Saturday, 19 March 2016
किल्ल्यांची सेवा हीच खरी शिवभक्ती
महाराष्ट्र आणि तमाम जनतेच देखण्या स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे शिवछत्रपती सर्वांची प्रेरणा आहेत. परंतू आपल्या त्या राजाला पाहण्याचे भाग्य ज्या किल्ल्यांना आणि ऐतिहासिक वास्तूंना मिळाले ते आजही दुर्लक्षित आहेत ही नक्कीच दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे. आज महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकटच होत चालली आहे. स्वराज्याची प्रतीके आणि वैभवशाली महाराष्ट्राचा वारसा असणारे अनेक गड आज अखेरचा श्वास घेत आहेत हे निंदनीय आहे.पर्यटकांचे ऐतिहासिक भेटीच्या नावाखाली चालणारे मौजमजेचे  आणि मनमानी वर्तन तसेच पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष या गोष्टी  किल्ल्यांच्या पडझडी ला कारणीभूत ठरत आहेत. गडांचे संवर्धन हे  सर्वेक्षण,दुरुस्त्या आणि वस्तूंचे जतन या टप्प्यांतून काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. आपल्या राजाचा आणि राज्याचा ऐतिहासिक वारसा जतन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असून ती यशस्वीपणे पेलून आपल्या संस्कृतीचा वसा धगधगता ठेवणे हे शेवटी आपल्याच हाती आहे. किल्ल्यांचा विकास हा नक्कीच पर्यटनाला चालना देणारा असणार आहे. त्यामुळे किल्ल्यांचा इतिहास आणि त्यांच्या परिसरातील निसर्गसौंदर्याचे जतन होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील किल्ले हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत, शिवरायांचे स्वप्न आहे आणि महाराष्ट्राचा संपन्न  ऐतिहासिक वारसासुद्धा आहे. केवळ प्रसिद्धीसाठी भव्य शिवजयंती साजरी करून किंवा शिवभक्तीचे  दिखाऊ दाखले देऊन काहीही होणार नाही तर  किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ते आपण पार पडलेच पाहिजे.


सागर नवनाथ ननावरे 
धनकवडी,पुणे

0 comments:

Post a Comment

 
;