Saturday, 19 March 2016 0 comments
पाऊस पडणार कसा?
झाड झाड तोडून बांधले तुम्ही हाउस
पाणी पाणी करता पण पाऊस पडणार कसा

ओंझळभर पाण्यासाठी चाललेत नळ वाहून
पाण्याच्या बचतीसाठी मग येणार कोण धावून
घोटभर पाण्यासाठी कोरडा पडेल घसा
पाणी पाणी करता पण पाऊस पडणार कसा

पाणी हेच जीवन म्हणती सारे जीव
झाड झाड तोडताना येत नाही कीव
पुढच्या पिढीला दाखवायला उरणार का रे मासा
पाणी पाणी करता पण पाऊस पडणार कसा

प्रदूषणाच्या मदतीसाठी धावते तुमची गाडी
रस्ता झाला मोकळा तुला पण कापली गेली झाडी
पर्यावरणाच्या गप्पा मारता पण जपणार कोण वसा
पाणी पाणी करता पण पाऊस पडणार कसा

दूर दूर आकाशात उडतील का रे चिमण्या
श्वासच नाही उरला तर चालणार कशा धमन्या
निर्सर्गाशी वैर करून काय करणार नासा

पाणी पाणी करता पण पाऊस पडणार कसा
0 comments
किल्ल्यांची सेवा हीच खरी शिवभक्ती
महाराष्ट्र आणि तमाम जनतेच देखण्या स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे शिवछत्रपती सर्वांची प्रेरणा आहेत. परंतू आपल्या त्या राजाला पाहण्याचे भाग्य ज्या किल्ल्यांना आणि ऐतिहासिक वास्तूंना मिळाले ते आजही दुर्लक्षित आहेत ही नक्कीच दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. आज महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकटच होत चालली आहे. स्वराज्याची प्रतीके आणि वैभवशाली महाराष्ट्राचा वारसा असणारे अनेक गड आज अखेरचा श्वास घेत आहेत हे निंदनीय आहे.पर्यटकांचे ऐतिहासिक भेटीच्या नावाखाली चालणारे मौजमजेचे  आणि मनमानी वर्तन तसेच पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष या गोष्टी  किल्ल्यांच्या पडझडी ला कारणीभूत ठरत आहेत. गडांचे संवर्धन हे  सर्वेक्षण,दुरुस्त्या आणि वस्तूंचे जतन या टप्प्यांतून काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. आपल्या राजाचा आणि राज्याचा ऐतिहासिक वारसा जतन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असून ती यशस्वीपणे पेलून आपल्या संस्कृतीचा वसा धगधगता ठेवणे हे शेवटी आपल्याच हाती आहे. किल्ल्यांचा विकास हा नक्कीच पर्यटनाला चालना देणारा असणार आहे. त्यामुळे किल्ल्यांचा इतिहास आणि त्यांच्या परिसरातील निसर्गसौंदर्याचे जतन होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील किल्ले हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत, शिवरायांचे स्वप्न आहे आणि महाराष्ट्राचा संपन्न  ऐतिहासिक वारसासुद्धा आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भव्य शिवजयंती साजरी करून किंवा शिवभक्तीचे  दिखाऊ दाखले देऊन काहीही होणार नाही तर  किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ते आपण पार पडलेच पाहिजे.


सागर नवनाथ ननावरे 
धनकवडी,पुणे
Wednesday, 16 March 2016 0 comments

छत्रपती शिवाजी महाराज : राजा सकळ जनांचा

शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप |
शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||

आज शिवजयंती निमित्त माझ्या लाडक्या राजाला वंदन करून मी माझ्या लेखनाला  सुरुवात करतो.

या महिन्यात  मराठी माणसांच्या मनाची  अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची 386 वी जयंती. शिवनेरी गडावर जिजाऊ पोटी एक तेजस्वी तारा जन्माला आला आणि  त्याच ध्रुव ताऱयाने अवघ्या  जगालाच प्रकाशमय केले. महाराष्ट्राचा भाग्यविधाता  म्हणून मराठी माणसांच्या काळजात विराजमान झाला.  शिवरायांबद्दल आपल्या मनामध्ये जो अभिमान आहे तो अखेरच्या श्वासापर्यंत तसाच तेवत राहील.
शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची मशाल पेटविली . चहु बाजूंनी उपऱ्याच्या दादागिरिने बेजार  झालेला समाज, शिवाय  आदिलशहा, निजामशाहीपुढे झुकलेल्या माना घेऊन जहांगीरदारी वर समाधानी मराठी सरदार अशी परिस्थिती असताना, महाराष्ट्रात मराठी माणूस कधी ताठ मानेने उभा राहणार का?, असा प्रश्न प्रत्येकाच्या ओठावर असतानाच माझ्या राजाने असा काही धुमाकूळ घालायला सुरवात केली की, त्याच्या पराक्रमाच्या बातम्या  ऐकून  शत्रूलाही धडकी भरू लागली.
स्वराज्याच्या स्वप्नपूर्तिसाठी महारांजांनी माणसं जोडण्याचा वसा हाती घेतला. आपल्या एकीने आणि जिद्दीनेच देखणे स्वराज्य निर्माण होऊ शकतं असा दूर्द्म्य आशावाद त्यांनी जनमानसात रुजवला. म्हणूनच तानाजी, बाजीप्रभू, बाजी पासलकर, जिवा महाले,शिवा काशीद  असे अनेक ज्यांच्या पराक्रमाने  माझ्या राजाच्या आणि माझ्या राज्याच्या स्वप्नाला एक ध्यास मिळाला.

आज आपण पण हीच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की "ज्यासाठी केला एवढा अट्टाहास" ते रयतेच, भरभराटीच राज्य महाराजांच्या अथक प्रयत्नानंतर आज पून्हा स्वप्नवतच आहे. हा तर माझ्या राजांचा आणि  राजांच्या विचारांचा अपमान आहे आणि हे कुठंतरी बदललं पाहिजे. राजकारणात आणि सत्ताकरणात  बदल घडवून परिस्थिती  बदलणार नाही; त्या साठी गरज आहे आपल्याला बदलण्याची, आपले विचार,दिशा आणि मानसिकता बदलण्याची. 

मित्रांनो काळ झपाट्याने बदलतो आहे म्हणुनच आता  गरज आहे आपणच  पेटून उठण्याची. नव्या जोमाने  आपल्या राष्ट्राची, प्रांताची आणि आपल्या संस्कृतीची जोपासना करण्याची आणि सर्वात महत्वाचे  म्हणजे गरज  आहे मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची!

मूठभर पण निष्ठावंत मावळे घेऊन आपल्या राजाने ब्रिटिश,पोर्तुगीज,डच निजामशाही आणि आदिलशाही यांसारख्या बलाढ्य शक्तींशी सामना केला पण स्वराज्याच्या विटेला देखील धक्का लावू दिला नाही.
पण आज कोट्यवधी जनता,आधुनिक शस्त्रास्त्रे आणि मोठं सैन्यबळ असतानाही चीन पकिस्तानसारख्या पाठीवर वार करणाऱ्या शत्रूंना आम्ही सहन करतो यापेक्षा मोठे दुःख काय?.
जगाची प्रेरणा असणाऱ्या शूरवीर राजाच्या देशात आजही आपण असुरक्षित असल्याची भावना असणं दुर्दैवी आहे.

आजच्या जगात  तलवारीच्या युध्दाची जागा कधीच  ज्ञाना, विचार,आणि माहिती तंत्रज्ञान या युध्दानी घेतली आहे. आणि म्हणूनच शिवचरित्रासारखा धगधगता दीपस्तंभ आपल्याकडे असताना आपल्याला कशाचीही गरज नाही.  शिव चरित्रातून एक नवी ऊर्जा आणि  प्रेरणा घेऊन आपल्याला  कला, क्रीडा, ज्ञान विज्ञान, प्रशासन अशा अनेक क्षेत्रातले  विविध गड आपल्याला काबीज करायचे आहेत. आणि यातूनच एका बलशाली आणि उज्वल  भारतराष्ट्राची  निर्मिती करायची आहे. आपल्या  शिवबाच्या आणि आपल्या स्वप्नातील स्वराज्य याची देही याची डोळा प्रत्यक्षात अवतरलेले आपल्याला पहायचे असेल तर त्या साठी आपल्याला  लढायचेही  आहे आणि घडायचेही आहे.

अरे अभिमान बाळगतो मी या  मातीचा ज्या मातीला माझ्या राजाचे चरण लागले.
म्हणूनच  शिवाजी महाराजांनी अंगिकारलेल्या गुणांना आपण आत्मसात केले  पाहीजे. आपला  समाज्,आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहीजे.

आपल्या पराक्रमाने शत्रूला चारीमूंड्या चित करणारा आणि आपल्या मृत्यूने शत्रूलाही रडवणारा हा जगाच्या इतिहासातील एकमेव युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवराय.

स्वराज्याच्या तेजस्वी  सूर्याला, पर्वताएवढ्या खंबीर  व्यक्तीमत्वाला , जिजाऊच्या वाघाला  आणि त्याच्या अमर कर्तुत्वाला माझा मानाचा मुजरा!

जय जिजाऊ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!

सागर नवनाथ ननावरे

Monday, 14 March 2016 0 comments

"जल है तो कल है "

                                                                "जल है तो कल है "


अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असताना आणि पावसाळ्यास  बराच अवधी शिल्लक  असतानादेखील शहरांत होणारा पाण्याचा अपव्यय हि चिंतादायी बाब आहे.पुणे शहरात जुलै पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असल्याच्या बातमीने पुणेकरांनी अगदी निर्धास्तपणे पाण्याचा वापर जैसे थे असाच चालू ठेवला आहे आणि हीच शहरासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. प्रत्येकाने आपत्काळातील जबाबदारी म्हणून पाण्याचा अपव्यय कसा टाळता येईल आणि जलसंधारणासाठी सजग नागरिक म्हणून आपणास काय करता येईल याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. केवळ स्मार्ट सिटीच्या गप्पा मारून काहीही होणार नाही तर यासाठी समाजाने खर्या अर्थाने जलसाक्षर होऊन स्मार्ट होणे हि काळाची गरज आहे.आगामी काळात स्मार्ट सिटीचे नियोजन करतांना बांधकाम विभागाने ईमारत परिसरात रेन हार्वेस्टिंग सारख्या विविध प्रभावी प्रकल्पांचा वापर करणे बंधनकारक करणे गरजेचे आहे.  जलसाक्षर झालो तर पाण्याच्या योग्य नियोजनातून दुष्काळावर मात करता येऊ शकते आणि यातून भविष्यात सुजलाम सुफलाम शहर आणि राष्ट्र नक्कीच उदयास येईल.

सागर  नवनाथ ननावरे
धनकवडी, पुणे 
Friday, 11 March 2016 0 comments

To be or not to be, that is the question!!!

दुष्काळात होरपळून निघालेल्या एका कर्जबाजारी शेतकऱ्याची व्यथा नटसम्राट चित्रपटातील  एका डायलॉगमध्ये  रूपांतरित करून मांडण्याचा माझा हा प्रयत्न

To be or not to be, that is the question!!!

कर्ज फेडाव की जग सोडाव
हा एकच सवाल आहे.
या जगाच्या नकाशावर
शासनाच्या आश्वासनावर खुश  होऊन
जगावं बेशरम लाचार आनंदानं
की फेकून द्यावं हे  शरीर
त्या फासाच्या दोरीवर  जाणीवेच्या यातनेसह
भेगाळलेल्या जमिनीवर रणरणत्या उन्हात ?
आणि करावा स्वतःचा  शेवट
एका सुकलेल्या त्या झाडावर ..
आणि संपवावा त्रास माझा तुझा याचा आणि त्याचाही.
दुष्काळ   नावाच्या महासर्पाने
जगण्याला असा डंख मारावा
की नंतर येणाऱ्या स्वप्नातील पावसाला
नसावा जागृतीचा किनारा
कधीही
पण नंतरच्या मशागतीची
पुन्हा स्वप्ने  पडू  लागली तर
तर-तर.....
इथचं जीव गूदमरतोय.
नव्या आश्वासनांच्या  अनोळखी प्रदेशात
प्रवेश करण्याचा धीर होत नाही
म्हणून आम्ही सहन करतो
हे जुने जागेपण
सहन करतो या जीवघेण्या यातना.... निर्जीवपणाने
शरीराला बसणारे निराशेचे चटके
उपासमारीने तडफडणाऱ्या  गाई गुरांची
विटंबना
आणि अखेर रिकामा  कटोरा घेऊन
उभे राहतो खालच्या मानेने
आमच्याच नशीबाच्या दाराशी.
विधात्या , तू इतका कठोर का झालास?
एका बाजूला , आम्ही ज्यांना मतं  दिली
ते आम्हाला विसरतात
आणि दुसऱ्या बाजूला , ज्यानं आम्हाला बळीराजा केलं
तो तूही आम्हाला विसरतोस,
मग कुठे घेऊन जायचे हे  सुकलेले ओठ आणि रिकामे पोट
हे करुणाकरा ,
आम्ही शेतकऱ्यांनी
कोण्याच्या पायावर डोकं आदळायच!
कोणाच्या - पायावर- कोणाच्या-
-----कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला एक हतबल शेतकरी   🙏😅sagar

Thursday, 10 March 2016 0 comments

कसा होणार देश महासत्ता?

एक वास्तववादी सत्य

श्रीमंत लोक कर्ज फेडता येत  नाही म्हणून देश सोडतात....🏃🏻
आणि
गरीब लोक कर्ज फेडता येत नाही म्हणून जगच सोडतात 😒

कसा होणार देश महासत्ता?

 
;