" स्मार्टफोन वरचा
'सेल्फि'शपणा "
-सागर नवनाथ ननावरे (12/12/15)
असं म्हणतात टेक्नॉलॉजीमुळे जग जवळ आलंय,जगाचे माहित नाही पण स्मार्टफोन मात्र
सर्वांच्या जवळ आले आहेत. स्मार्टफोन ही प्रत्येकाची त्यातल्या त्यात तरुणाईची मुलभूत गरज होऊन बसली आहे. पूर्वी स्वतःसाठी,कुटुंबासाठी
झटणारे आता " फोन के लिये साला कुछ भी करेगा' अशा अविर्भावात वागत आहेत. सध्याच्या
युगात कामाचा व्याप व वेग पाहता आपण नवनवीन
टेक्नॉलॉजी व बदल नाकारु शकत नाही
! स्मार्ट फोनचा योग्य वापर योग्य वेळी करुन आपण ई-मेल,सोशल मिडीया,गुगल सर्च व स्मार्ट
फोनचा उपयोग कॉम्प्युटर किंवा कामात मदतनीस म्हणुन केल्यास ते एक अत्याधुनिक वरदानच
म्हणता येईल.
दुर्दैव इतकंच स्मार्टफोन जवळ येऊनही माणूस अजूनही 'स्मार्ट'' झालेला नाही,
कारण कोनती गोष्ट कशासाठी,कितीवेळ आणि कशाप्रकारे वापरावी हे अजून कुणाला समजलेच नाही.
काही दिवसांपूर्वीच व्होट्सअपवर वाचनात
आलं आणि मन अस्वस्थ झालं ,रेल्वेप्रवासात दाराला लटकून प्रवास करताना एकाला आपला जीव
गमवावा लागला. पण यापेक्षाही पुढची हद्द म्हणजे त्याला हात देण्याऐवजी,आधार देण्याऐवजी
आजची 'सेल्फी'श' तरुणाई त्याच्या जीवासाठी चालणाऱ्या धडपडीचे मोबाईल वर शुटींग करत
होती. हीच का ती टेक्नॉलॉजी माणसाच्या जीवावर बेतणारी, माणसाला माणुसकीपासून दूर नेणारी?
आजकाल अशा बर्याच घटना आपल्या आजूबाजूला घडतात आणि त्या याच टेक्नॉलॉजीमुळे
आपणापर्यंत पोहोचतातही पण प्रश्न एवढाच पडतो कि एखाद्याच्या मदतीसाठी धावण्याऐवजी त्याच्या
मोबाईल शुटींगसाठी लोकं एवढे का धावतात?
हीच वेळ जर आपल्या कोणावर आली आणि त्यावेळीही असाच अनुभव आल्यावरच आपण शहाणे
होणार का?
ज्या शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी,गोरगरिबांच्या रक्षणासाठी हाती तलवार
घेतली आणि स्वराज्याची स्थापना केली त्या शिवबाच्या भूमीतील त्याचे वारसदार हाती स्मार्टफोन
घेऊन विकृतीला आळा घालण्याऐवजी त्याचे चित्रण करतात हाच का आपला वारसा?
आपल्या आया बहिणींवर हात टाकणाऱ्यांचे हात छाटण्याची शिकवण ज्या शिवबाने दिली
त्याच्याच भूमीत स्त्रियांवर अत्याचार करून तेच हात स्मार्टफोनने अश्लील चित्रण करतात
हीच का आमची संस्कृती?
आजकाल प्रत्येकजण आपल्या सेल्फी'त इतका गुंतलाय कि त्या वरवरच्या सुंदर दिसणाऱ्या
सेल्फिने आपलं अंतर्मन मात्र पूर्ण पोखरून टाकलंय. माणुसकी,आपुलकी,परोपकार आणि प्रेमाची
जागा आज स्मार्टफोनच्या 'सेल्फि'शपणाने केव्हाच आपल्या मेमरीतून डिलीट केलीय. लोकांच्या
हृदयात राहण्याऐवजी मोबाईलवर ऑनलाईन राहण्यातच जो तो मश्गुल आहे.
आपल्या शरीरावर प्रेम करणारी,व्यायाम करून शरीराच्या अब्स साठी धडपडणारी तरुणाई
आज मोबाईल मधल्या अप्स साठी धडपडतेय कसे राहणार हे फिट. मैदानी खेळांनी चपळ आणि सशक्त
असणारी तरुणाई आज तरुणाई चष्मा लागेपर्यंत आणि डोक्याचे सपाट मैदान होईपर्यंत स्मार्टफोन
वर गेम्स खेळतात हेच का आमच्या देशाचे भवितव्य?
व्होट्स अप वर डीपी ठेऊन थोरांना मानवंदना देण्यात कसला आलाय देशाभिमान?
निषेद किंवा समर्थनाच्या पोस्ट शेअर करून स्वतःच्या पुचकट योगदानाची साक्ष
देण्यात कसली आलीय मर्दुमकी?
आणि फोटो एडीट करून चमकवून फेसबुक
वर टाकून स्वतःच्या दोषांवर पांघरून घालण्यात कसले शहाणपण?
मित्रांनो बदल आणि टेक्नॉलजी नक्कीच मानवाच्या जीवनात बदल घडवू शकते पण हीच
टेक्नॉलजी आपल्याला चुकीच्या सवयीचे गुलाम सुद्धा बनवू शकते.
अजूनही वेळ गेली नाही आपल्या आयुष्यात आपल्याला शेवटपर्यंत साथ देणाऱ्या माणसांना
स्मार्टफोनच्या 'सेल्फि'शपणामुळे दुरावण्यात काहीही अर्थ नाही. कारण आयुष्य खूप सुंदर
असलं तरी ते एकदाच मिळतं हे विसरून चालणार नाही. त्यामुळे या एकदाच मिळालेल्या सुंदर
आयुष्यात वेळ,पैसा आणि बुद्धी स्मार्टफोनच्या अतिव्यस्त मायाजाळात वाया घालवून हाती
काहीही लागणार नाही. शेवटी कुठे थांबायचे
आणि काय करायचे ते आपण आपलेच ठरवायचे आहे.
लेखन आणि संकल्पना: सागर नवनाथ
ननावरे
पत्ता: बालाजीनगर,धनकवडी,पुणे
Blog: sagarnanaware.blogspot.in