Friday, 12 September 2014

छत्तीस गुणांपेक्षा दोघांची मनं जुळायला हवीत

आपला वर्षातून एकदा येणारा वाढदिवस पती-पत्नीनं आनंदानं साजरा करावा. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची आठवणही एकमेकांना करून द्यावी. त्या दिवसाचं औचित्य साधून पतीनं पत्नीला सुंदर सुगंधी फुलांचा गजरा अथवा अचानक एखादी भेटवस्तू देऊन प्रेमळ जाणीव करून दिली, तर पत्नी त्या प्रसंगानं सुखावेल.आपला छोटासा आटोपशीर सुखी संसार आदर्श होण्यासाठी पती-पत्नीतील अतूट नातं मधुर असणं आवश्‍यक असतं. त्यासाठी दोघांनीही एकमेकांशी आदरपूर्वक व स्नेहानं वागलं पाहिजे. लग्नाबद्दल प्रत्येक मुलामुलीच्या मनात एक सुंदर स्वप्न असतं. बहुतेक वेळा लग्नानंतर काही जोडप्यांच्या बाबतीत ती स्वप्नं उमलण्याआधीच कठोर वास्तवाच्या धगीनं करपून जातात. लग्नानंतर आपल्या साऱ्या आवडीनिवडी बासनात गुंडाळून ठेवाव्या लागतात. त्यामुळं संसार करताना या प्रेमसागराला ओहोटी आल्यासारखं वाटतं. अशा वेळी मानसिक खच्चीकरण करणारे शब्द टाळावेत अन्‌ एकमेकांना भरभक्कम आधार देण्यासाठी पुढं यावं.
नोकरीच्या मागे अखंडपणे धावत असताना अथवा व्यवसाय सांभाळताना आपल्या सांसारिक जीवनात आनंद व संसारसुख मिळविण्यासाठीच मनुष्य आयुष्यभर वणवण भटकत असतो. काही वेळा घराच्या सुखरूपतेबरोबरच कुटुंबातील नाती, प्रतिष्ठा आणि ऐश्‍वर्य जपण्याचा पतिपत्नी प्रयत्न करतात; पण प्रेमाचे दोन गोड शब्द आणि एकमेकांची मनं समजून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, तर वादळं उठतात. मन फुलासारखं नाजूक असतं, ते फुलवायचं कसब ज्या स्त्री-पुरुषांकडे असतं, तेच एकमेकांचे सर्वस्व बनू शकतात. पण सांसारिक जीवनात काय होतं, कुणालाच कळत नाही. शरीर दृश्‍य असलं, तरी मन अदृश्‍य असतं. त्या शरीराला शृंगारसुख दिलं की आपली जबाबदारी पूर्ण होत नाही, तर शरीरसुखापेक्षा एकमेकांची मनं जुळायला हवीत आणि पती-पत्नीनं एकमेकांची मनं जिंकायला हवीत. एकमेकांवर मनापासून प्रेम करावं आणि एकमेकांवरचा विश्‍वास वृद्धिंगत करावा. दोन भिन्न वातावरणातून दोन भिन्न स्वभावाची माणसं जेव्हा एक होतात, तेव्हा वाद होणारच. भांड्याला भांडं लागणारच. त्या वादातून एकमेकांची मनं दुखावल्यास अथवा गेलाच चुकून एखादा शब्द तरी पाठीवर आधाराचा हात द्यावा व दोघांनीही माफी मागून कलह दूर करण्याचा प्रयत्न करावा. कुटुंबासाठी कष्ट उपसताना दोघांनीही आपल्या शरीराची योग्य काळजी घ्यावीच. आपल्या प्रकृती व शरीरसौंदर्याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य वेळी साजेसा, सकस आणि समतोल आहार घेण्याचा प्रयत्न करावा. कारण एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वविकासाबरोबरच कुटुंबाचा विकास जास्त महत्त्वाचा असतो.
रसंगानुरूप पती-पत्नीनं एकमेकांच्या सौंदर्याची, सुप्त गुणांची अथवा कलागुणांची भरभरून प्रशंसा करावी. एखाद्यानं चांगलं काम केलं, तर दोघांनीही एकमेकांचं कौतुक करावं व पुढील चांगल्या कामांसाठी प्रोत्साहन द्यावं. काही कामानिमित्त अथवा सण-समारंभानिमित्त नातेवाईकांकडे परगावी गेल्यावर एकमेकांपासून दूर गेल्याची जाणीव ठेवून फोनवर संपर्क ठेवावा. दोघांनीही आस्थापूर्वक एकमेकांची विचारपूस करावी. गोड आठवणींना जपण्याचा प्रयत्न करून, प्रेमानं गप्पा माराव्यात. त्यामुळे पती-पत्नीतील प्रेम द्विगुणित होईल.

आपला वर्षातून एकदा येणारा वाढदिवस पती-पत्नीनं आनंदानं साजरा करावा. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची आठवणही एकमेकांना करून द्यावी. त्या दिवसाचं औचित्य साधून पतीनं पत्नीला सुंदर सुगंधी फुलांचा गजरा अथवा अचानक एखादी भेटवस्तू देऊन प्रेमळ जाणीव करून दिली, तर पत्नी त्या प्रसंगानं सुखावेल. शेवटी काय, तर लग्न म्हणजे ओढूनताणून केलेला संसार नव्हे; छत्तीस गुणांपेक्षा दोन मनांचं मिलन होणं गरजेचं आहे. त्या मनोमिलनामुळंच सुखी जीवनाला आकार व परीसस्पर्श लाभेल

0 comments:

Post a Comment

 
;