,अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण,फ्लेक्सबाजी,कचरा समस्या इ. गोष्टींवर उपाययोजना हि स्मार्त सिटीसाठी अत्यंत आवश्यक आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त नाही,नियमांचे पालन होताना दिसत नाही, वारंवार ट्रॅफिक जामहोत आहे त्यामुळे केवळ पूल बांधून, रस्ते दुरुस्तीने प्रश्न सुटणार नाहीत, तर प्रत्येकाने नियमाचे पालन केले तरच वाहतुकीची कोंडीफुटेल. यासाठी शिस्तीचे पालन न करणार्यांच्या गाड्या काही दिवसांसाठी जप्त करण्याची कारवाई सुरु करावी तसेच वारंवारबेशिस्तपणा करणार्यांसाठी लायसन्स जप्तीचे उपाय योजता येतील. फुटपाथवर फेरीवाले व व्यावसायिकांचे अतिक्रमण रोखले पाहिजेतसे केल्यास डायरेक्ट कैद करण्यासारखी उपाययोजना असायला हवी. गर्दीच्या रस्त्यांत ‘नो व्हेइकल झोन हवा,खासगी रिक्षा, अवैधरिक्षाचालकांना एक मार्ग हवा,पादचार्यांसाठी भूमिगत रस्ते असावेत,पार्किंग योग्य जागी असावी तसेच डिव्हायडरची जागा कमी करूनरस्ता रुंदीकरण हवे या सर्वांमुळे शहरात सुटसुटीतपणा दिसून येईल आणि त्यादृष्टीने आम्ही पयत्न करू.
कचरा समस्येसारख्या महत्वाच्या समस्येसाठी टाकाऊ ते टिकाऊ ,घनकचरा प्रक्रिया पद्धती,शास्त्रीय जमीनभराव पद्धती,सेंद्रीय खतनिर्मिती तसेच पूर्ण ज्वलन पद्धती यांचा कचर्याच्या वर्गीकरणाप्रमाणे उपाययोजना करता येईल त्यासाठी महापालिकेच्या मदतीनेकचरा विल्हेवाट मोहीम फत्ते करू शकतो. तसेच शहराला फ्लेक्सनी खराब करणार्यांच्या फोटोला त्वरित काढून संबंधीतांवर पोलिसांच्यामदतीने कारवाई करता येईल.
खरं तर शहरासमोर इतरही अनेक समस्या आहेत आणि स्मार्ट सिटीसाठी विविध गोष्टींची अंमलबजावणीही करता येईल पण माझ्या मते या पंचसूत्रीचा जर पुण्यातील प्रत्येक नागरिकाने अंगीकार केला आणि स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट नागरिक म्हणून स्वतः पासून सुरुवात केली तर आपण आपली सिटी नक्कीच स्मार्ट बनवू शकतो.
“ पुण्याच्या भविष्यासाठी
जबाबदारीने वागलं पाहिजे
स्मार्ट पुणे तर होणारच आहे
आता स्मार्ट म्हणून जगलं पाहिजे “
लेखन आणि संकल्पना :
सागर नवनाथ ननावरे