दूरदृष्टी: गुंतवणूक भविष्याची
आजचे बघूया आज
आता कशाला उद्याची बात ?
या ओळींना प्रमाण मानून अनेकजण आपले आयुष्य जगताना आपल्याला दिसतात. अगदी खरे आहे हे आजचा दिवस आपण शेवटचा दिवस म्हणून जगायचा परंतु मग उद्याचे काय ? उद्याच्या पहाटे नवीन संधी, नवी सुखे आणि बराच काही नवे घेऊन येणाऱ्या नव्या सूर्योदयाला आपण काय उत्तर देणार ?
आपलंही असंच होत असते बऱ्याचवेळा फक्त आजचा दिवस अंधाधुंद जगण्याच्या नादात आपण आपल्याच उद्याचे संकट बनत असतो. आणि याचे एकमेव कारण म्हणजेच आपल्याकडे असणारा दूरदृष्टीचा अभाव. 'कोणी सांगितलंय उद्याचा दिवस उजाडणार की नाही आजच घ्या ऐश करून ? यासारख्या वाक्यावर आपल्या आयुष्याची भिस्त ठेऊन आपण आपले भविष्य अंधारात नेत असतो. दूरदृष्टी ही मानवाच्या भविष्यासाठी आणि भविष्यातील सुखासाठी आजच करीत असलेली एक मानसिक गुंतवणूक असते. ज्याप्रमाणे आपल्या किंवा आपल्यांच्या उज्वल भवितव्यासाठी आपण विविध योजना,फ़ंड,विमा आणि इतर बचतीच्या बाबींसाठी गुंतवणूक करीत असतो. त्याचप्रमाणे 'दूरदृष्टी' ही आपल्या भविष्यातील मानसिक स्थैर्यासाठी उद्याचा विचार करून आजपासूनच केलेली पूर्वतयारी असते.
आपण स्वत:ची दृष्टी नेहमी सूक्ष्म ठेवली पाहिजे ज्यामुळे जीवनात नकळत येणाऱ्या संकटांना आपल्याला तोंड देता येते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आजचा दिवस नव्या जोशात जगण्यावर आपण नक्कीच भर दिला पाहिजे परंतु त्यात उद्याच्या भविष्यवेधाचा विचारही नक्कीच व्हायला हवा.
आज आपण एकीकडे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे धडे मोठ्या अभिमानाने गिरवतो तर बरेचदा दुसरीकडे एका प्रश्नासाठी आपण नेहमीच अनुत्तरित राहतो की शहाजी राजांनी आदिलशाहीत चाकरी का करावी? इतिहास केवळ वाचनापुरता ठेवल्याने किंबहुना आपली दृष्टी संकुचित असल्याने आपण शहाजीराजेंच्या दूरदर्शीपणाबद्दल अनभिद्न्य राहतो.
शहाजीराजे आदिलशाहच्या विनंती वरून आदिलशाहित गेले ते मोठ्या मानसन्मानाने. एकीकडे आपण आदिलशाहित राहून स्वराज्य स्थापनेसाठी पोषक वातावरण तयार करावे आणि आदिलशाहित राहूनच आपल्या जहागीरीतील शत्रूंचा उपद्रव कमी व्हावा. तर दुसरीकडे
मासाहेब जिजाऊ आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे काम पूर्ण करावे हा यामागील शहाजीराजे यांचा दूरदर्शीपणा होता. असा दूरदर्शीपणा असलेल्या स्वराज्य संकल्पक सरलष्कर शहाजीराजे यांच्या प्रेरणेतूनच शिवबाने स्वराज्याचे स्वप्न साकार केले.
याच दूरदृष्टीचा आदर्श घेत महाराजांनी पुढे सैन्यासाठी सागरी व्यवस्था राबवली आरमार उभे केले. आपल्याकडे मनुष्यबळ आणि शत्रूच्या तुलनेत शस्त्रास्त्रांची कमतरता आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी सागरी व्यवस्थेचा उपयोग करून घेतला. यातून त्यांचा दूरदर्शीपणा लक्षात येतो.
म्हणूनच नुसतीच दृष्टी असून उपयोग नाही तर दृष्टिकोन आणि दूरदृष्टी असणे हे सुद्धा महत्त्वाचे आहेच.
कारण आपण दैनंदिन जीवनात जी कार्ये करत असतो,ती काळाबरोबर सुसंगत व बदलत्या काळाच्या कसोटीस खडी उतरली पाहिजे. स्पर्धेच्या युगातही आपण आपली सर्व क्षमता,शक्ती आणि कल्पकता यांचा दूरदृष्टीने विचार केला पाहिजे. आजच्या आपल्या आयुष्यात आपण दूरदृष्टीने पेरलेले कष्टाचे आजचे बीज उद्या एका वटवृक्षात रूपांतरित होऊन आपल्यालाच यशाची फळे आणि सुखाची छाया देणारे ठरणार आहे.
आजचा आपण अंगी बाणवलेला दूरदर्शीपणा उद्या आपल्या, आपल्यांच्या, समाजाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या प्रगतीस हातभार लावणारा ठरणार आहे.
सागर नवनाथ ननावरे
0 comments:
Post a Comment