Friday, 10 June 2016

सकारात्मक दृष्टीकोन

                                                   सकारात्मक दृष्टीकोन


एक गावात दोन साधु राहत होते. सकाळी उठून मंदिरात पूजा अर्चा करायचे आणि मग दिवसभर भिक्षा मागायचे आणि रात्रि मंदिरा शेजारीच झोपडीत रहायचे. एक दिवस गावात जोराचे वादळ आले आणि त्यानंतर लगेचच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा जोर इतका होता कि त्यात अनेक झाडे,प्राणी आणि अक्षरश मोठमोठे दगडही वाहून गेले. सायंकाळी दोघे साधू आपल्या झोपडीजवळ आले असता पाहतात तर काय त्यांची अर्धी झोपडी तुटलेली होती. केवळ वरचे छत मात्र तसेच शिल्लक होते. तुटलेली झोपडी पाहताच पहिला साधू कमालीचा क्रोधीत झाला आणि मंदिरातील देवाकडे पाहून बडबडू लागला,' अरे परमेश्वरा मी नेहमी मनोभावे तुझी पूजा अर्चा करूनही तू नेहमीच माझ्याशी अन्याय करतोस?

दिवसभर मुखात तुझे नाव घेऊनही तू माझी झोपडी तोडलीस आणि कधीही तुझ्या दाराशी न येणाऱ्या पापी मनाच्या माणसांच्या घराला धक्का देखील लागला नाही. तू क्रूर आहेस आम्ही तुझी भक्ती करतो पण तू आमच्यावर दया कधीच करत नाहीस.

तितक्यात दुसरा साधू आला झोपडीकडे पाहून आनंदाने नाचू लागला आणि उदगारला ,"हे परमेश्वरा मला आज चांगलीच खात्री पटली कि तू आमच्यावर किती प्रेम करतोस ते! कारण तू आमची अर्धी झोपडी वाचावलीस अशा भर पावसात तर झोपड्या पूर्ण उध्वस्त होऊन जातात पण तुझी खरंच कृपा आहे कि आज आमच्या डोक्यावर निदान छत तरी आहे. आता मी उद्यापासून आणखी जोमाने तुझ्या भक्तीत स्वतः ला वाहून घेणार, खूप खूप धन्यवाद परमेश्वरा! दुसरा साधू या उद्गारांनी निरुत्तरित झाला आणि फक्त अवाक होऊन आपल्या साधू मित्राला न्याहाळत राहिला.

मित्रांनो एक घटना आणि एकसारखेच दोन लोक परंतु दृष्टीकोन हे त्यांच्यातील वेगळेपण ठरतं. एकाने त्या घटनेच्या दुखात स्वतःला इतके खोलवर नेलं कि त्याने इतरांना दोष द्यायला सुरुवात केली, परंतु दुसर्याने त्या घटनेकडे चांगल्या नजरेने पाहिले आणि त्या घटनेबद्दल इतरांचे आभारही व्यक्त केले.

या दोघांत दुसरा साधू इथे सर्वश्रेष्ठ व सर्वांत आनंदी ठरला तो फक्त आणि फक्त त्याच्यात असणार्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे.  आपला दृष्टीकोन आपल्या भविष्याची जडणघडण ठरवत असतो म्हणूनच आपले भविष्य त्याचवेळी बदलेल जेभा आपला आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. जर आपला दृष्टीकोन पहिल्या साधू सारखा संकुचित राहिला तर आपल्याला प्रत्येक  संकट आकाशाएवढे  दिसेल मात्र जर आपण आपला दृष्टीकोन दुसर्या साधूसारखा सकारात्मक ठेवला तर मात्र आपल्याला प्रत्येक संकटात संधी दिसेल.

सकारात्मक विचार करण्याच्या सवयीत आपलं आयुष्य बदलून टाकायचं सामर्थ्य असतं. बसस्थानकावर बसची वाट पाहत असताना येणाऱ्या बसला ठरलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशीर झाला तर तिला नक्‍की अपघात झालेला असणार किंवा ती कुठेतरी बंद पडली असणार असे नकारात्मक विचार माणसाला आयुष्यात कधीच सुखी ठेवत नाहीत.

'दी सिक्रेट' ची लेखिका रॉन्डा बर्न सकारात्मकते विषयी सांगते कि, "आशावादी माणसे आजारी पडल्यावरही रुटीन जीवनाशी जोडलेली असतात. आपल्याला कुठला तरी आजार आहे आणि त्याचाच रात्रंदिवस यावरच विचार करता आहात , तुमच्या भेटीला येणार्‍या लोकांशीही याच विषयांवर बोलता आहात तर मग खात्रीने समजा की, तुम्ही या आजाराच्या अधिक कोषिका निर्माण करता आहात. दिवसभर स्वतःलाच शंभरदा म्हणा, मी सुखी, समाधानी आहे. फिट आहे. मला मस्त वाटते आहे. असे म्हणून स्वतःला ऊर्जा द्या. आणि सामान्य जीवनाशी एकरुप व्हा."

असं म्हणतात नजर ' बदलो, नजारा बदलेगा' एखाद्या प्रसंगाकडे,व्यक्तीकडे किंवा परिस्थितीकडे पाहताना आपली नजर. आपले विचार म्हणजेच आपला दृष्टीकोन जर सकारात्मक असेल तर काहीतरी
सकारात्मक बदलच आपल्या दृष्टीस येतो.

याउलट बसच्या जागी आपले कोणी असेल तर....? बर्याचदा आपल्यांची काळजी असते म्हणून मनात असे विचार येणे स्वाभाविक आहे परंतु हाच दृष्टीकोन जे बदलतात ते आयुष्यात नेहमीच सुखी राहतात.

आपल्या आजूबाजूला घडणार्‍या प्रतिकूल घटनांवर, समस्यांवर आपले नियंत्रण असतेच असे नाही. परंतु नेहमी आपले विचार सकारात्मक ठेवल्याने मात्र चांगले अनुभव वाट्याला येतात. आपल्या आयुष्यातील नव्वद टक्के समस्या आपल्या नकारात्मक विचारसरणीमुळे उत्पन्न होतात. फक्त दहा टक्के समस्या खरोखर समस्या असतात. वाईट अनुभव तत्काळ नष्ट होतीलच असे नाही मात्र  वाईट घटनांना अनुभवाच्या नजरेतून पाहिल्यास बरंच काही शिकायला मिळतं आणि त्यातूनच  वाईट भावनांची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

आपण नकारात्मक विचार मनात कधीच आणू नयेत कारण अनेकदा त्यांच्यावर आपण नियंत्रणच ठेवू शकत नाही आणि भरकटत जातो. त्यापेक्षा आपली उर्जा सकारात्मक गोष्टींचा विचार करण्यात वापरल्यास मात्र आपल्याला प्रफुल्लीत वाटते.

नकारात्मक विचार किती करायचे हे शेवटी आपल्यावरच अवलंबून असतं म्हणूनच शक्यतो टाळायच असतं.स्वत :ला किती सिरिअसली घ्यायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं




लेखक 
सागर नवनाथ ननावरे 

0 comments:

Post a Comment

 
;