Monday, 4 July 2016

वारी : एक सक्सेस गुरु

                     वारी : एक सक्सेस गुरु
                         वारी : एक सक्सेस गुरु


पाऊले चालती पंढरीची वाट......
आषाढ सुरु झाला की पावसाळ्यात पालख्यांचे वेध लागतात. आषाढी एकादशी साठी  पंढरीची  वारी हे तमाम वारकर्‍याचं आणि भक्तांचं व्रत मानलं जातं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक लोकजीवनाचा संपन्न असा वारसा आहे. 
दरवर्षी येणारी पंढरीची वारी ही तमाम भक्तगणांना पराकोटीचा आनंद तर देतेच त्याचबरोबर ही वारी  यशासाठी झटणाऱ्या प्रत्येकाला एक प्रेरणाही देते. ही पंढरीची वारी ही एक सक्सेस गुरु म्हणून आपल्या  प्रत्येकाला जणू  एक अनोखा संदेशच देत असते. 
खालील मुद्द्यांच्या आधारे ही वारी आपल्या आयुष्यातील यशाबद्दलची गणिते कशी ठरविते हे आपल्या लक्षात येईल. 
१. ध्येय निश्चिती :
पंढरीच्या वारीतील प्रत्येकाने एक ध्येय आखलेले असते आणि ते ध्येय म्हणजे विठोबाचरणी नतमस्तक व्हायचे. यात प्रत्येक वारकरी हा वारीच्या माध्यमातून एकादशीला विठोबा चरणी मस्तक ठेवण्याचे ध्येय साकार करीत असतो. 
२. शिस्तबद्धपणा व एकी  :
 ध्येयाच्या  दिशेने धावणाऱ्या या वारकऱ्यांच्या कमालीची शिस्तबद्धता आपल्याला आढळून येते. यात हरिनामाचा गजर करत लाखोंच्या संख्येने सामील झालेल्या प्रत्येकात शिस्त पालनाचे तत्व ठासून भरलेले असते. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही आणि सर्वजण मिळून एकीने आपले ध्येय साध्य करू हा एकमात्र मंत्र ते मनात जपत असतात. आपणही अशीच एकी आणि शिस्त  आपल्या ध्येयाच्या वाटचालीत अंगी बनवायला हवी.
३. वक्तशीरपणा आणि नियोजन :
कोणत्याही कारणाने चालढकल न करता वारीतील सर्व धार्मिक क्रिया या नियोजनबद्ध आणि   वेळच्या वेळीच  केल्या जातात. कोणत्या दिवशी कुठे मुक्काम? किती वाजता पोहोचायचे? कसे निघायचे? मार्ग कोणता ?  या सर्व गोष्टींचे नियोजन अगदी वक्तशीरपणे आचरणात आणले जाते. 
वक्तशीरपणा आणि नियोजन हे  गुण प्रत्येक व्यक्तीच्या आचरणात आढळत नसले  तरीही ध्येयप्राप्ती साठी प्रत्येकाने आत्मसात करावेत इतके  महत्वपूर्ण आहेत.
४. निष्ठा :
वारीत आपल्या परमेश्वराच्या भेटीप्रती असणारी प्रत्येकाच्या मनातील प्रामाणिक निष्ठा ही सर्वांना अचंबित करणारी असते. कोणत्याही प्रकारचा नकारात्मक विचार मनात न आणता आणि एकमेकांचे पाय मागे न ओढता एकनिष्ठेने आणि एकदिलाने ध्येय साध्य करण्याचा राजमार्ग आपल्याला वारीतून शिकायला मिळतो. 
५. जिद्द आणि इच्छाशक्ती: 
कधी उन्हाची काहिली तर कधी पावसाच्या सरी, पायात काटेकुटे, रस्त्यांत खड्डेखुडडे आणि अनेक इतर आव्हानांवर मात करीत प्रत्येकजण जिद्दीने पायी चालत असतो. शरीरावरचे ओझे मनावर न आणता जिद्दीने ध्येय कसे गाठावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच पंढरीची वारी होय.
६. सातत्य:
शेकडो मैलांचा प्रवास पायी चालताना थंडी वाजते, पाय दुखू लागतात, प्रचंड थकवा येऊ लागतो परंतु तहानभूक विसरून ध्येयासाठी हरिनामाचा गजर मात्र सातत्याने चालू असतो. कोणत्याही कारणाने न थकता न भागता ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हवे असणारे सातत्य आपल्याला वारीतून अनुभवायास मिळते. 
७. नव्या ध्येयाची आस:
अनंत अडचणींचा सामना करून  एकादशीला त्या पांडुरंगाच्या चरणी माथा ठेवून ध्येयप्राप्तीचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत असतो. परंतु एवढ्यावर समाधान न मानता"पुढच्या वर्षी पुन्हा वारी घडू दे" ही नव्या ध्येयाची नवी आस जीवनाला एक वेगळाच अर्थ निर्माण करून देते. 

आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी पंढरीची वारी ही एक सक्सेस गुरु म्हणून आपणाला नक्कीच एक नवी ऊर्जा आणि एक नवी प्रेरणा देऊ शकते. पंढरीच्या वारीप्रमाणेच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील यशाची वारी सदा सुफळ संपन्न होवो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना...!



सागर नवनाथ ननावरे 

0 comments:

Post a Comment

 
;