Saturday, 10 September 2016

संस्कारांच्या जगात

संस्कारांच्या जगात 

कालपरवा असाच रस्त्यावरून भाजी घेऊन घराच्या दिशेने निघालो होतो. समोरून दोन जेष्ठ नागरिक रस्ता ओलांडत होते तेवढ्यात समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराचा कट मारला त्यातील एक गृहस्थ धक्क्याने जागीच कोसळले. आजूबाजूला असणाऱ्या आम्ही ठराविक लोकांनी त्यांना अलगद उचलून जागी उभे केले फारसे काही लागले नव्हते परंतु थोडेसे खरचटले होते. आम्ही त्यांना सावरतच  होतो तेवढ्यात तो तरुण गाडी वळवून त्या गृहस्थांच्या दिशेने आला आणि उर्मटपणे बोलू लागला. त्या तरुणाच्या मागे बसलेली तरुणीही  मोठ्या अरेरावीने त्या दोघं गृहस्थांना बोलू लागली. न राहवून ते बाबा बोलून गेले," अरे आमचं वय झालंय तुम्ही तर धडधाकट आहेत ना? आई बाबांनी हेच संस्कार शिकवलेत का ? असे म्हणता क्षणीच त्या तरुणाचा पार चढला आणि तो बाबांच्या दिशेने रागात धावत आला. आजूबाजूच्या बघ्यांनी त्या दोघांना कसेबसे आवरले परंतु  दोघेही तरुण तरुणी असभ्य भाषेत  त्या गृहस्थांना शिवीगाळ करतच होते. 

काही वेळाने आमच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आली आणि ते दोघे गृहस्थ आपल्या वाटेने आणि हे दोघे राजाराणी एकमेकांना बिलगून भरधाव वेगाने बाईक वर बसून निघून गेले.

या साऱ्या प्रकाराने मी मात्र कमालीचा अस्वस्थ झालो मनात विचारांनी थैमान घातले. हेच का आजचे संस्कार ? पडलेल्या व्यक्तीला उठवायचे सोडून त्याच्याच अंगावर धावून जायचे हीच का शिकवण? मोठया मेहनतीने आणि जिद्दीने आईबाबा मुलांना शिकवतात ते याच परतफेडीसाठी का?

आणि याच जागी त्यांच्या घरातील कोणी वयोवृद्ध असते तर ?

आपल्या संस्कारांवरच देशाचे भवितव्य उज्वल होणार आहे याची आजच्या बिघडलेल्या तरुणाईला जाणीव होण्याची गरज आहे. आपले संस्कार हे आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करीत असतात आणि त्यातूनच आपली प्रगती होत असते. चांगल्या  संस्कारमय पिढ्या घडल्या तरच  संस्कारांमुळे आपली संस्कृती टिकून राहणार आहे. युवाशक्तीला चांगल्या शिक्षणाबरोबरच संस्काराचीही जोड मिळाल्यास हीच युवाशक्ती देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवू शकते.

रयतेचे स्वराज्य निर्माण झाले ते शिवबांच्या पराक्रमामुळे आणि त्यांच्यावर असणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या संस्कारांमुळेच. आणि ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा संपन्न वारसा लाभला त्या मातीत राहून जर आपण त्या संस्कारांची जपणूक नाही केली तर काय उपयोग होणार?

चांगले विचार,चांगल्या सवयी, सामाजिक बांधिलकीची जाणीव, जेष्ठा वरिष्ठांचा आदर आणि जबाबदारीचे भान  यासारख्या संस्करांनीच आपले भविष्य सुजलाम सुफलाम होणार आहे.  

चला तर मग एक चांगला माणूस आणि एक जबाबदार नागरिक म्हणून चांगल्या संस्कारांनी आपल्या व्यक्तिमत्वाला अर्थपूर्ण आकार देऊया. 

0 comments:

Post a Comment

 
;