Thursday, 29 September 2016

जे सिद्ध तेच प्रसिद्ध

                         जे सिद्ध ते प्रसिद्ध 

या भूतलावर प्रत्येक सजीव प्राणी हा आपल्या अस्तित्वासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत असतो. परंतु बदलत्या काळानुसार आता अस्तित्वाच्या व्याख्याही बदलत चालल्या आहेत. सुपरफास्ट युगात स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा डायरेक्ट प्रसिद्धी कशी मिळेल याकडे ज्याचा त्याचा काळ असलेला आपणास पाहावयास मिळतो. परंतु स्वतःला प्रसिद्ध करण्याच्या या आगळ्यावेगळ्या  स्पर्धेत कौशल्य, कल्पना, महत्वाकांक्षा, वैविध्य आणि कठोर मेहनती सारख्या गुणांकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. 
आतापर्यंत फक्त राजकारणी, अभिनेते,उद्योगपती आणि  मोठी मंडळी यांचा प्रसिद्धीसाठी चाललेला खटाटोप सर्वश्रुत होता परंतु आता यात सर्वसामान्यही मागे नाहीत. आजकाल तर प्रत्येकाने  आपल्यातील कलाकौशल्याना बगल देऊन 'हम किसीसे काम नही' असाच पवित्र घेतलाय.  जबाबदारीचे भान न ठेवता फेसबुक, व्हॉट्सअप आणि फ्लेक्स  वर स्वतःचा जयजयकार करून घेण्यातच धन्यता मानली जात आहे.  
यातही गमतीशीर भाग म्हणजे कर्तृत्वाने प्रसिद्ध झालेल्या माणसांकडे जग धावत येते परंतु आजकाल  कर्तृत्वशून्य माणसांना  स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जगाकडे धावून स्वतःची ओळख द्यावी लागते. 
आयुष्याला जास्त लाइट घेण्यात काहीही अर्थ नाही आपल्यातील वेगळेपण आणि आपल्यातील अगाध सामर्थ्यच आपल्याला प्रसिद्ध करू शकते. अगदी आपण शून्य असलो तरी चालेल परंतु त्या शून्याला योग्य किंमत मिळवून देण्याची क्षमता फक्त आणि फक्त आपल्यातच असते. जोपर्यंत आपल्यातील कौशल्याने आपली लायकी सिद्ध करून आपण प्रसिद्धीसाठी लायक बनत नाही तोपर्यंत नायक म्हणून मिरवण्याला काहीही अर्थ नाही. 
एक डझनभर फ्लॉप चित्रपट देऊनही स्वतःला सिद्ध करण्याचा ध्यास मनावर घेतल्यानेच आज अमिताभ बच्चन भारतीय चित्रपट सृष्टीचा महानायक म्हणून प्रसिद्ध आहे. जर अमिताभने अपयशाला कंटाळून स्वतःला सिद्ध न करता सिनेमांतून काढता पाय घेतला असता तर कदाचित आज तो जगभर इतका प्रसिद्ध झाला नसता. एक चांगला धडाडीचा फटकेबाज म्हणून क्रिकेटमध्ये प्रवेश करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने जेव्हा कर्णधार म्हणूनही स्वतःला सिद्ध केले तेव्हाच तो जगभरात एक आदर्श कर्णधार म्हणून प्रसिद्ध झाला. 
समाजात ताठ मानेनें आणि सन्मानाने जगण्यासाठी कर्तृत्वालाच प्राधान्य द्यावे लागते. नाहीतर केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नसत्या उठाठेवी केल्यास त्यातील नकलीपणा व भंपकपणाचा फुगा एक ना एक दिवस फुटतंच असतो.
चला तर मग आपल्या आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेऊन त्यांच्या संस्कारांना आदर्श मानून    स्वतःला सिद्ध करा.  मग बघा उद्या आपल्यातील सर्वसामान्य एक असामान्य होऊन जाईल आणि जग आपोआप तुमच्यामागे धावेल. 

0 comments:

Post a Comment

 
;