भीती कुणाची कशाला.......?
`भित्यापाठी ब्रह्मराक्षस…आपण आपल्या दैनंदिन जीवनात कितीतरी वेळा ही म्हण वापरत असतो. माणसाला किंबहुना त्याच्या प्रगतीला मर्यादा आणणारी एकमेव आणि मुख्य गोष्ट म्हणजे"भीती." प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोणत्या ना कोणत्या प्रकारची एक अनाहूत भीती नेहमीच असते.
शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या धोक्याची जाणीव होऊन तत्पर राहण्यासाठी किंवा स्वसंरक्षणासाठी ठराविक मर्यादेपर्यंत भीती वाटणे साहजिकच आहे मात्र ही भीती आपल्या आयुष्यातील एकमोठी कमतरता ठरणे मात्र नक्कीच धोक्याचे आहे. आपल्याकडे अगदी लहानपणापासूनच जपण्याच्या नावाखाली पाण्यात उतरू नकोस, आगीला हात लावू नकोस, झाडावर चढू नकोस अशाप्रकारच्या भीती मनात रुजवल्या जातात. त्या त्या वयानुसार किंवा काळानुसार ते सारं काही ठीक आहे परंतु हीच भीती पुढे जाऊन आपल्या असमर्थतेच कारण बनली तर? याचाही आपण विचारकरायला हवा.
भीती ही एक संवेदना आहे आणि या संवेदनेवर समर्थपणाने आणि सक्षम मानसिकतेने मात करता येणे अगदी सहज शक्य आहे. भितीवरच मला माझ्याच आजूबाजूला घडलेली एक गोष्ट येथेआवर्जून नमूद करावीशी वाटते.
प्रवीण हा आमच्या शेजारच्या काकूंचा एकुलता एक आणि लाडका मुलगा,लहानपणापासूनच प्रचंड लाडात वाढलेला. काही दिवसानंतर ते आणि त्यांचे कुटुंब आमच्या शेजारच्याच एक गावातस्थायिक झाले होते. गेल्या महिन्यात बऱ्याच दिवसांनी त्याचे बाबा भेटले मी त्यांची आपुलकीने विचारपूस केली आणि प्रवीणबद्दल विचारले. प्रवीणबद्दल विचारताच त्यांचा चेहरा उतरला आणि तेसांगू लागले, "त्याला फोबिया नावाचा मानसिक विकार झाला असून, तो घरीच पडून असतो."
ऐकूनच मन अस्वस्थ झाले शाळेत पहिल्या क्रमांकाने पास होणारा प्रवीण सारखा हुशार विद्यार्थी आज बिछान्यास खिळून पडला होता. त्याच्या बाबांशी चर्चा केली असता समजले की हा भीतीचाविकार असून गेल्या वर्षी यात्रेत त्याला आम्ही आग्रहाने मोठ्या पाळण्यात बसवले खरे परंतु पहिल्या दोन फेरीतच तो चक्कर येऊन पडला. आणि तेव्हापासून त्याला उंचीची प्रचंड भीती वाटते आणिआम्ही पाचव्या मजल्यावर राहत असल्याने तो घराबाहेर पाडण्यासही घाबरतो.
लहानपणापासून एकुलता एक असल्याने त्याच्या आईबाबांनी त्याला नेहमीच आव्हानात्मक गोष्टीपासून दूर ठेवले परिणामी आज आयुष्यातल्या प्रत्येक क्षणावर भीतीचे सावट आहे. आईबाबाआणि त्याच्या मनातील अनामिक भीतीमुळे आज काहीतरी करून दाखवण्याच्या उमेदीच्या वयात आईबाबांना त्याची सेवा करावी लागत आहे.
जर जिजाऊने हाताला कापेल म्हणून शिवाजीच्या हातात तलवार दिली नसती तर आज स्वराज्याचा एवढा दैदिप्यमान इतिहास घडला असता का? नाही कारण प्रत्येक संकटावर आणि भीतीवर मातकरण्याचे आणि त्याला सामोरे जाण्याचे बळ त्या माउलीने शिवबाला दिले होते. भगतसिंग, स्वा. सावरकर,चंद्रशेखर आझाद या देशभक्तांनी कोणत्याही भयाला न जुमानता जुलमी ब्रिटीशसत्तेविरुद्ध लढा दिला म्हणूनच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत.
या जगात भीती घालविण्याचा एकच मार्ग आहे. ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीला मुद्दाम सामोरे जाणे, वारंवार ती गोष्ट करणे आणि जिद्दीने संकटांना आव्हान देणे.
चला तर मग भीती नावाच्या पारतंत्र्यातून आपल्या मनाची सुटका करून घेऊन स्वातंत्र्याचा आणि भयमुक्त जीवनाचा आनंद घेऊया.
सागर नवनाथ ननावरे
0 comments:
Post a Comment