Saturday, 31 December 2016 0 comments

२०१७ नया है यह.. नवनवे संकल्प


*२०१७ नया है यह...!*

पाहता पाहता २०१६ या वर्षाने कधी निरोप घेतला हे समजलेही नाही. नव्या वर्षाची अनाहूत ओढ मात्र आता प्रत्येकाच्या मनात घर करून बसली. तसे पाहता नवे वर्ष म्हणजे भूतकाळातील अनुभवांतून भविष्यकाळात काहीतरी अनोखे आणि संस्मरणीय करण्याचा एक नवे पर्वच म्हणावे लागेल.

केशवसुतांनी आपल्या 'तुतारी' या कवितेतून या नव्या वर्षाला आणि नव्या पर्वाला अतिशय मार्मिकपणे साद घातली आहे,

*"जुने जाऊ द्या मरणालागुनि*

*जाळूनी किंवा पुरुनी टाका*

*सडत न एका ठायी ठाका*

*सावध ऐका पुढल्या हाका*

*खांद्यास चला खांदा भिडवूनी"*

केशवसुतांनी जुन्या गोष्टींना कवटाळून न बसता काळाचे भान ठेवून सर्वांनी नवे विचार, नवा ध्यास आत्मसात करण्याचा मूलमंत्र दिला आहे. आणि हाच मूलमंत्र मनाशी धरून आपल्याला नवीन वर्षात *"तिमिरातुनी तेजाकडे"* जाण्याचा मार्ग शोधायचा आहे.

या नव्या वर्षात आपण सर्वजण नवनवे संकल्प मनात निश्चित करीत असतो. परंतु *"नव्याचे नऊ दिवस"*  या म्हणीप्रमाणे काही दिवसानंतर हळूहळू त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. पळवाटांचा आणि कारणांचा आधार घेऊन आपण  केवळ आपल्या संकल्पानांचं नाही तर अप्रत्यक्षपणे आपल्या ध्येयाला बगल देत असतो.

चला तर मग या संकल्पांच्या पूर्ततेसाठी थोडेसे जाणून घेऊ या.

* संकल्प मोजकेच हवेत :*
अनेकदा आपण संकल्पांची भलीमोठी यादी बनवितो परंतु त्यातील एखादाच प्रत्यक्षात आणतो. संकल्प अगदी दोन चार असले तरी चालतील परंतु ते निश्चित असायला हवेत. उदा. डायटिंग करणे, व्यायाम करणे, तेलकट तिखट न खाणे,रोज चालायला जाणे अशी अनावश्यक मोठी यादी बनविण्यापेक्षा "वर्षात १० किलो वजन कमी करणे" हा संकल्प घेऊन इतर गोष्टी उद्दिष्ट्ये म्हणून त्याअंतर्गत घ्यावीत.

* संकल्प अभ्यासपूर्ण असावेत:*
केवळ इतरांनीं केला किंवा मला याची नितांत गरज आहे म्हणून अनुकरणात्मक संकल्प नसावा. त्या संकल्पातून होणारे फायदे-तोटे,लागणारा कालावधी, अपेक्षित खर्च,आवश्यक सहकार्य आणि फलनिष्पत्ती या साऱ्या गोष्टींचा विचार त्यात असावा.

उदा. 'नव्या वर्षात एखादा नवीन व्यवसाय सुरु करायचा" इतपत विचार न करता त्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल, जागा, मनुष्यबळ, संभाव्य धोके,अपेक्षित उत्पन्न आणि बाजारातील संधी या साऱ्या गोष्टींचे कागदावर नियोजन हवे. तसेच त्यासाठीचा कालावधी निश्चित असावा. संकल्प अभ्यासपूर्ण नसल्यास त्याची पूर्तता होण्याची शक्यता आजिबात नसते.

* संकल्प नजरेसमोर असावा:*
आपला संकल्प भिंतीवर किंवा संकल्पाशी संबंधित ठिकाणी मोठ्या अक्षराने कागदावर लिहून चिटकवावा. "लॉ ऑफ अट्रॅक्शन" नुसार एखादी गोष्ट आपण सतत ध्येय म्हणून आपल्या नजरेसमोर ठेवल्याने आपण त्यादृष्टीने कृती करतो व ती झटपट साध्यही होते.

उदा. "परीक्षेत पहिला नंबर मिळवणे" हा संकल्प असेल तर तो कागदावर लिहून पुस्तकांच्या कपाटावर किंवा भिंतीवर चिटकवावा.

* वचनबद्ध रहा:* आपण स्वत:च्या मनाशी जो निश्चय करतो तोच सफल होतो. आपण आपल्या संकल्पप्रति कमालीचे वचनबद्ध राहायला हवे. मनाशी ठाम निश्चय करून आणि हा संकल्प आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो याला प्रमाण मानून संकल्प तडीस न्यायला हवा. 

उदा. जर आपल्याला एखाद्या गोष्टीवर अनावश्यक होणार खर्च कमी करायचा असेल तर त्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जाणीवपूर्वक त्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. 

* सकारात्मकतेने पहा:*
आपल्या संकल्पाकडे सकारात्मकतेने पाहायला हवे. अनेकदा आपल्या संकल्पाची लोक खिल्ली उडवतात आणि "केवळ लोक काय म्हणतील?" म्हणून आपण संकल्प अर्ध्यावर सोडत असतो. 
म्हणूनच आपण आपल्या संकल्पाकडे एक निर्धार म्हणून सकारात्मकतेने पाहायचे असते.

उदा: नृत्य शिकण्याचा निर्णय एखाद्या लठ्ठ व्यक्तीने घेतल्यास "तू काय नाचणार? अशा उपहासात्मक टीकांना मनावर न घेता, त्याने शरीराची हालचाल होऊन लठ्ठपणा कमी होऊन नृत्यात नैपुण्यही मिळेल असा सकारात्मक आत्मविश्वास आपण मनाशी बाळगायला हवा.

मित्रांनो  दैनंदिनी लिहिणे,रोज जॉगिंग करणे, नियमित व्यायाम करणे, नित्यनेमाने वाचन करणे, दररोज सकाळी लवकर उठणे, डायटिंग करणे,कुटुंबासाठी वेळ देणे,समाजकार्य करणे,इ संकल्प आपण बनवतोच मनाच्या तात्पुरत्या समाधानासाठी आणि नंतर तोडण्यासाठी. तेरड्याच्या तीन दिवसांच्या रंगाप्रमाणेच काही दिवसांत संकल्पांचा विसर पडत जातो आणि आपण पुन्हा नव्या वर्षाची वाट पाहत बसतो. परंतु या चालढकल करण्याच्या आणि संकल्प अर्धवट वाऱ्यावर सोडण्याच्या नादात आपण आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ वाया घालवत असतो.

प्रत्येक नवे वर्ष आपल्यासाठी नव्या उमेदीने जगण्याची एक संधी घेऊन येत असते आणि याच संधीचे आपल्याला सोने करायचे असते.

 चला तर मग

*छोडो कल कि बाते कल की  बात पुराणी*

*नये दौर मी लिखेंगे मिलकर नयी कहाणी......*

असे म्हणून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि नव्या संकल्पांच्या पुर्ततेसाठी जोशाने सज्ज होऊ या.
*सर्वांना नव्या वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा...!*

 लेखन: सागर नवनाथ ननावरे
सौजन्य : दैनिक प्रभात
www.Sagarnanaware.blogspot.in

Monday, 12 December 2016 0 comments

4G पाहिजे ? ....... आयुष्याच्या 4G बद्दल

4G पाहिजे ? 
आयुष्याच्या 4G  बद्दल प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा लेख 

दर रविवारी प्रभात वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या माझ्या लेखमालेतील रविवार ४ डिसेंबर चा लेख 

सागर ननावरे 
sagarnanaware.blogspot.in

Monday, 28 November 2016 0 comments

चुकीला माफी नाही(?)

                       चुकीला माफी नाही(?)

Sunday, 13 November 2016 0 comments

स्पष्टवक्तेपणा : बिन्दास्त बोल



                    स्पष्टवक्तेपणा : बिन्दास्त बोल 

Saturday, 5 November 2016 0 comments

हसत रहा.... ईत्तीसी हंसी


Wednesday, 2 November 2016 0 comments

छोडो कल की बाते

 ""छोडो कल की बाते""
 दर रविवारी प्रभात वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या माझ्या लेखमालेतील दिवाळीत प्रसिद्ध झालेला  लेख ""छोडो कल की बाते""

अवश्य वाचा
आपलाच
सागर नवनाथ ननावरे
Monday, 17 October 2016 0 comments

श्रेष्ठत्वाचा आदर

                                                                                श्रेष्ठत्वाचा आदर

"व्यक्ती तितक्या प्रवृत्ती"  प्रत्येकजण आपले आयुष्य आपापल्या कलेने जगत असतो. यात प्रत्येकाच्या जगण्याच्या कला, तत्वे आणि पद्धती या भिन्न भिन्न असतात. आणि या जगण्याच्या कलेत बऱ्याचदा माणूस आपली इतरांशी तुलना करण्याचा प्रयत्न करतो.  समोरच्या व्यक्तीतील कौशल्यांना आदरपूर्वक तुलनेने पाहण्यात काहीही वावडे नाही. परंतु स्वतःला श्रेष्ठ ठरविण्यासाठी किंवा मत्सर बुद्धीने जेव्हा माणूस तुलना करतो यातून मात्र स्वार्थी वृत्तीने त्या व्यक्तीतील क्षमतेचा व श्रेष्ठत्वाचा तो एकप्रकारे अपमान करीत असतो.  असे म्हणतात कि अनुभवातून आणि अनुकरणातून माणूस शिकतो. हे बऱ्याच अंशी खरे आहे. पण काही गोष्टी माणसाने दुसऱ्याच्या अनुभवातून आणि त्याच्याकडे असणाऱ्या प्रभुत्वाकडून  शिकणे हे देखील शहाणपणाचे  असते. परंतु हे करीत असताना त्या व्यक्तीशी तुलना करताना किंवा स्पर्धा करताना त्याच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि कौशल्यांचा आदरही आपणास नक्कीच करायला हवा.
रामायणात यावरच आधारित घडलेली एक कथा इयहे आवर्जून नमूद करावीशी वाटते,
रामाच्या सेनेत एक वानर होता. त्याच्या मनात एकदा आले की, रामात आणि आपल्यात काय फरक आहे. त्याला असलेले सर्व अवयव आपल्याला आहेत आणि आपल्याला एक शेपूटही जास्त आहे. सुग्रीवाने आपल्या सहका-याच्या मनातला भाव ओळखला. सुग्रीवाला किंचीत राग आहे. रामानेही त्याच्या मनातला भाव ओळखला पण त्याने त्या वानराला पुढे बोलावले व सांगितले,'' आज तू वानरसेनेचे आधिपत्य कर.'' वानर खूष झाला. राक्षससैन्य चालून येऊ लागले. धुडगुस घालू लागले. याबरोबर या वानरसेनापती महाशयांनी शेपटीने एक झाड उपटले आणि शेकडो राक्षसांवर फेकून दिले. त्याचा पराक्रम पाहून सुग्रीवही हरखून गेला. आता सुग्रीवाच्या मनातही रामात आणि या वानरात काय फरक आहे हा विचार येऊ लागला. हा विचारही रामाला कळून चुकला पण प्रभू रामचंद्र गप्प राहिले. काही वेळाने शस्त्रांचा उपयोग होत नाही हे पाहून राक्षसांच्या सेनापतीने युक्ती केली व त्याने मोठेमोठे नारळ काढून वानरसैन्याकडे फेकायला सुरुवात केली. वानरसैन्याने या नारळांचे काय करायचे हे न सुचल्याने ते फोडून खायला सुरुवात केली. वानरसैन्य व सेनापती नारळ खात आहेत हे पाहून राक्षससेनापतीने आपल्या सैन्यानिशी मोठा हल्ला केला व काही वानरांना ठार केले. यावरही प्रभू रामचंद्रांचे लक्ष होते. त्यांनी राक्षससैन्यावर बाणांनी हल्ला केला व राक्षससैन्यास मागे फिरवले. यात सुग्रीवाला रामचंद्र व वानर यांच्यातील फरक लक्षात आला.

थोडक्यात काय तर आपणही बऱ्याचदा त्या वानराप्रमाणे इतरांशी आपली सहज तुलना करतो आणि त्यामुळे आपली चांगलीच फजितीही होते. थोरा मोठ्यांच्या किंवा एखाद्या क्षेत्रात आपल्या आधी नैपुण्य प्राप्त केलेल्या व्यक्तिमत्वाचा आपण नेहमीच आदर केला पाहिजे. भलेही आपण कदाचित त्या क्षेत्रात त्यांच्यापेक्षाही भव्यदिव्य यश प्राप्त केलेले असो, परंतु  त्या व्यक्तीकडे पाहून किंबहुना त्या व्यक्तीशी तुलना करूनच आपण यशस्वी झालेलो असतो याचा विसर कधीच पडू देता कामा नये.

Friday, 7 October 2016 0 comments

आता कशाला उद्याची बात ? दूरदृष्टी: गुंतवणूक भविष्याची

                     आता कशाला उद्याची बात ?


या ओळींना प्रमाण मानून अनेकजण आपले आयुष्य जगताना आपल्याला दिसतात. अगदी खरे आहे हे आजचा दिवस आपण शेवटचा दिवस म्हणून जगायचा परंतु मग उद्याचे काय ? उद्याच्या पहाटे नवीन संधी, नवी सुखे आणि बराच काही नवे घेऊन येणाऱ्या नव्या सूर्योदयाला आपण काय उत्तर  देणार ?
आपलंही असंच होत असते बऱ्याचवेळा फक्त आजचा दिवस अंधाधुंद जगण्याच्या नादात आपण आपल्याच उद्याचे संकट बनत असतो. आणि याचे एकमेव कारण म्हणजेच आपल्याकडे असणारा दूरदृष्टीचा अभाव. 'कोणी सांगितलंय उद्याचा दिवस उजाडणार की नाही आजच घ्या ऐश करून ? यासारख्या वाक्यावर आपल्या आयुष्याची भिस्त ठेऊन आपण  आपले भविष्य अंधारात नेत असतो. दूरदृष्टी ही मानवाच्या भविष्यासाठी आणि भविष्यातील सुखासाठी आजच करीत असलेली एक मानसिक गुंतवणूक असते. ज्याप्रमाणे आपल्या किंवा आपल्यांच्या उज्वल भवितव्यासाठी आपण विविध योजना,फ़ंड,विमा आणि इतर बचतीच्या बाबींसाठी गुंतवणूक करीत असतो. त्याचप्रमाणे 'दूरदृष्टी' ही आपल्या भविष्यातील मानसिक  स्थैर्यासाठी उद्याचा विचार करून आजपासूनच केलेली पूर्वतयारी असते. 
आपण स्वत:ची दृष्टी  नेहमी सूक्ष्म ठेवली पाहिजे ज्यामुळे जीवनात नकळत येणाऱ्या  संकटांना आपल्याला तोंड देता येते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आजचा दिवस नव्या जोशात जगण्यावर आपण नक्कीच भर दिला पाहिजे परंतु त्यात उद्याच्या भविष्यवेधाचा विचारही नक्कीच व्हायला हवा. 
आज आपण एकीकडे  छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे धडे मोठ्या अभिमानाने गिरवतो तर बरेचदा  दुसरीकडे एका प्रश्नासाठी आपण नेहमीच अनुत्तरित राहतो की शहाजी राजांनी आदिलशाहीत चाकरी का करावी? इतिहास केवळ वाचनापुरता ठेवल्याने किंबहुना आपली दृष्टी संकुचित असल्याने आपण शहाजीराजेंच्या दूरदर्शीपणाबद्दल अनभिद्न्य राहतो.  
शहाजीराजे आदिलशाहच्या विनंती वरून आदिलशाहित गेले ते मोठ्या मानसन्मानाने. एकीकडे  आपण आदिलशाहित राहून स्वराज्य स्थापनेसाठी पोषक वातावरण तयार करावे आणि आदिलशाहित राहूनच  आपल्या जहागीरीतील शत्रूंचा उपद्रव कमी व्हावा. तर दुसरीकडे 
 मासाहेब जिजाऊ आणि शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे  काम पूर्ण करावे हा यामागील शहाजीराजे यांचा दूरदर्शीपणा होता. असा दूरदर्शीपणा असलेल्या  स्वराज्य संकल्पक सरलष्कर शहाजीराजे यांच्या प्रेरणेतूनच शिवबाने स्वराज्याचे स्वप्न साकार केले. 
याच दूरदृष्टीचा आदर्श घेत महाराजांनी पुढे  सैन्यासाठी सागरी व्यवस्था राबवली आरमार उभे केले. आपल्याकडे मनुष्यबळ आणि शत्रूच्या तुलनेत शस्त्रास्त्रांची कमतरता आहे हे लक्षात घेऊनच त्यांनी सागरी व्यवस्थेचा उपयोग करून घेतला. यातून त्यांचा दूरदर्शीपणा लक्षात येतो.
म्हणूनच नुसतीच दृष्टी असून उपयोग नाही तर दृष्टिकोन आणि दूरदृष्टी असणे हे सुद्धा महत्त्वाचे आहेच.
कारण आपण  दैनंदिन जीवनात जी कार्ये करत असतो,ती काळाबरोबर सुसंगत व बदलत्या काळाच्या कसोटीस खडी उतरली पाहिजे. स्पर्धेच्या युगातही  आपण आपली सर्व क्षमता,शक्ती आणि कल्पकता यांचा दूरदृष्टीने विचार केला पाहिजे. आजच्या आपल्या आयुष्यात आपण दूरदृष्टीने पेरलेले कष्टाचे आजचे बीज उद्या एका वटवृक्षात रूपांतरित होऊन आपल्यालाच यशाची फळे आणि सुखाची छाया देणारे ठरणार आहे.
आजचा आपण अंगी बाणवलेला दूरदर्शीपणा उद्या आपल्या, आपल्यांच्या, समाजाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या प्रगतीस हातभार लावणारा ठरणार आहे. 

सागर नवनाथ ननावरे 
0 comments

पुणे महानगरपालिका प्रभाग रचना आणि आरक्षण / Pune Corporation 2016

             पुणे महानगरपालिका 2016
pune manapa, pmc corporation, pune mnp, pune arakshan 
प्रभाग क्रमांक-  प्रभागाचे नाव   
१ कळस - धानोरी
२ फुलेनगर -नागपूर चाळ
३ विमाननगर - सोमनाथनगर
४ खराडी - चंदननगर
५ वडगावशेरी - कल्याणीनगर
६ येरवडा
७ पुणे विद्यापीठ - वाकडेवाडी
८ औंध – बोपोडी
९ बाणेर - बालेवाडी- पाषाण
१० बावधन –कोथरूड डेपो 
११ रामबाग कॉलनी –शिवतीर्थ नगर
१२ मयूर कॉलनी – डहाणूकर कॉलनी
१३ एरंडवणा - हॅपी कॉलनी
१४ डेक्कन जिमखाना – मॉडेल कॉलनी
१५ शनिवार पेठ - सदाशिव पेठ

१६ कसबा पेठ – सोमवार पेठ
१७ रास्ता पेठ – रविवार पेठ
१८ खडकमाळ आळी – महात्मा फुले पेठ
१९ लोहियानगर - कासेवाडी
२० ताडीवाला रोड - ससून हॉस्पिटल
२१ कोरेगाव पार्क - घोरपडी
२२ मुंढवा – मगरपट्टा सिटी
२३ हडपसर गावठाण – सातववाडी
२४ रामटेकडी- सय्यदनगर
२५ वानवडी
२६ महमदवाडी – कौसर बाग
२७ कोंढवा खुर्द - मिठानगर
२८ सॅलीसबरी पार्क – महर्षी नगर
२९ नवी पेठ  – पर्वती
३० जनता वसाहत – दत्तवाडी

३१ कर्वेनगर
३२ वारजे माळवाडी
३३ वडगाव धायरी- सन सिटी
३४ वडगाव बुद्रुक – हिंगणे खुर्द
३५ सहकार नगर – पद्मावती
३६ मार्केटयार्ड – लोअर इंदिरा नगर
३७ अप्पर इंदिरा नगर
३८ राजीव गांधी उद्यान – बालाजीनगर
३९ धनकवडी - आंबेगाव पठार
४० आंबेगाव दत्तनगर - कात्रज गावठाण
४१ कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी  

जाहीर करण्यात आलेले आरक्षण पुढीलप्रमाणे- 
इतर मागासवर्गीय (ओबीसी)- 15 ब, 23 ब, 39 ब 
ओबीसी महिला आरक्षित प्रभाग : ३९ ब, १५ ब, २३ ब, १ क, २ ब, ३ब, ४ ब, ६ ब, १४ ब, १९ ब, २० ब, २१ ब, २४ ब, ३० ब, ४१ ब
प्रभाग 37 मध्ये महिलांना 2 जागा आरक्षित
अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव जागा - ७ अ, २८ अ, ३५ अ, ३६अ, ३७ अ, २६अ, ८अ, २९अ, १६ अ, १ अ, १८ अ

आरक्षित जागांतही महिलांना 50 टक्के आरक्षण असणार

साभार http://online4.esakal.com
Thursday, 29 September 2016 0 comments

जे सिद्ध तेच प्रसिद्ध

                         जे सिद्ध ते प्रसिद्ध 

या भूतलावर प्रत्येक सजीव प्राणी हा आपल्या अस्तित्वासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत असतो. परंतु बदलत्या काळानुसार आता अस्तित्वाच्या व्याख्याही बदलत चालल्या आहेत. सुपरफास्ट युगात स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा डायरेक्ट प्रसिद्धी कशी मिळेल याकडे ज्याचा त्याचा काळ असलेला आपणास पाहावयास मिळतो. परंतु स्वतःला प्रसिद्ध करण्याच्या या आगळ्यावेगळ्या  स्पर्धेत कौशल्य, कल्पना, महत्वाकांक्षा, वैविध्य आणि कठोर मेहनती सारख्या गुणांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. 
आतापर्यंत फक्त राजकारणी, अभिनेते,उद्योगपती आणि  मोठी मंडळी यांचा प्रसिद्धीसाठी चाललेला खटाटोप सर्वश्रुत होता परंतु आता यात सर्वसामान्यही मागे नाहीत. आजकाल तर प्रत्येकाने  आपल्यातील कलाकौशल्याना बगल देऊन 'हम किसीसे काम नही' असाच पवित्र घेतलाय.  जबाबदारीचे भान न ठेवता फेसबुक, व्हॉट्सअप आणि फ्लेक्स  वर स्वतःचा जयजयकार करून घेण्यातच धन्यता मानली जात आहे.  
यातही गमतीशीर भाग म्हणजे कर्तृत्वाने प्रसिद्ध झालेल्या माणसांकडे जग धावत येते परंतु आजकाल  कर्तृत्वशून्य माणसांना  स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जगाकडे धावून स्वतःची ओळख द्यावी लागते. 
आयुष्याला जास्त लाइट घेण्यात काहीही अर्थ नाही आपल्यातील वेगळेपण आणि आपल्यातील अगाध सामर्थ्यच आपल्याला प्रसिद्ध करू शकते. अगदी आपण शून्य असलो तरी चालेल परंतु त्या शून्याला योग्य किंमत मिळवून देण्याची क्षमता फक्त आणि फक्त आपल्यातच असते. जोपर्यंत आपल्यातील कौशल्याने आपली लायकी सिद्ध करून आपण प्रसिद्धीसाठी लायक बनत नाही तोपर्यंत नायक म्हणून मिरवण्याला काहीही अर्थ नाही. 
एक डझनभर फ्लॉप चित्रपट देऊनही स्वतःला सिद्ध करण्याचा ध्यास मनावर घेतल्यानेच आज अमिताभ बच्चन भारतीय चित्रपट सृष्टीचा महानायक म्हणून प्रसिद्ध आहे. जर अमिताभने अपयशाला कंटाळून स्वतःला सिद्ध न करता सिनेमांतून काढता पाय घेतला असता तर कदाचित आज तो जगभर इतका प्रसिद्ध झाला नसता. एक चांगला धडाडीचा फटकेबाज म्हणून क्रिकेटमध्ये प्रवेश करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने जेव्हा कर्णधार म्हणूनही स्वतःला सिद्ध केले तेव्हाच तो जगभरात एक आदर्श कर्णधार म्हणून प्रसिद्ध झाला. 
समाजात ताठ मानेनें आणि सन्मानाने जगण्यासाठी कर्तृत्वालाच प्राधान्य द्यावे लागते. नाहीतर केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नसत्या उठाठेवी केल्यास त्यातील नकलीपणा व भंपकपणाचा फुगा एक ना एक दिवस फुटतंच असतो.
चला तर मग आपल्या आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेऊन त्यांच्या संस्कारांना आदर्श मानून    स्वतःला सिद्ध करा.  मग बघा उद्या आपल्यातील सर्वसामान्य एक असामान्य होऊन जाईल आणि जग आपोआप तुमच्यामागे धावेल. 

Tuesday, 20 September 2016 0 comments

संतापाने मनस्ताप


 संतापाने मनस्ताप

आता माझी सटकली
मला राग येतोय ......
एक चित्रपटातलं हे गाणं अतिशय लोकप्रिय ठरले याचं कारण बरेचदा आपल्या स्वभावातील पैलू आपल्याला एखाद्या गीतातून व्यक्त करता आले की आपण ते नेहमीच गुणगुणतो. राग, क्रोध, संताप किंवा तिडिक या एकाच अर्थाच्या परंतु क्षणात अनर्थ करणाऱ्या गोष्टी मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात घट्ट रुजलेल्या आपणास पाहावयास मिळतात. राग ही भावना असून ती नैसर्गिक आहे परंतु या भावनेला आवर घालता येणे तसेच त्यावर विजय मिळवता येणे तितकेच गरजेचे आहे. हिंसेला खतपाणी घालणाऱ्या रागावर आपल्याला यावर घालता न आल्यास त्यातून कधीही भरून न निघणारी हानी उत्पन्न होऊ शकते.
नको रे मना क्रोध हा खेदकारी
हे मनाचे श्लोक आपण शाळेत ज्या भावनेने म्हणतो ती भावना प्रत्यक्षात राग आल्यावर  लुप्त होते  कारण मनाचे श्लोक ओठात आणि राग मनात धरण्याचा दुर्गुण आपल्या अंगी भिनलेला असतो.
आयुष्यात आलेल्या रागावर जर आपल्याला नियंत्रण करता आले नाही तर आपल्या प्रगतीला आणि प्रतिमेला निश्चितपणे मर्यादा निर्माण होतात. ओवीपेक्षा शिवीला अधिक महत्व दिले गेल्यामुळे संयमाची, समंजसपणाची व्यापकता आपोआपच लोप पावत चालली आहे.
एकदा एक गृहस्थ एक विद्वानांकडे गेले आणि सांगू लागले की, महाराज मला राग खूप येतो आणि तो राग लवकर आटोक्यात आणता येत नाही, त्यावर तुम्ही मला काहीतरी उपाय सांगा? त्यावर गुरुजींनी त्याला मनावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सल्ला दिला. गुरुजींनी त्याच्या हाती एक बर्फाचा गोळा दिला आणि विचारले तुला कसे वाटले? तो गृहस्थ म्हणाला " अतिशय थंड आणि मनाला आल्हाददायक वाटले. आता गुरुजींनी त्याचा हात हातात घेतला आणि बर्फ घेतलेली त्याची मूठ बराचवेळ तशीच दाबून धरली. आता मात्र तो माणूस मोठ्याने ओरडायला लागला आणि गुरुजींना विनवण्या करू लागला. गुरुजींनी त्याचा हात सोडला तेव्हा त्याचा हात लालबुंद आणि बधिर झाला होता. आता गुरुजी बोलू लागले " राग हा नैसर्गिक असतो अगदी  या बर्फासारखा, थोडा वेळ येऊन गेला तर थंडावा देतो मात्र अधिक वेळ त्यालाच धरून बसल्यास मात्र इजा होण्याचा धोका संभवतो.
आपल्या आयुष्यातही बरेचदा असंच होतं रागरूपी बर्फ भावना व्यक्त कारण्यापुररता तात्पुरता हाती न घेतल्यामुळे  आपल्यालाच त्यातून नुकसान होत असते.
ऑफिसमध्ये  वरिष्ठांवर राग व्यक्त करू न शकल्याने बॉस ज्युनिअरवर  रागवतात. आपण घरी जाऊन बॉसचा राग आपल्या कुटुंबियांवर काढतो. मग त्यातून विस्फोट होऊन घरादारात अशांती निर्माण होते. सकाळी एखाद्या किरकोळ गोष्टीवरून झालेली चिडचिड आणि राग आपल्या संपूर्ण दिवसाला निराशेच्या खाईत लोटत असतो.१४ मिनिटांच्या रागाचे दुष्परिणाम १४ वर्षापर्यंतच्या कारावासात कसे घालवावे लागतात यावर काही दिवसांपूर्वी येऊन गेलेला बाबांची शाळा नामक चित्रपट  बराच काही शिकवून जातो.
म्हणूनच आपल्या रागाला वेळीच वाट मोकळी करून द्यावी व त्याचा पूर्णपणे निचरा करावा नाहीतर त्याचे दूरगामी दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात.  विपश्यना, ध्यान, योगा, प्राणायाम आणि मानसिक नियंत्रण अशा गोष्टींनी तयार केलेलं मन रागावर चांगल्याप्रकारे नियंत्रण करू शकते.

थोडक्यात रागाचा उगम त्याची कक्षा  याचा शोध आणि बोध  आपणच आपापल्यापरीने घेतला पाहिजे.  सकारात्मक विचार आणि संयम याच्या  साहाय्याने रागाने आपला ताबा घेण्यापूर्वीच आपण रागावर ताबा मिळवल्यास आपल्यासारखे सुखी आपणच असू.

सागर नवनाथ ननावरे 
पुणे 
Saturday, 10 September 2016 0 comments

संस्कारांच्या जगात

संस्कारांच्या जगात 

कालपरवा असाच रस्त्यावरून भाजी घेऊन घराच्या दिशेने निघालो होतो. समोरून दोन जेष्ठ नागरिक रस्ता ओलांडत होते तेवढ्यात समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराचा कट मारला त्यातील एक गृहस्थ धक्क्याने जागीच कोसळले. आजूबाजूला असणाऱ्या आम्ही ठराविक लोकांनी त्यांना अलगद उचलून जागी उभे केले फारसे काही लागले नव्हते परंतु थोडेसे खरचटले होते. आम्ही त्यांना सावरतच  होतो तेवढ्यात तो तरुण गाडी वळवून त्या गृहस्थांच्या दिशेने आला आणि उर्मटपणे बोलू लागला. त्या तरुणाच्या मागे बसलेली तरुणीही  मोठ्या अरेरावीने त्या दोघं गृहस्थांना बोलू लागली. न राहवून ते बाबा बोलून गेले," अरे आमचं वय झालंय तुम्ही तर धडधाकट आहेत ना? आई बाबांनी हेच संस्कार शिकवलेत का ? असे म्हणता क्षणीच त्या तरुणाचा पार चढला आणि तो बाबांच्या दिशेने रागात धावत आला. आजूबाजूच्या बघ्यांनी त्या दोघांना कसेबसे आवरले परंतु  दोघेही तरुण तरुणी असभ्य भाषेत  त्या गृहस्थांना शिवीगाळ करतच होते. 

काही वेळाने आमच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आली आणि ते दोघे गृहस्थ आपल्या वाटेने आणि हे दोघे राजाराणी एकमेकांना बिलगून भरधाव वेगाने बाईक वर बसून निघून गेले.

या साऱ्या प्रकाराने मी मात्र कमालीचा अस्वस्थ झालो मनात विचारांनी थैमान घातले. हेच का आजचे संस्कार ? पडलेल्या व्यक्तीला उठवायचे सोडून त्याच्याच अंगावर धावून जायचे हीच का शिकवण? मोठया मेहनतीने आणि जिद्दीने आईबाबा मुलांना शिकवतात ते याच परतफेडीसाठी का?

आणि याच जागी त्यांच्या घरातील कोणी वयोवृद्ध असते तर ?

आपल्या संस्कारांवरच देशाचे भवितव्य उज्वल होणार आहे याची आजच्या बिघडलेल्या तरुणाईला जाणीव होण्याची गरज आहे. आपले संस्कार हे आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करीत असतात आणि त्यातूनच आपली प्रगती होत असते. चांगल्या  संस्कारमय पिढ्या घडल्या तरच  संस्कारांमुळे आपली संस्कृती टिकून राहणार आहे. युवाशक्तीला चांगल्या शिक्षणाबरोबरच संस्काराचीही जोड मिळाल्यास हीच युवाशक्ती देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवू शकते.

रयतेचे स्वराज्य निर्माण झाले ते शिवबांच्या पराक्रमामुळे आणि त्यांच्यावर असणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या संस्कारांमुळेच. आणि ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा संपन्न वारसा लाभला त्या मातीत राहून जर आपण त्या संस्कारांची जपणूक नाही केली तर काय उपयोग होणार?

चांगले विचार,चांगल्या सवयी, सामाजिक बांधिलकीची जाणीव, जेष्ठा वरिष्ठांचा आदर आणि जबाबदारीचे भान  यासारख्या संस्करांनीच आपले भविष्य सुजलाम सुफलाम होणार आहे.  

चला तर मग एक चांगला माणूस आणि एक जबाबदार नागरिक म्हणून चांगल्या संस्कारांनी आपल्या व्यक्तिमत्वाला अर्थपूर्ण आकार देऊया. 

Monday, 5 September 2016 0 comments

गणेशोत्सवाच्या आणि शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

   गणेशोत्सवाच्या आणि शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

Tuesday, 30 August 2016 0 comments

आदर्श हवाच

                               आदर्श हवाच 

कोणत्याही व्यक्तीची जडणघडण ही तो जन्मापासून करत असलेल्या अनुकरणातून होत असते. कोणीही जनताच वेगळ्या धाटणीचा किंवा वेगळ्या विचारसरणीचा नसतो इतरांच्या अनुकरणानेच माणूस शहाणा होत असतो. पुढे जाऊन जसजसे वय वाढते तसतशी अनुकरणाची जागा एक संकल्पना घेते आणि ती म्हणजे 'आदर्शवाद'. आपल्या मनावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तिमत्वाचा किंवा घटनेचा आदर्श घेऊन आपण आयुष्य जगात असतो. छात्र अध्यापकाची पदविका घेत असताना आम्हाला मानसशास्त्र विषयात एक आदर्शवादाचा सिद्धांत होता. ज्यामध्ये आपण ज्या व्यक्तीला आदर्श मानतो त्या व्यक्तीच्या विचारांचा आणि वर्तनाचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. 
 याचाच चांगलाच प्रत्यय मला मागील आठवड्यात आला,
माझा एक मित्र एका सिने अभिनेत्याचा अगदी जबरा फॅन  नेहमी त्याचेच अनुकरण करणारा. त्याच्या प्रत्येक गोष्टीत स्वतःला त्याच्यासारखे ठेवू पाहणारा थोडक्यात काय तर त्याला स्वतःचा आदर्श मानणारा. कालपरवा तो मित्रांबरोबर गडावर फिरायला गेला आणि तिथे पाय घसरून पडला म्हणून त्याला पाहायला मी त्याच्या घरी गेलो. आणि मी त्याला विचारले हे असं कसं काय झाले ? त्यावर शेजारी बसलेला त्याचा मित्र हसत हसत सांगू लागला,' काय सांगायचं साहेब एका उंच पायरीवर उभे राहून सेल्फी काढताना आवडत्या हिरोची ऍक्शन करायला गेला आणि घेतला हात मोडून, मला हसावे की रडावे काही कळेना.
शिवरायांचा इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडावर गेलेला एक तरुण अवघ्या जगाला आदर्श देणाऱ्या शिवछत्रपतींचा आदर्श घेण्यापेक्षा असा विचित्र आदर्श कसा घेऊ शकतो?

मी विचार करू लागलो सिनेमाप्रेमात किंवा चुकीच्या गोष्टींत आपण इतके आंधळे होतो की आपल्याला चांगल्या वाईटाचा विसरच पडून जातो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या गुरुसोबतच एक आदर्श व्यक्तीही असतो एक असा व्यक्ती की जो प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात त्याच्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. 
म्हणूनच प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्वात आणि आपल्या विचारशैलीत सकारात्मक बदल घडवून आणेल असाच आदर्श आपल्या नजरेसमोर ठेवायला हवा. आपली येणारी पिढी हीसुद्धा आपल्या अनुकरणातूनच स्वतःचे भवितव्य अजमावणार आहे त्यामुळे याचे भान ठेवूनच आपले आचरण आपण ठेवायला हवे. अभिनेते, नेते, उद्योगपती किंवा समाजसेवक कोणीही असो फक्त त्यांच्यातील चांगल्या गोष्टीचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाला एक नवा आकार देणे हे शेवटी आपल्याच हाती असते. सलमान खानला युथ आयडॉल म्हणवणाऱ्यांनी सुदृढ शरीरयष्टीसाठी किंवा दानशूरपणासाठीच फक्त त्याचा आदर्श ठेवावा त्याच्याप्रमाणे गाडी चालवण्याचा प्रयत्न केल्यास काय परिणाम होतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भारतासारख्या विशाल देशात जगाला आपली दाखल घ्यायला लावणारे अनेक दिग्ग्ज व्यक्तिमत्व होऊन गेली किंबहुना आजही सक्रिय आहेत आपण त्यांचाच आदर्श घ्यायला हवा. 
शेवटी आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते एकदाच मिळत असतं त्यामुळे मिळालेल्या आयुष्यात आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा कसा आणि कोणाचा आदर्श घेऊन उमटवायचा हे आपल्याच हाती आहे. चला तर मग एक अशा आदर्श आपल्यासमोर ठेऊया ज्याच्या आचार विचारांच्या जडणघडणीतून उद्या लोक आपल्याला आदर्शस्थानी ठेवतील. 
Saturday, 20 August 2016 0 comments

फ़िर मिलेंगे चलते चलते.........चला माणसे जोडूया

                          फ़िर मिलेंगे चलते चलते.........

कालपरवाच एक विचार ऐकण्यात आला जो मनाला अजिबात पटला नाही, तो विचार होता आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा.नाहीतर तासभर साथ देणारी माणसं बस मध्ये पण भेटतात. 
याचाच सरळसरळ अर्थ असाही होतो की फक्त कामापुरती माणसे जोडा. पण आपण जर फक्त कामापुरतीच माणसे जोडली तर भले पैसापाणी अमाप कमवू परंतु तुटपुंजी माणुसकी   मात्र नक्कीच आपल्याही वाट्याला येईल. 
खरं तर आपल्याला एकदाच मिळालेल्या सुंदर आयुष्यात आपण पैशाने फक्त वलय प्राप्त होते परंतु त्याबरोबरच जोडलेल्या माणसांमुळेच आपल्या आयुष्याची समृद्धी ठरत असते.  माणसे जोडणे हि एक कला आहे, एक अशी कला कि जी विनाभांडवल आणि बिनपैशानेसुद्धा आत्मसात करता येते. 
एक दिवस असाच आमचा संपूर्ण स्टाफ जेवायला बसला होता आणि त्यात विषय चालला होता माणसांचा आणि माणुसकीचा. या विषयावर प्रत्येकजण अपप्ल्याला आलेले अनुभव तिथे शेअर करत होता. त्यात आमच्या  सरांनी त्यांच्या ऐकण्यात आलेली माणसे जोडण्याची  एक सुंदर गोष्ट आम्हाला सांगितली आणि ती गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते.
एके दिवशी एका कंपनीचा एक वरिष्ठ अधिकारी कंपनीत बराचवेळ मशीनच्या ऑपरेटिंगचे काम करत बसला होता. पाहता पाहता खूप उशीर झाला सर्वजण आपापली कामे  उरकून एव्हाना  घराकडे परतली होती. 
अचानक त्या कंपनीतील एका मशीनमध्ये बिघाड झाला आणि त्या मशिनच्या एका धोकादायक  भागात तो अधिकारी अडकून पडला. तो जीवाच्या आकांताने मोठमोठ्याने "मला वाचवा मला वाचवा …मि इथे अडकून पडलोय....... कुणीतरी  मला वाचवा प्लीज  " असे ओरडू लागला. परंतु मशिनच्या आवाजाने त्याच्या विनवण्या दुर्दैवाने कुणाच्याही कानावर गेल्या नाहीत. देवाचा जप केला प्रार्थना केल्या परंतु तास उलटून गेला मात्र त्याला आशेचा कोणताच किरण दिसेना. परिणामी परिस्थितीशी हतबल झालेल्या त्या अधिकार्याला येणाऱ्या काही वेळात त्याचा अंत होणार याची पुरेपूर खात्री झाली होती.  
तेवढ्यात त्याला एका माणसाचा अस्पष्ट आवाज ऐकू आला "साहेब ओ साहेब कुठे आहात तुम्ही?"
तसे त्या अधिकार्याने पुन्हा एकदा पूर्ण जीव लावून ओरडण्यास सुरुवात केली. तो ओरडण्याचा आवाज ऐकताच तो माणूस त्या आवाजाच्या दिशेने धावत गेला आणि त्याने त्या अधिकार्याला त्या मशीनमधून शर्थीने बाहेर काढले.
तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून त्या कंपनीचा वॉचमन होता. त्या अधिकार्याने त्याचे आभार मानून त्याला विचारले  " तू गेटवर कामाला आहेस तुला आत यायची परवानगी नाही तरी तू इथे मला वाचवायला आलास, तुला कसे कळले कि मी आत आहे ते?
त्यावर तो  वॉचमन उदगारला " साहेब या कंपनीत तुम्ही एकटेच असे साहेब आहात कि जे रोज येताजाता मला हसतमुखाने नमस्कार करता. आज तुम्ही आत जाताना दिसले परंतु परत बाहेर येताना दिसले नाहीत आणि बराच वेळही निघून गेला म्हणून म्हटलं नक्कीच काहीतरी गडबड असणार...!
त्या माणसाला गहिवरून आले  आपण इतरांच्या मनात माणुसकीच्या नात्याने पेरलेल्या बियाणाने   आज त्याला जीवनदानरुपी फळ दिले होते. 

म्हणूनच आपल्या आयुष्यात रोज येणारा किंवा योगायोगाने काही क्षणांपुरता येणारा प्रत्येक माणूस हा तितकाच महत्वाचा असतो. म्हणून माणूस कोणताही आणि कसाही असो माणूस हा माणसाची भविष्यकाळातील शिदोरी असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात येणारा माणूस मग तो उच्च- नीच, श्रेष्ठ- कनिष्ठ, किंवा कसाही असो प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासता आले पाहिजेत. कारण बर्याचवेळा मूर्तीत देव शोधण्याच्या अट्टाहासापायी आपली  मानवरूपात आलेल्या देवदूताला नाकारण्याची चुक आपल्याला संकटांच्या खाईत लोटू शकते. माणसांच्या आयुष्याची किंमत हि त्याच्या पैसा किंवा प्रतिष्ठेवर ठरत नसून त्याच्या कठीण प्रसंगात धावून येणार्यांच्या संख्येवर समजत असते. 
चला तर मग आपल्या मनाच्या कोपर्यात  धूळ खात पडलेल्या त्या माणुसकीच्या चुंबकाला  माणसे जोडण्यासाठी एक नवी उर्जा देऊया. समोरच्या व्यक्तीला हास्य देऊन, त्याचे मनापासून कौतुक करून, वेळप्रसंगी आभार मानून आणि आपणहून पुढाकार घेऊन उद्याच्या निस्वार्थी व सुंदर नात्याची गुंफण करूया.
हम है राही प्यार के ……फ़िर मिलेंगे चलते चलते.........


सागर नवनाथ ननावरे 
sagar nanaware

 
;