Saturday, 29 April 2017

राजांचा महाराष्ट्र: महाराष्ट्र दिन विशेष लेख

                                                                                         राजांचा महाराष्ट्र


साधारणतः २/३ वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे. मित्रांसोबत गोव्याला जाण्याचा योग आला होता. रात्री पुण्यातून बसलो आणि सकाळी ८ वाजता गोव्याच्या भूमीत  आमचे पाऊल पडले. पणजीला उतरलो समोर अनेक टॅक्सीवाले हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी आग्रह करीत होते. काही गोमंतक भाषिक तर काही हिंदीभाषिक टॅक्सीवाले तिथे प्रवाशांची विचारणा करीत होते. एका हिंदीभाषिक टॅक्सीवाल्याने आमच्याशी संवाद साधायला सुरुवात केली परंतु तो पैसे जास्त सांगत असल्याने आम्ही त्याला नकार दिला आणि पुढे चालू लागलो. मात्र तो मागून दबक्या आवाजात बोलला," गोवा घुमने आये हो या सब्जी खरीदने ? आणि याने आमचा मात्र चांगलाच पारा चढला आणि आम्ही त्याच्या या विक्षिप्त टिप्पणीने त्याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. तेवढ्यात तिघे चौघे टॅक्सीवाले त्याच्या बाजूने धावून आले आणि आमच्याशी अरेरावी करू लागले.
तेवढ्यात एक पन्नाशी ओलांडलेले एक टॅक्सिवाले काका समोर आले आणि मोठ्या त्वेषाने बोलले," ए हिरो लॉग कहाँ से आये हो?
आम्ही म्हणालो," कोथरूड से" 
ते म्हणाले," अरे शानो कौन से स्टेट से हो."
आम्ही दबक्या आवाजात बोललो, " महाराष्ट्र से "
आणि आमचे हे उत्तर ऐकताच त्याच्या खडूस चेहऱ्यावर स्मितहास्य आले आणि ते म्हणाले, " म्हणजे  शिवाजी राजांच्या महाराष्ट्रातून".
एव्हाना आमच्या सर्वांचा भीतीने झालेला थरकाप कमी झाला होता आणि आमच्या मनात स्वाभिमानाची एक ठिणगीच जणू जागृत झाली होती.
त्या काकांनी तो वाद मिटवला आणि ते स्वतः आम्हाला कलंगुटला हॉटेलवर सोडायला आले. जाताना त्यांच्याशी गप्पा मारल्यावर समजले की ते मूळ केरळ चे होते परंतु त्यांची जन्मभूमी व कर्मभूमी ही गोवाच होती आणि ते छान मराठीही बोलत होते. त्यांच्याशी गप्पा मारताना तिथे गणेशोत्सव, शिवजयंती आणि शिमगोत्सव यासारखे सण मराठी भाषिक मोठ्या जल्लोषात साजरे करत असल्याचे समजले.
त्या प्रसंगातून मनात घर करून गेलेले शब्द म्हणजे "शिवाजी राजांचा महाराष्ट्र".
आज महाराष्ट्राची घोददौड देशालाच नाही तर जगाला दाखल घ्यायला लावणारी आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. शूर क्रांतिकारक,समाजसुधारक,संतमंडळी, १०६ हुतात्मे आणि विविध क्षेत्रांत ठसा उमटविणारे सारे दिग्ग्ज हे महाराष्ट्राचे वैभव आहे. परंतु या वैभवाचा वारसा चालविण्यासाठी सर्वांना प्रेरणा व स्फूर्ती देणारे एकमेवाद्वितीय मराठमोळे व्यक्तिमत्व म्हणजेच छत्रपती शिवराय हीच महाराष्ट्राची खरी ओळख ठरत आहे.  छत्रपती शिवरायांनंतर संभाजी महाराजांच्या बलिदानाने पेटलेला महाराष्ट्र पुढे सलग २७ वर्षे मुघलांविरुद्ध लढला आणि त्यांना अस्मान दाखवले असा हा महाराष्ट्र.
भीति न अम्हां तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
शाहीर साबळेंनी गायलेल्या या ओळी आपल्याला महाराजांबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल अतिशय समर्पक असा संदेश देतात.
उद्या १ मे ला १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाने प्राप्त झालेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा ५७ वा स्थापना दिवस. १०६ हुतात्म्यांचे बलिदान, शेतकरी, कामगार या साऱ्यांची एकजूट आणि शाहिरांच्या गगनभेदी पोवाड्यांनी जागृत होऊन पेटून उठलेल्या मराठी माणसाच्या क्रांतीची फलश्रुती म्हणजेच महाराष्ट्र राज्याची स्थापना. 
छत्रपती शिवराय ते १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा जाज्ज्वल्य इतिहास भावी पिढीसमोर मांडण्याची आज गरज आहे. नाहीतर केवळ इतिहासाचा विसर पडल्याने अमुक एखाद्या राजकीय व्यक्तीचा किंवा कार्यशून्य व्यक्तिमत्वाचा महाराष्ट्र असे संबोधन व्हायला वेळ लागणार नाही. हिंदवी स्वराज्य आणि संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यासाठी आपल्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या त्यागाची जाणीव आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्यात जागवावी लागणार आहे. महाराष्ट्राची अखंडता राखणाऱ्या तसेच महाराष्ट्राच्या मातीसाठी आयुष्य वेचणाऱ्या प्रत्येकाला अभिवादन आणि सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा

0 comments:

Post a Comment

 
;