Saturday, 29 April 2017 0 comments

राजांचा महाराष्ट्र: महाराष्ट्र दिन विशेष लेख

                                                                                         राजांचा महाराष्ट्र


साधारणतः २/३ वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे. मित्रांसोबत गोव्याला जाण्याचा योग आला होता. रात्री पुण्यातून बसलो आणि सकाळी ८ वाजता गोव्याच्या भूमीत  आमचे पाऊल पडले. पणजीला उतरलो समोर अनेक टॅक्सीवाले हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी आग्रह करीत होते. काही गोमंतक भाषिक तर काही हिंदीभाषिक टॅक्सीवाले तिथे प्रवाशांची विचारणा करीत होते. एका हिंदीभाषिक टॅक्सीवाल्याने आमच्याशी संवाद साधायला सुरुवात केली परंतु तो पैसे जास्त सांगत असल्याने आम्ही त्याला नकार दिला आणि पुढे चालू लागलो. मात्र तो मागून दबक्या आवाजात बोलला," गोवा घुमने आये हो या सब्जी खरीदने ? आणि याने आमचा मात्र चांगलाच पारा चढला आणि आम्ही त्याच्या या विक्षिप्त टिप्पणीने त्याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. तेवढ्यात तिघे चौघे टॅक्सीवाले त्याच्या बाजूने धावून आले आणि आमच्याशी अरेरावी करू लागले.
तेवढ्यात एक पन्नाशी ओलांडलेले एक टॅक्सिवाले काका समोर आले आणि मोठ्या त्वेषाने बोलले," ए हिरो लॉग कहाँ से आये हो?
आम्ही म्हणालो," कोथरूड से" 
ते म्हणाले," अरे शानो कौन से स्टेट से हो."
आम्ही दबक्या आवाजात बोललो, " महाराष्ट्र से "
आणि आमचे हे उत्तर ऐकताच त्याच्या खडूस चेहऱ्यावर स्मितहास्य आले आणि ते म्हणाले, " म्हणजे  शिवाजी राजांच्या महाराष्ट्रातून".
एव्हाना आमच्या सर्वांचा भीतीने झालेला थरकाप कमी झाला होता आणि आमच्या मनात स्वाभिमानाची एक ठिणगीच जणू जागृत झाली होती.
त्या काकांनी तो वाद मिटवला आणि ते स्वतः आम्हाला कलंगुटला हॉटेलवर सोडायला आले. जाताना त्यांच्याशी गप्पा मारल्यावर समजले की ते मूळ केरळ चे होते परंतु त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी ही गोवाच होती आणि ते छान मराठीही बोलत होते. त्यांच्याशी गप्पा मारताना तिथे गणेशोत्सव, शिवजयंती आणि शिमगोत्सव यासारखे सण मराठी भाषिक मोठ्या जल्लोषात साजरे करत असल्याचे समजले.
त्या प्रसंगातून मनात घर करून गेलेले शब्द म्हणजे "शिवाजी राजांचा महाराष्ट्र".
आज महाराष्ट्राची घोददौड देशालाच नाही तर जगाला दाखल घ्यायला लावणारी आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. शूर क्रांतिकारक,समाजसुधारक,संतमंडळी, १०६ हुतात्मे आणि विविध क्षेत्रांत ठसा उमटविणारे सारे दिग्ग्ज हे महाराष्ट्राचे वैभव आहे. परंतु या वैभवाचा वारसा चालविण्यासाठी सर्वांना प्रेरणा व स्फूर्ती देणारे एकमेवाद्वितीय मराठमोळे व्यक्तिमत्व म्हणजेच छत्रपती शिवराय हीच महाराष्ट्राची खरी ओळख ठरत आहे.  छत्रपती शिवरायांनंतर संभाजी महाराजांच्या बलिदानाने पेटलेला महाराष्ट्र पुढे सलग २७ वर्षे मुघलांविरुद्ध लढला आणि त्यांना अस्मान दाखवले असा हा महाराष्ट्र.
भीति न अम्हां तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
शाहीर साबळेंनी गायलेल्या या ओळी आपल्याला महाराजांबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल अतिशय समर्पक असा संदेश देतात.
उद्या १ मे ला १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाने प्राप्त झालेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा ५७ वा स्थापना दिवस. १०६ हुतात्म्यांचे बलिदान, शेतकरी, कामगार या साऱ्यांची एकजूट आणि शाहिरांच्या गगनभेदी पोवाड्यांनी जागृत होऊन पेटून उठलेल्या मराठी माणसाच्या क्रांतीची फलश्रुती म्हणजेच महाराष्ट्र राज्याची स्थापना. 
छत्रपती शिवराय ते १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा जाज्ज्वल्य इतिहास भावी पिढीसमोर मांडण्याची आज गरज आहे. नाहीतर केवळ इतिहासाचा विसर पडल्याने अमुक एखाद्या राजकीय व्यक्तीचा किंवा कार्यशून्य व्यक्तिमत्वाचा महाराष्ट्र असे संबोधन व्हायला वेळ लागणार नाही. हिंदवी स्वराज्य आणि संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी आपल्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या त्यागाची जाणीव आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्यात जागवावी लागणार आहे. महाराष्ट्राची अखंडता राखणाऱ्या तसेच महाराष्ट्राच्या मातीसाठी आयुष्य वेचणाऱ्या प्रत्येकाला अभिवादन आणि सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा
Sunday, 23 April 2017 0 comments

परीक्षा आणि भेजा फ्राय

​                                                           परीक्षा आणि भेजा फ्राय


लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार असल्याने तमाम विद्यार्थी वर्गाच्या मनात आनंदाचा मनमयूर एव्हाना नाचू लागला आहे. परंतु यासाठी प्रत्येकाला परीक्षारूपी आव्हानही पार करायचे आहे.
परीक्षा म्हटलं ना की दिमागाचा भेजाफ्रय होऊन जातो हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडावर असते. एव्हाना ओस पडलेल्या मंदिरात याकाळात विद्यार्थ्यांची दर्शनवरी सुरु झालेली असते. " देवा फक्त एवढी परीक्षा पास होऊ दे, ' देवा सर्व पेपर सोपे येऊ दे', पर्यवेक्षक थोडा ढिला असावाअशा एक ना अनेक मनोकामना मनात जागृत होतात.
स्वतःच्या समाधानासाठी 'आल इज वेलचा फिल्मी मंत्र मुखी ठेवून आपण जो तो या लढाईसाठी सज्ज होत असतो. वर्षभरात आकलनात आणलेल्या गोष्टींचे मूल्यमापन या परीक्षेतून होणार असते. यातून नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे पास  किंवा नापास असे दोनच निष्कर्ष निघणार असतातएखाद्या क्रिकेट मॅच प्रमाणे ड्रॉ  होण्याचा प्रश्नच इथे नसतो. परीक्षेत सर्व पेपर्स चांगले गेले तर सुट्टीची धमाल अधिकच वाढते परंतु जर पेपर अवघड गेले तर मात्र निकालापर्यंत व्हेंटिलेटर वर असल्यासारखी गत होते. हुशार मुलांसाठी "मेरीटचा ध्यास" तर ढ (?) मुलांसाठी "काठावर पास" असे ध्येय डोळ्यासमोर असते.
विद्यार्थी दशेत जरी या परीक्षा भेजाफ्राय करणाऱ्या वाटत असल्या तरी आपण ज्यावेळी व्यावहारिक जीवनात मात्र याच परीक्षा आपल्याला एक दिशा देऊन जातात.  शाळा-कॉलेजातुन बाहेर पडल्यावर आयुष्याच्या खऱ्या परीक्षेसाठी उतरताना याच परीक्षा आपल्याला अधिकाधिक परिपकव आणि सज्ज करीत असतात. याच परीक्षांसाठी सज्ज होताना आपल्याला खालील काही गोष्टी नक्कीच फायदेशीर ठरतील.
१) तणावमुक्त रहा : परीक्षेला सामोरे जाताना आपण नेहमी तणावमुक्त राहिले पाहिजे. कारण तणावाने आपली बौद्धिक क्षमता कमकुवत होऊन ऐनवेळी उत्तरांचा विसरही पडू शकतो. आपण स्वतःकडून वाजवी अपेक्षा ठेवून भीतीवर मात करून तणावमुक्त परीक्षा देऊ शकतो.
२) सकारात्मक रहा : जर मला पेपर अवघड गेला तर? , मी नापास झालो तर अशा नकारात्मक विचारांना प्रथमतः आपण दूर ठेवायला शिकले पाहिजे. माझा छान अभ्यास झाला आहेमी अगदी खात्रीने चांगले मार्क्स मिळवणार, ' खूप सोप्प आहे रेअशी विधाने आपल्या तोंडून आली पाहिजेत.
आपण आपल्यात जागृत केलेली सकारात्मक ऊर्जा आपल्यासाठीच फलदायी ठरणारी असते. आत्मविश्वासाने परीक्षेची तयारी केल्यास याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार.
३) संकल्पना समजून घ्या : परीक्षा जवळ आल्या की आपण  कमी वेळेत अधिक अभ्यास व्हावा म्हणून पाठांतराचा तडाखाच लावतो. परंतु  यामुळे कन्फ्युज होऊन ऐनवेळी पंचायत होण्याची शक्यता अधिक असते. मी अमुक वेळेत संपूर्ण पाने वाचून काढणार असे ठरविल्यास आपला कल गुणात्मक न राहता संख्यात्मक होऊन जातो. परिणामी संकल्पनांचे आकलन न झाल्याने केवळ शब्द आठवतात त्याची बांधणी किंवा विस्तार आपल्याला योग्यरीत्या करता येत नाही. म्हणूनच मूठभर मिठापेक्षा चिमूटभर साखर बरी समजून मोजकेच पण महत्वाचे अशा पद्धतीने संकल्पना समजून घ्याव्यात.      
४) स्वतःच्या नोट्स काढाव्यात : बऱ्याचदा काही संकल्पना आपल्याला समजायला जड जातात अशावेळी आपण आपल्याला समजेल अशा पद्धतीने त्याच्या नोट्स काढाव्यात. अनेक दीर्घ संकल्पना संपूर्ण पाठ करत बसण्यापेक्षा त्यातील मुख्य मुद्दे काढावेत. उदाहरणार्थ : भारताचा स्वातंत्र्यलढा स्पष्ट करा असा प्रश्न असल्यास सात आठ पाने चाळून काढण्यापेक्षा त्याचे पुढीलप्रमाणे मुद्दे काढावेत.                                जुलुमी ब्रिटिश राजवट - अन्याय अत्याचार- क्रांतिकारक - लढा व सत्याग्रह - आंदोलने - स्वातंत्र्य इ.
५) तुलना नको - बऱ्याचदा  आपण आपली इतरांशी तुलना करीत असतो. आणि यामुळेच इतरांची कॉपी करण्याच्या नादात आपण आपल्यातील क्षमतांना बगल देत असतो. आपल्यातील वेगळेपण आणि आपली पद्धत हि आपल्याला जपता आली पाहिजे. परीक्षेच्या काळात इतरांशी तुलना करण्याच्या नादात आपण आपल्या परीक्षेच्या मूळ ध्येयापासून दूर जात असतो. इतरांच्या प्रगतीवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे आपले आपल्या प्रगतीपथावरचे लक्ष विचलित होत असते. त्यामुळे आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने आपल्या चांगल्या निकालासाठी आपणच परीक्षेची पूर्वतयारी केली पाहिजे. 
६) कालपेक्षा उदयाला महत्व द्या - परीक्षेच्या काळात पेपर अवघड गेला', लिहायला वेळ मिळाला नाहीअशा वेगवेगळ्या कारणांनी आपण चिंतीत होतो. आणि याच चिंतेत आपण होऊन गेलेल्या गोष्टीवर विचार करण्याच्या नादात उद्याच्या पेपरचे नुकसान करीत असतो. त्यामुळे झालेल्या पेपरवर विचार करण्यापेक्षा उद्याच्या पेपरची पूर्वतयारी आपल्याला ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे करता आली पाहिजे.
७) छोटा ब्रेक हवाच - परीक्षेच्या काळात आपण तहानभूक विसरून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करीत असतो. परंतु याचा म्हणावा तेवढा फायदा होत नाही. वेळेवर खाणे पिणे आणि ठराविक काळानंतर थोडावेळ ब्रेक घेतल्याने मन ताजेतवाने होत असते परिणामी त्याचा आपल्या स्मरणशक्तीला फायदा होत असतो. अधून मधून घेतलेला छोटासा ब्रेक आपल्या मेंदूला थोडावेळ विश्रांती देत असतो त्यामुळे विचारप्रक्रियेचा अधिक चालना मिळत असते.
थोडक्यात काय तर परीक्षेची भीती मनात न बाळगता एक आव्हान समजून व आपली क्षमता ओळखून आत्मविश्वासाने व जिद्दीने परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. परीक्षा हा विद्यार्थीदशेतील एक महत्वाचा टप्पा असल्याने त्यासाठी आपण मानसिकरीत्या सज्ज राहणे आवश्यक असते. थ्री इडियट्स मधील बाबा रणछोडदास प्रमाणे केवळ "ऑल इज वेल" म्हणून अपेक्षित साध्य प्राप्त होणार नाही. म्हणूनच परीक्षेला योग्य ते महत्व देऊन आपणच आपल्या यशाचे शिल्पकार ठरले पाहिजे. परीक्षेला भेजाफ्राय म्हणण्यापेक्षा आपला भेजा"ट्राय" करायला काय हरकत आहे.
Sunday, 16 April 2017 0 comments

वाढदिवस : एक प्रेरणा

                       वाढदिवस : एक प्रेरणा 

वाढदिवस म्हटलं की लहान मुळापासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटणारा दिवस. जन्माला आल्यापासून आपल्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढीचे आकडेवारीत मोजमाप करणारा दिवस म्हणजेच वाढदिवस. 
"सोळावं वरीस धोक्याचं", "वीस वर्षांचा घोडा झालास तरी कळत नाही का", वयाची पन्नाशी गाठली आता रिटायर व्हा', अशी आपल्याला मिळणारी सारी शाब्दिक आभूषणे आपल्याला वाढत्या वयाची जाणीव करून देत असतात. 
दिवसेंदिवस या वाढदिवसाचं स्वरूप बदलत चाललंय, धांगडधिंगा आणि ओल्यासुक्या पार्ट्यांनी आपण आपले भविष्यातील वाढदिवस कमी करत चाललोय. खरं तर वाढदिवस साजरा करणे, म्हणजे पुढच्या वर्षात पदार्पण करतांना मागच्या एक वर्षाच्या काळात प्रत्येकाने आपल्याला केलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्याला जन्म देणाऱ्या आईबाबांचा, आपल्याला घडविणाऱ्या  कुटुंबीयांचा, शिकवण देणाऱ्या गुरुजनांचा आणि अनुभव देणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद देण्याचा खरं तर हा दिवस.  
वाढदिवसाची बदलणारी व्याख्या आपण लक्षात घेतली पाहिजे. शेजारच्या गुप्तेंनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस मोठ्या थाटात केला म्हणून मीही माझ्या मुलीचा वाढदिवस थाटामाटात करणार ही स्पर्धा सर्वत्र पाहावयास मिळते. आणि याच स्पर्धेच्या वातावरणात मोठे होताना मुलंही वाढदिवसांकडे भपकेबाजपणाच्या दृष्टीने पाहताना दिसतात. 
एकीकडे पार्ट्या, मद्यप्राशन, पैशांची उधळण, महागडी गिफ्ट वाटप, नाचगाणे, रात्रभर चालणारा धिंगाणा पहिला की मन अगदी सुन्न होतं. आणि मनात विचार येऊ लागतात की सेलिब्रेशन च्या नावाखाली आपण जगण्याची व्यख्याच तर बदलत नाही ना?.
परंतु दुसरीकडे संस्कारांच्या जगात औंक्षण करणे, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेणे, गोडधोड जेवण करणे आणि शुभेच्छांचा विनम्रतेने स्वीकार करून सर्वांना धन्यवाद देणे हे दृश्य अल्हाददायीच.
त्याचबरोबर आजही अनेकजण सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नेत्रदान, रक्तदान करण्याचा निर्णय घेतात. तसेच पार्टीऐवजी पुस्तकवाटप, रोपवाटप, शालेय खाऊवाटप आणि जे इतर समाजोपयोगी उपक्रम राबवतात ते नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. गेल्यावर्षी मीही  एका अनाथालयाला भेट देऊन खाऊवाटप केला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हे मला मिळालेल्या हजारोंच्या शुभेछांपेक्षाही अमूल्य होते.
खरं तर वाढदिवस ही एक प्रेरणाच म्हणावी लागेल. एक अशी प्रेरणा जी आपल्या भविष्याचे सुस्पष्ट चित्र रेखाटण्याचा मानस मनात जागविते.  आपल्या प्रत्येकाचा वाढदिवस हा आपल्यासाठीचे सुरु होणारे एक नवे वर्ष अथवा नवे पर्वच म्हणावे लागेल. गेल्या वर्षांत काय कमावले आणि काय गमावले यातून योग्य तो बोध घेऊन येणाऱ्या वर्षाच्या समृद्धीसाठी आखल्या जाणाऱया संकल्पांचा शुभारंभ आपण याच दिवसापासून करत असतो. नव्या वर्षात येणाऱ्या संधी,आव्हाने आणि अपेक्षित ध्येये यासाठीचा आराखडा आपण आपल्या मनात रेखाटलेला असतो. आणि गरज असते ती आगामी वर्षभरात ते सारे सत्यात उतरविण्याची. 
दरवर्षाला आपल्या वाढदिवसाच्या दिनी आपण आपल्या कर्तृत्वाने यशाची उंचउंच शिखरे सर करण्याचा संकल्प केला पाहिजे. 
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ।।
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ।।
या संत तुकारामांच्या अभंगातील प्रत्येक ओळ आपल्याला कशी लागू होईल याचा विचार करून आपण आपले व्यक्तिमत्व घडविले पाहिजे. वाढदिवस हा केवळ शारीरिक किंवा उंचीने वाढीचा दिन न  ठरता आपल्या ख्यातीच्या वाढीचा दिवस ठरावा. 

Wednesday, 5 April 2017 0 comments

एप्रिल फुल चा फंडा !

                                                               एप्रिल फुल चा फंडा !


प्रिल फुल म्हटलं की आपोआपच मनात गुदगुल्या होऊ लागतात. आणि आपण सकाळपासूनच मोठ्या आवेशाने मूर्ख (फुल) बनविण्यासाठी बकरा शोधू लागतो. बकरा शोधण्याच्या आणि त्याला एप्रिल फुल बनविण्याच्या नादात आपला एप्रिल फुल कधी होऊन जातो हे आपल्यालाही कळत नाही.
मुळात एप्रिल फुल ही संकल्पना मला लहानपणी आपण प्रत्येकाने ऐकलेल्या एका गोष्टीसारखी वाटते.  आणि ती गोष्ट म्हणजे "लांडगा आला रे आला" त्या गोष्टीतील मेंढपाळ दररोज गावकऱ्यांचा एप्रिल फुल करण्यासाठी 'लांडगा आला रे आला' अशी आरोळी देत असतो. आणि त्याची आर्त हाक ऐकून गावकरीही हातातली सर्व कामे टाकून धावून येत असतात. परंतु एके दिवशी खरोखरच लांडगा येतो आणि कोणीही धावून न आल्यामुळे त्याची काय फजिती होते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. 
आता यातून बोध घ्यायचा किंवा वर्षातून एकदा लोकांना मूर्ख बनविण्यात गैर ते काय ? हे आपल्या प्रत्येकालाच ठरवायचे आहे.
काल अशाच एका सामाजिक कार्यक्रमाला जाण्याचा योग आला अनेक मान्यवर त्या व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील लोक आपले मनोगत व्यक्त करत होते आणि लोकही प्रत्येक वक्त्याला टाळ्यांनी यथायोग्य दादही देत होते. अचानक त्या भागातील राजकीय पुढारी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह तेथे हजर झाले. त्यांचा सत्कार वगैरे उरकला आणि त्यांच्या भाषणाला सुरुवात झाली. त्यांनी नेहमीच्या शैलीत कार्यक्रमाचा मूळ मुद्दा सोडून त्यांनी केलेल्या कामांचा पाढा वाचायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भरमसाठ अशा आश्वासनांची खैरात करायला सुरुवात केली. सर्वजण शांततेने ऐकत होते. भाषण शेवटाकडे चालले होते  आणि त्यांची आश्वासने संपत नाहीच तोवर गर्दीतून एका गृहस्थाने दबक्या आवाजात "एप्रिल फुल का ?"  असे म्हटले. आणि काही सेकंदातच कार्यक्रमाच्या त्या गर्दीत एकच हशा पिकला. तें पुढारी मात्र पुरतेच भांबावले आणि घाम पुसत आपले भाषण आटोपून व्यासपीठावर आपल्या जागी जाऊन बसले. हा किस्सा विनोदासाठी नक्कीच चांगला आहे परंतु यातून डोकावणारी वास्तविकताही आपल्या लक्षात यायला हवी.  
काल मलाही या एप्रिल फुलचा चांगलाच अनुभव आला यात अनेक मित्रांनी मला पद्धतशीर एप्रिल फुलही  केले. त्याचवेळी मनात विचार आला की  एप्रिल फुल बनविण्यासाठी विशिष्ट अशा एकाच दिवसाची काय गरज आहे. कारण समाजात आपल्या स्वार्थासाठी आणि कार्यभागासाठी अनेकजण बाराही महिने लोकांना एप्रिल फुल बनवत असतातच की ! 
मुळात प्रामाणिकता आणि विश्वासार्हता आज मोठ्या प्रमाणात लयास जात असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. विविध प्रलोभने,आश्वासने आणि आमिषे दाखवून लुटण्याचे धंधे आज ऑनलाईन आणि ऑफलाईनही  चालू आहेत. आपण १ एप्रिलचे औचित्य साधून लोकांना मूर्ख बनविण्याची संधी शोधत असतो, परंतु आपण स्वतः वर्षभर एप्रिल फुल ठरत असतो. मुळात या स्मार्टफोनच्या जमान्यात आपणही स्मार्ट होण्याची आज नितान्त गरज आहे.  कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी सुज्ञता आणि गुणग्राहकता आपल्याला आपल्या अंगी बनवायला हवी.  
एप्रिल फुल बनवायचाच असेल तर आपणच आपल्यातील वाईट प्रवृत्तींना एप्रिल फुल करायला शिकले पाहिजे. दररोज उशिरा उठण्याच्या सवयीला अचानक पहाटे उठून, व्यायाम करून आपल्या अंगातील आळसाचा एप्रिल फुल केला पाहिजे. स्वतःला नेहमीच अज्ञानी समजणाऱ्या आपल्या मनाला वाचनाची सवय लावून अज्ञानाचा एप्रिल फुल केला पाहिजे. सर्वांशी जिव्हाळ्याने वागून आपल्यातील अहंकाराचा एप्रिल फुल केला पाहिजे. गरजवंतांना मदतीचा हात देऊन आपल्यातील स्वार्थाचा एप्रिल फुल केला पाहिजे. अशा अनेक अयोग्य गोष्टी आहेत ज्यांचा एप्रिल फुल करून आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार ठरू शकतो.
चला तर आता एप्रिल फुल चा फंडा जरा वेगळ्या पद्धतीने अजमावून थोडेसे होपफ़ुल (Hopeful) आणि कलरफुल  व्यक्तिमत्व घडवूया. 

लेखक : सागर ननावरे 
 
;