Tuesday, 20 September 2016

संतापाने मनस्ताप


 संतापाने मनस्ताप

आता माझी सटकली
मला राग येतोय ......
एक चित्रपटातलं हे गाणं अतिशय लोकप्रिय ठरले याचं कारण बरेचदा आपल्या स्वभावातील पैलू आपल्याला एखाद्या गीतातून व्यक्त करता आले की आपण ते नेहमीच गुणगुणतो. राग, क्रोध, संताप किंवा तिडिक या एकाच अर्थाच्या परंतु क्षणात अनर्थ करणाऱ्या गोष्टी मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात घट्ट रुजलेल्या आपणास पाहावयास मिळतात. राग ही भावना असून ती नैसर्गिक आहे परंतु या भावनेला आवर घालता येणे तसेच त्यावर विजय मिळवता येणे तितकेच गरजेचे आहे. हिंसेला खतपाणी घालणाऱ्या रागावर आपल्याला यावर घालता न आल्यास त्यातून कधीही भरून न निघणारी हानी उत्पन्न होऊ शकते.
नको रे मना क्रोध हा खेदकारी
हे मनाचे श्लोक आपण शाळेत ज्या भावनेने म्हणतो ती भावना प्रत्यक्षात राग आल्यावर  लुप्त होते  कारण मनाचे श्लोक ओठात आणि राग मनात धरण्याचा दुर्गुण आपल्या अंगी भिनलेला असतो.
आयुष्यात आलेल्या रागावर जर आपल्याला नियंत्रण करता आले नाही तर आपल्या प्रगतीला आणि प्रतिमेला निश्चितपणे मर्यादा निर्माण होतात. ओवीपेक्षा शिवीला अधिक महत्व दिले गेल्यामुळे संयमाची, समंजसपणाची व्यापकता आपोआपच लोप पावत चालली आहे.
एकदा एक गृहस्थ एक विद्वानांकडे गेले आणि सांगू लागले की, महाराज मला राग खूप येतो आणि तो राग लवकर आटोक्यात आणता येत नाही, त्यावर तुम्ही मला काहीतरी उपाय सांगा? त्यावर गुरुजींनी त्याला मनावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सल्ला दिला. गुरुजींनी त्याच्या हाती एक बर्फाचा गोळा दिला आणि विचारले तुला कसे वाटले? तो गृहस्थ म्हणाला " अतिशय थंड आणि मनाला आल्हाददायक वाटले. आता गुरुजींनी त्याचा हात हातात घेतला आणि बर्फ घेतलेली त्याची मूठ बराचवेळ तशीच दाबून धरली. आता मात्र तो माणूस मोठ्याने ओरडायला लागला आणि गुरुजींना विनवण्या करू लागला. गुरुजींनी त्याचा हात सोडला तेव्हा त्याचा हात लालबुंद आणि बधिर झाला होता. आता गुरुजी बोलू लागले " राग हा नैसर्गिक असतो अगदी  या बर्फासारखा, थोडा वेळ येऊन गेला तर थंडावा देतो मात्र अधिक वेळ त्यालाच धरून बसल्यास मात्र इजा होण्याचा धोका संभवतो.
आपल्या आयुष्यातही बरेचदा असंच होतं रागरूपी बर्फ भावना व्यक्त कारण्यापुररता तात्पुरता हाती न घेतल्यामुळे  आपल्यालाच त्यातून नुकसान होत असते.
ऑफिसमध्ये  वरिष्ठांवर राग व्यक्त करू न शकल्याने बॉस ज्युनिअरवर  रागवतात. आपण घरी जाऊन बॉसचा राग आपल्या कुटुंबियांवर काढतो. मग त्यातून विस्फोट होऊन घरादारात अशांती निर्माण होते. सकाळी एखाद्या किरकोळ गोष्टीवरून झालेली चिडचिड आणि राग आपल्या संपूर्ण दिवसाला निराशेच्या खाईत लोटत असतो.१४ मिनिटांच्या रागाचे दुष्परिणाम १४ वर्षापर्यंतच्या कारावासात कसे घालवावे लागतात यावर काही दिवसांपूर्वी येऊन गेलेला बाबांची शाळा नामक चित्रपट  बराच काही शिकवून जातो.
म्हणूनच आपल्या रागाला वेळीच वाट मोकळी करून द्यावी व त्याचा पूर्णपणे निचरा करावा नाहीतर त्याचे दूरगामी दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात.  विपश्यना, ध्यान, योगा, प्राणायाम आणि मानसिक नियंत्रण अशा गोष्टींनी तयार केलेलं मन रागावर चांगल्याप्रकारे नियंत्रण करू शकते.

थोडक्यात रागाचा उगम त्याची कक्षा  याचा शोध आणि बोध  आपणच आपापल्यापरीने घेतला पाहिजे.  सकारात्मक विचार आणि संयम याच्या  साहाय्याने रागाने आपला ताबा घेण्यापूर्वीच आपण रागावर ताबा मिळवल्यास आपल्यासारखे सुखी आपणच असू.

सागर नवनाथ ननावरे 
पुणे 

0 comments:

Post a Comment

 
;