परीक्षा आणि भेजा फ्राय
लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार असल्याने तमाम विद्यार्थी वर्गाच्या मनात आनंदाचा मनमयूर एव्हाना नाचू लागला आहे. परंतु यासाठी प्रत्येकाला परीक्षारूपी आव्हानही पार करायचे आहे.
परीक्षा म्हटलं ना की दिमागाचा भेजाफ्रय होऊन जातो हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडावर असते. एव्हाना ओस पडलेल्या मंदिरात याकाळात विद्यार्थ्यांची दर्शनवरी सुरु झालेली असते. " देवा फक्त एवढी परीक्षा पास होऊ दे, ' देवा सर्व पेपर सोपे येऊ दे', पर्यवेक्षक थोडा ढिला असावा' अशा एक ना अनेक मनोकामना मनात जागृत होतात.
स्वतःच्या समाधानासाठी 'आल इज वेल' चा फिल्मी मंत्र मुखी ठेवून आपण जो तो या लढाईसाठी सज्ज होत असतो. वर्षभरात आकलनात आणलेल्या गोष्टींचे मूल्यमापन या परीक्षेतून होणार असते. यातून नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे पास किंवा नापास असे दोनच निष्कर्ष निघणार असतात, एखाद्या क्रिकेट मॅच प्रमाणे ड्रॉ होण्याचा प्रश्नच इथे नसतो. परीक्षेत सर्व पेपर्स चांगले गेले तर सुट्टीची धमाल अधिकच वाढते परंतु जर पेपर अवघड गेले तर मात्र निकालापर्यंत व्हेंटिलेटर वर असल्यासारखी गत होते. हुशार मुलांसाठी "मेरीटचा ध्यास" तर ढ (?) मुलांसाठी "काठावर पास" असे ध्येय डोळ्यासमोर असते.
विद्यार्थी दशेत जरी या परीक्षा भेजाफ्राय करणाऱ्या वाटत असल्या तरी आपण ज्यावेळी व्यावहारिक जीवनात मात्र याच परीक्षा आपल्याला एक दिशा देऊन जातात. शाळा-कॉलेजातुन बाहेर पडल्यावर आयुष्याच्या खऱ्या परीक्षेसाठी उतरताना याच परीक्षा आपल्याला अधिकाधिक परिपकव आणि सज्ज करीत असतात. याच परीक्षांसाठी सज्ज होताना आपल्याला खालील काही गोष्टी नक्कीच फायदेशीर ठरतील.
१) तणावमुक्त रहा : परीक्षेला सामोरे जाताना आपण नेहमी तणावमुक्त राहिले पाहिजे. कारण तणावाने आपली बौद्धिक क्षमता कमकुवत होऊन ऐनवेळी उत्तरांचा विसरही पडू शकतो. आपण स्वतःकडून वाजवी अपेक्षा ठेवून भीतीवर मात करून तणावमुक्त परीक्षा देऊ शकतो.
२) सकारात्मक रहा : जर मला पेपर अवघड गेला तर? , मी नापास झालो तर ? अशा नकारात्मक विचारांना प्रथमतः आपण दूर ठेवायला शिकले पाहिजे. माझा छान अभ्यास झाला आहे, मी अगदी खात्रीने चांगले मार्क्स मिळवणार, ' खूप सोप्प आहे रे' अशी विधाने आपल्या तोंडून आली पाहिजेत.
आपण आपल्यात जागृत केलेली सकारात्मक ऊर्जा आपल्यासाठीच फलदायी ठरणारी असते. आत्मविश्वासाने परीक्षेची तयारी केल्यास याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार.
३) संकल्पना समजून घ्या : परीक्षा जवळ आल्या की आपण कमी वेळेत अधिक अभ्यास व्हावा म्हणून पाठांतराचा तडाखाच लावतो. परंतु यामुळे कन्फ्युज होऊन ऐनवेळी पंचायत होण्याची शक्यता अधिक असते. मी अमुक वेळेत संपूर्ण पाने वाचून काढणार असे ठरविल्यास आपला कल गुणात्मक न राहता संख्यात्मक होऊन जातो. परिणामी संकल्पनांचे आकलन न झाल्याने केवळ शब्द आठवतात त्याची बांधणी किंवा विस्तार आपल्याला योग्यरीत्या करता येत नाही. म्हणूनच मूठभर मिठापेक्षा चिमूटभर साखर बरी समजून मोजकेच पण महत्वाचे अशा पद्धतीने संकल्पना समजून घ्याव्यात.
४) स्वतःच्या नोट्स काढाव्यात : बऱ्याचदा काही संकल्पना आपल्याला समजायला जड जातात अशावेळी आपण आपल्याला समजेल अशा पद्धतीने त्याच्या नोट्स काढाव्यात. अनेक दीर्घ संकल्पना संपूर्ण पाठ करत बसण्यापेक्षा त्यातील मुख्य मुद्दे काढावेत. उदाहरणार्थ : भारताचा स्वातंत्र्यलढा स्पष्ट करा ? असा प्रश्न असल्यास सात आठ पाने चाळून काढण्यापेक्षा त्याचे पुढीलप्रमाणे मुद्दे काढावेत. जुलुमी ब्रिटिश राजवट - अन्याय अत्याचार- क्रांतिकारक - लढा व सत्याग्रह - आंदोलने - स्वातंत्र्य इ.
५) तुलना नको - बऱ्याचदा आपण आपली इतरांशी तुलना करीत असतो. आणि यामुळेच इतरांची कॉपी करण्याच्या नादात आपण आपल्यातील क्षमतांना बगल देत असतो. आपल्यातील वेगळेपण आणि आपली पद्धत हि आपल्याला जपता आली पाहिजे. परीक्षेच्या काळात इतरांशी तुलना करण्याच्या नादात आपण आपल्या परीक्षेच्या मूळ ध्येयापासून दूर जात असतो. इतरांच्या प्रगतीवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे आपले आपल्या प्रगतीपथावरचे लक्ष विचलित होत असते. त्यामुळे आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने आपल्या चांगल्या निकालासाठी आपणच परीक्षेची पूर्वतयारी केली पाहिजे.
६) कालपेक्षा उदयाला महत्व द्या - परीक्षेच्या काळात ' पेपर अवघड गेला', लिहायला वेळ मिळाला नाही' अशा वेगवेगळ्या कारणांनी आपण चिंतीत होतो. आणि याच चिंतेत आपण होऊन गेलेल्या गोष्टीवर विचार करण्याच्या नादात उद्याच्या पेपरचे नुकसान करीत असतो. त्यामुळे झालेल्या पेपरवर विचार करण्यापेक्षा उद्याच्या पेपरची पूर्वतयारी आपल्याला ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे करता आली पाहिजे.
७) छोटा ब्रेक हवाच - परीक्षेच्या काळात आपण तहानभूक विसरून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करीत असतो. परंतु याचा म्हणावा तेवढा फायदा होत नाही. वेळेवर खाणे पिणे आणि ठराविक काळानंतर थोडावेळ ब्रेक घेतल्याने मन ताजेतवाने होत असते परिणामी त्याचा आपल्या स्मरणशक्तीला फायदा होत असतो. अधून मधून घेतलेला छोटासा ब्रेक आपल्या मेंदूला थोडावेळ विश्रांती देत असतो त्यामुळे विचारप्रक्रियेचा अधिक चालना मिळत असते.
थोडक्यात काय तर परीक्षेची भीती मनात न बाळगता एक आव्हान समजून व आपली क्षमता ओळखून आत्मविश्वासाने व जिद्दीने परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. परीक्षा हा विद्यार्थीदशेतील एक महत्वाचा टप्पा असल्याने त्यासाठी आपण मानसिकरीत्या सज्ज राहणे आवश्यक असते. थ्री इडियट्स मधील बाबा रणछोडदास प्रमाणे केवळ "ऑल इज वेल" म्हणून अपेक्षित साध्य प्राप्त होणार नाही. म्हणूनच परीक्षेला योग्य ते महत्व देऊन आपणच आपल्या यशाचे शिल्पकार ठरले पाहिजे. परीक्षेला भेजाफ्राय म्हणण्यापेक्षा आपला भेजा"ट्राय" करायला काय हरकत आहे.
0 comments:
Post a Comment