Friday, 20 November 2015

                                                                     एक पत्र देशासाठी...
कर्नल संतोष  महाडिक,.............
प्रथमत आपणाला आणि आपल्या शौर्याला माझा सलाम.
आपल्या शौर्याची दाद प्रत्यक्षात भेटून देता येणार नाही हे आमचे दुर्भाग्य. म्हणूनच एक पत्र लिहितोय जे कदाचित आपणापर्यंत पोहोचणारही नाही, तरीही लिहितोय.
कर्नलजी आपल्या असामान्य जिद्दिबद्दल आपले आभार मानायचे होते.
आमच्या सारखी सामान्य माणसं एवढं तरी नक्कीच करू शकतात .एकिकडे दिवाळीचा जल्लोष तर  दुसरीकडे असहिष्णुता, निवडणुका,तुरडाळ,स्मारक यांच्या वादात आम्ही इतके तल्लीन होतो कि आम्हाला याचा विसरच पडला हो कि,तुम्हाला पण दिवाळी असेलच ना? तुमचीही दोन पिल्लं आतुरतेने वाट पाहत असतीलच ना? पण नाही राष्ट्रभक्ती आणि जबाबदारीच्या मनगटाने हातात देशाच्या रक्षणासाठी बंदूकरुपी कंदील घेतले. कदाचित आम्ही नावाने आणि शरीराने जरी मोठे झालो असलो तरी आमची वैचारिक वाढ नक्कीच खुंटलीय. कोणाला काहीच फरक पड़त नाही. आमचं रुटीन  ऑफिस, आमचा व्यवसाय, आमच्या राजकीय कुरघोड्या आणि  चिखलफेक, आमची जातीय समीकरण, आमच्या ओल्या-सुक्या पार्ट्या या काही थांबणार नाहीत. एवढंच काय, आमच्या वॉटसच्या या अतिव्यस्त जीवनात  दोन मिनिट थांबुन तुमच्यासाठी दोन अश्रुंची श्रद्धांजली दयायलाही वेळ मिळेल कि नाही याची शंकाच आहे. पण  फरक पडेल तुमच्या घरच्यांना, ज्यांनी काळजावर  दगड ठेऊन तुम्हाला देशासाठी...आमच्यासाठी... सरहद्दीवर जाऊ दिलं. फरक पडेल तुमच्या अर्धांगिनीला, तुमची सर्वांत जास्त आठवण येईल त्या दोन निरागस पिल्लांना. बाकी सर्व आपल्या आपल्या खुज्या आणि फाटक्या दुनियेत मश्गुल राहतील. हे सर्व सत्य आपल्याला माहीत असताना देखील आपण आमच्यासाठी प्राणाहुती दिलीत.
सलाम तुमच्या त्यागाला,जिद्दीला,राष्ट्रभक्तीला आणि  सलाम तुमच्या माता-पित्यांना ज्यांनी असा पुत्र घडविला, सलाम तुमच्या सारख्या तमाम जवानांना.
शहीद कर्नल महाडिक अमर रहे...!

लेखन आणि संकल्पना  : सागर ननावरे
संकलन: sagarnanaware.blogspot.in

0 comments:

Post a Comment

 
;