*शेतकऱ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांना हाक*
*आजचा संप उद्याचा भूकंप*
*संप होईल भूकंप आता*
*जीव हा तळमळतोय*
*माफ करा राजे*
*आता संपावर जातोय*
*रक्ताचं पाणी करून*
*गाळला शेतात घाम*
*मर मर मरूनसुद्धा*
*मिळला नाही दाम*
*शिळं पाक तुकडे इथं*
*रोज रोज खातोय*
*माफ करा राजे*
*आता संपावर जातोय*
*ज्या दुधानं झालो मोठा*
*त्या दुधाचा होतोय चिखल*
*काळजाला पडल्यात भेगा*
*पण कुणीच घ्यायना दखल*
*पोराबाळांचा जीव आमच्या*
*नुसता कासावीस होतोय*
*माफ करा राजे*
*आता संपावर जातोय*
*कर्जाच्या ओझ्याखाली*
*तुटतोय तो सातबारा*
*मायबाप पुढाऱ्यांनी*
*आमचा खेळ केलाय सारा*
*खादीमधला रक्षणकर्ता*
*अंत आमचा पाहतोय*
*माफ करा राजे*
*आता संपावर जातोय*
*मॉलसाठी अफाट पैसा पण*
*भाज्यांसाठी करतात भाव*
*आपलीच माणसं सुद्धा*
*काळजावर घालत्यात घाव*
*अश्रूंचा हा झरा आता*
*दुष्काळातही वाहतोय*
*माफ करा राजे*
*आता संपावर जातोय*
(कवीच्या नावासहीत शेअर करा स्वतच्या नावावर खपवून स्वताला फसवु नका)
(क्रुपया ही कविता जास्तीत जास्त शेअर करा शेतकऱ्यांच्य व्यथा आता मंत्रालयापर्यंत जाऊ द्या )
चला आयपीएल जिंकू या...!
नुकताच आयपीएल (इंडियन प्रीमिअर लीग) चा थरार मुंबई आणि पुणे संघात झालेल्या अंतिम सामन्याने संपन्न झाला. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात या दीड पावणेदोन महिन्यांत क्रिकेटप्रेमींना मात्र अनेक थरारक लढतींची मनोरंजक जणू मेजवानीच मिळाली. आपल्या आवडत्या संघासाठी आणि खेळाडूंसाठी प्रत्येकाने आपल्या मनात एक खास जागाच करून ठेवली होती. या आयपीएल चा थरार काहींनी प्रत्यक्ष मैदानांत जाऊन अनुभवला तर अनेकांनी टीव्हीवरून याचा आनंद घेतला.
खरं तर अंतिम सामन्याच्या थरारानंतर सोशल मीडियावर पुणेकर आणि मुंबईकर फॅन्सने एकमेकांना धारेवर धरून हि आयपीएल जणू प्रतिष्ठेचीच करून टाकली होती. दोन्ही शहरातले क्रीडाप्रेमी एकमेकांवर तोंडसुख घ्यायची एकही संधी सोडत नव्हते. आणि यात या दोन्ही शहराबाहेरचे मात्र ‘पुणे असो व मुंबई "कप" तर महाराष्ट्रातच येणार’ असे म्हणून स्वतःच्या मनाची समजूत घालत होते.
या साऱ्या मैदानाबाहेरच्या तुफानी फटकेबाजीने मला लोकांची क्रिकेट आणि आयपीएल बद्दलची कमालीची तळमळ पाहायला मिळाली. आणि मग मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले की जर मनोरंजनासाठी किंवा आपल्या विभागाच्या समर्थनासाठी आपण आपल्यात इतका उत्साह आणू शकतो. जर हाच उत्साह आपण आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी किंवा स्वतःसाठी वापरात आणला तर याने आपला किती मोठा फायदा होईल?
आयपील आपण सर्वांनी एन्जॉय केलीच पण आता मैदानापलीकडची आणि आयुष्याच्या जवळची आयपीएल आपल्याला जिंकायची आहे.
ही IPL म्हणजेच
आय (I) - मी ( स्वतःसाठी वेळ देणे)
पी (P) - पॅरेंट्स ( स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ देणे )
एल (L) - लाईफ (लार्जर दॅन लाईफ जगणे)
ही आय पी एल आपल्याला एखादा कप नाही जिंकून देणार पण ही आयपीएल आपल्यातील आत्मविश्वासाला मात्र नक्कीच "वेकअप" करेल.
पहिल्या आय मध्ये आपण आपल्या स्वतः साठी वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे. कामाचा व्याप,तणाव,जबाबदाऱ्यांचे ओझे अशा एक ना अनेक गोष्टीची पूर्तता करण्याच्या नादाद आपण आपल्या स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करीत असतो. परिणामी अशक्त मानसिकता,ताणतणाव,मधुमेह,उच्च रक्तदाब,व्यसनाधीनता आणि इतर अनेक विकार आपल्याला जडत असतात. म्हणूनच आपल्याला
स्वतःसाठी वेळात वेळ काढून व्यायाम,वाचन,छंद जोपासणे आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या गोष्टींना आपण प्राधान्य द्यायला हवे. कारण आपला स्वविकास हाच उद्या आपल्याला यशाच्या शिखरावर नेणारा असतो.
यातील दुसरा पी पॅरेंट्सचा म्हणजेच यात आपले कुटुंबीय,आप्तस्वकीय,गुरुजनवर्ग आणि आपले हितचिंतक यांना वेळ देणे आणि त्यांचा आदर करणे. आजच्या धावपळीच्या जगण्यात आपण सर्वजण इतके पैशाच्या मागे धावतो की पैसे मिळतो पण सुख मिळत नाही. आणि हेच सुख मिळण्यासाठी आपण नेहमी आपल्या पॅरेंट्सला वेळ दिला पाहिजे. लवकर घरी जाणे,कुटुंबियांसोबत वेळ घालविणे, त्यांना घेऊन फिरायला जाणे हे व्हायला हवे . त्याचप्रमाणे आपल्या आप्तस्वकीयांच्या आवर्जून भेटीगाठी घेणे त्यांची विचारपूस करणे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे याकडेही आपले लक्ष हवे. त्याचबबरोबर आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे गुरुजन, ज्येष्ठ, थोर यांच्या सान्निध्यात वेळ घालवून त्यांच्याकडून नेहमी प्रेरणा घेतली पाहिजे.
यातले शेवटचे अक्षर म्हणजे एल लार्जेर दॅन लाईफ चा म्हणजेच आपल्याला मिळालेल्या आयुष्यापेक्षाही मोठी अचिव्हमेंट साध्य करणे. थोडक्यात काय तर आपली प्रगती इतकी उच्च असावी कि पुढील अनेक पिढ्यांत आपल्या प्रगतीची चर्चा व्हावी. आपल्या असामान्य कर्तृत्वाने आपला आदर्श नेहमी घेतला जावा अशी प्रतिमा आपल्याला तयार करता आली पाहिजे. आणि अशी लार्जर दॅन लाईफ जगण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यात ध्येय ठरवावी लागतील आणि त्या ध्येयप्राप्तीसाठी आपल्याला स्वतःला वाहून घ्यावे लागेल. यासठी ठासून भरलेला आत्मविश्वास, अनोखी जिद्द, मेहनतीची तयारी आणि ध्येयाप्रती कमालीची एकाग्रता आपल्याला आपल्या नसानसात भरावी लागेल. एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून उदयास येण्यासाठी ज्या ज्या कौशल्यांची आणि क्षमतांची गरज असते अशा सर्व गोष्टी आपल्याला आपल्या अंगी बाणवाव्या लागतील.
मित्रांनो आयपील ची धामधूम संपली आहे आणि हीच योग्य वेळ आहे आपल्या आयुष्याच्या आयपीएल वर लक्ष केंद्रित करण्याची. आपले ध्येय त्या उंची षटकारासारखे हवे, आपल्या प्रत्येक उद्दिष्टाचा चौकार सीमेपार जायला हवा, वेगाने येणाऱ्या प्रत्येक संकटांचा सामना करून त्यांना टोलविण्याची ताकद आपल्याकडे हवी.
आपले प्रत्येक पाऊल योग्य हवे, आपल्या लक्ष्याच्या दिशेने आपली डिलिव्हरी पाहिजे, येणाऱ्या प्रत्येक संधीला आपल्याला झेलता आले पाहिजे आणि आपल्या प्रत्येक उद्दिष्टाचे (ओव्हर) चे आपल्याकडे नियोजन असायला हवे. मग बघा क्रिकेटची आयपील कोणीही जिंकू पण आपल्या आयुष्याच्या आयपीएलचे विजेते नेहमी तुम्हीच असणार. चला तर मग आयपीएल पाहू या सेटमॅक्स ची नाही "गोलसेट'' ची !
लेखक
सागर नवनाथ ननावरे
कारण विनाकारण ?
"कारण
सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीही कारण सांगत
नाहीत." वरवर ऐकायला छान वाटणाऱ्या या गोष्टी आपल्याला यशाचा एक अनोखा
मूलमंत्रच देऊन जातात.
शालेय जीवनात आपल्याला परीक्षेत
एक प्रश्न विचारला जातो आणि कारण द्या म्हणून उत्तर लिहावयास सांगितले
जाते. उदा. विजेचा प्रकाश आधी दिसतो मात्र आवाज नंतर ऐकू येतो मग आपण
उत्तर लिहितो कारण कि, प्रकाशाचा वेग ध्वनीपेक्षा जास्त असतो. आणि आपल्याला
त्या उत्तराबद्दल पैकीच्या पैकी गुणही मिळतात.
शालेय
पाठयक्रमाप्रमाणे ही कारणे ज्ञानवृद्धीसाठी नक्कीच उपयुक्त ठरतात. परंतु
आपण जसजसे मोठे होऊ लागतो तसतसे आयुष्यातल्या या ना गोष्टींना सतत कारण
देण्याची आपल्याला सवय जडलेली असते. आणि आपण त्यात इतके पारंगत होऊन जातो
की आपल्या सोयीप्रमाणे आपण कारणे देऊन टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतो. ही
कारणे वास्तव परिस्थितीनुसार वापरण्यात काहीही गैर नाही. परंतु जेंव्हा
आत्मविश्वास खालावला जातो किंवा स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल साशंकता निर्माण
होते अशावेळी कारणे देऊन चालढकल करणे अयोग्य ठरते.
माझा
असाच एक जुना मित्र एका खासगी कंपनीत कामाला होता. त्या कंपनीत तो एका
चांगल्या वरिष्ठ पदावर काम करीत होता. त्याच्याबरोबरच एक श्याम नावाचा एक
अत्यंत होतकरू आणि चाणाक्ष मुलगा त्याच्या हाताखाली कामास होता. त्या
कंपनीत बरेचदा सुट्टीच्या दिवशी विविध स्टाफसाठी प्रशिक्षणक्रम राबविले
जात असत. त्या प्रशिक्षणक्रमांत व्यक्तिमत्व विकास, सादरीकरणाचे कौशल्य आणि
उत्कृष्ठ व्यवस्थापनाबाबत धडे दिले जात असत. परंतु माझा मित्र मात्र नेहमी
काहीना काही कारणे देऊन त्या प्रशिक्षणक्रमांस गैरहजर राहत असे.
सात
आठ महिने उलटून गेल्यावर तो मित्र एके दिवशी माझ्याकडे आला आणि हताशपणे
सांगू लागला की," यार तो माझ्या हाताखाली काम करणारा श्याम आता माझा बॉस
झालाय." मी त्याला याचे कारण विचारलॆ असता त्याने सविस्तर सांगितले,'यार
सुट्टीच्या दिवशी कोण काम करतं का ? तो श्याम जास्त हुशारपणाने ते करायचा
आणि त्यामुळे कामातही त्याने जास्त शहाणपण दाखवायला सुरुवात केली आणि मग
केलं त्याला बॉस."
खरं तर या चर्चेनंतर माझ्या लक्षात
आलं कि मुळात त्या श्यामची यात काहीही चूक नव्हती. माझा मित्रच यात कमी
पडला होता या ना त्या कारणाने सतत गैरहजर राहून जबाबदारी झटकल्यामुळे
त्याच्यावर हि वेळ आली होती. तर श्यामने मात्र भविष्यातील ध्येय निश्चित
करून कोणतेही कारण न देता जबाबदाऱ्या उमेदीने पार पडल्यामुळे त्याला बढती
मिळाली होती. पण आता काहीही होणार नव्हते श्याम आता थांबणार नव्हता यशाची
शिखरे तो उत्तरोत्तर काबीज करणार होता कारण त्याला विनाकारण "कारणे"
देण्यात रस नव्हता.
मित्रांनो आपणही बरेचदा आपण आपल्या
मर्जीप्रमाणे वागून समोर आलेल्या संधींना बगल देत असतो . परिणामी हीच
कारणे आपल्या यशाच्या रस्त्यावर काटे बनून आपल्या ध्येयामध्ये अडथळे आणत
असतात. आयुष्यात बरेचदा चुकीच्या अथवा अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष
करण्यासाठी कारणे देणे कदाचित उचित ठरू शकते. परंतु केवळ आपल्या सोयीनुसार व
आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याच्या प्रयत्नात जर आपण करणे देत असू तर मात्र
हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. आपल्या आयुष्यात विनाकारण येणारी कारणे
ही आपल्या अनेक संधी आणि प्रगतीला लगाम लावण्याचा प्रयत्न करीत असतात.
चला तर मग विनाकारण कारणे देण्यापेक्षा अनावश्यक कारणांना पूर्णविराम देऊया कदाचित यामुळे काहीतरी सकारात्मक आयुष्यात घडेल.
“करू
ग्रंथ व पुस्तकांचे वाचन..वैचारिक संपत्तीचे होईल जतन’’ प्रबोधनकारांच्या
या ओळी वैचारिक श्रीमंतीचं रहस्य अतिशय समर्पकपणे स्पष्ट करतात.
एखाद्या
व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद एका पुस्तकात असते. परंतु आज
बदलत्या जमान्यात वाचन संस्कार मागे पडत असल्याचे दिसून येत आहे.
पुस्तकांची जागा टॅब आणि मोबाईलने घेतल्यामुळे वाचनासाठी कुणालाच वेळ
नसल्याचे चित्र सर्रास दिसून येत आहे. भावी पिढ्यांना वाचनातून
ज्ञानप्राप्ती व्हावी व समाजपरिवर्तन घडावे यासाठी अगदी पूर्वीपासून संत,
महंत आणि साहित्यिकांनी ग्रंथ,अभंग,ओव्या आणि इतर साहित्य निर्माण केले.
पुढे अनेक पिढ्यांनी त्याचे पालन विविध माध्यमांतून करून ज्ञानाच्या
माध्यमातून समाजपरिवर्तनही केले. परंतु "शाळा सोडल्यानंतर वाचन आणि आमचा
सहसा संबंध आला नाही" असे सांगून आपण त्याकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो.
शालेय जीवनापासूनच वाचनाची गोडी निर्माण करणारे उपक्रम राबवले जातात परंतु
ते दीर्घकाळपर्यंत न टिकल्याने ऐन उमेदीच्या काळात अपयशाचा सामना बऱ्याचदा
करावा लागतो.
भाषेच्या आणि स्वतःच्या उत्कर्षासाठी वाचन ही काळाची गरज आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
आजकाल
शालेय विद्यार्थ्यांप्रमाणेच अगदी मोठ्यांनाही वाचनदोषाचे प्रमाण अतिशय
मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. परंतु ही ज्ञानवृद्धीची वाचन चळवळ या
मोबाईलच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगातही चालूच राहावी यासाठी प्रत्येकाने
आपणहून पुढाकार घेतला पाहिजे. शाळेत शिक्षकांनी सुद्धा केवळ
तोंडीपरीक्षेच्या निकषाने पास नापास ठरविल्याने विद्यार्थ्यांत
न्यूनगंडाची भावना निर्माण होऊन वाचन दोषाच्या समस्या वाढतच जातात. परंतु
ध्येयवादी ब्रिटिश शिक्षिका रेमीदियाना डायस ज्यांनी वाचन चळवळीसाठी
स्वतःला झोकून घेतले आहे यांचा आदर्श आपण घ्यायला हवा. त्यांनी वास्तववादी
अनुभवातून साकारलेल्या ‘अंडरस्टँडिंग डिसलॅक्शिया' पुस्तकातुन वाचनाबद्दल व
वाचनदोषांबद्दल सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलेले आहे.
मला
आजही आठवत मी दुसरी तिसरीत असताना आमच्या घरी दोन तीन वर्तमानपत्र यायची.
आई-वडील ते नियमितपणे वाचत असायचे. परंतु आम्ही बहीण भावंडे मात्र रद्दी
साचून खाऊसाठी दोन-पाच रुपये मिळण्याच्या आशेवर असायचो. आईवडिलांनी खूपदा
समजावून सांगितले परंतु मी कधीच गांभीर्याने घेतले नाही. यावर वडिलांनी
कोणतीही जबरदस्ती न करता एक शक्कल लढविली. क्रिकेट हा विषय लहानपणापासूनच
आवडीचा असल्याने त्यांनी वर्तमानपत्र वाचता वाचता माझ्याशी मुद्दाम
क्रिकेटच्या सामन्याबद्दल चर्चा करायला सुरुवात केली. अनेकदा ते मला
त्यासंबंधी प्रश्न विचारायचे परंतु मला उत्तर देता येत नसे. अशावेळी ते
सर्वांसमोर मला खोचकपणे उद्देशून बोलायचे" याला काय माहित असणार हा फक्त
मॅच पाहतो, त्याबद्दल वाचतो थोडीच?". आणि यामुळे कुठेतरी माझा इगो दुखावला
गेला आणि मी जाणीवपूर्वक शेवटच्या पानावरील क्रीडा वृत्तांत नियमितपणे
वाचू लागलो. पुढे चंपक,चांदोबा,इसापनीतीच्या गोष्टी वाचण्यासाठी दर
महिन्याला पुस्तक खरेदीसाठी वडिलांकडे हट्ट करू लागलो. बालपणीच्या त्या
वाचनामुळे पुढे मी एक सकारात्मक आणि साहित्यिक व्यक्तिमत्व म्हणून हळू हळू
घडू लागलो.
तंत्रज्ञानामुळे
आजचे युग हे डिजिटल युग म्हणून उदयास येत आहे. परंतु हे केवळ डिजिटल युग
नसून हे ‘ज्ञानयुग’ आहे. जो ज्ञानी असेल तोच या युगात अपेक्षित इप्सित
साध्य करू शकेल. व्यवहार ,व्यवसाय,शेती,राजकारण, संरक्षण आणि इतर अनेक
क्षेत्रांतील ज्ञान हे अतिशय वेगाने वाढते आहे.
आधुनिक
जगात यशस्वी जगण्याची कला आत्मसात करण्यासाठी वाचन कौशल्य अतिशय गरजेचे
ठरणार आहे. जर वाचन कौशल्य प्राप्त केले नाही तर आज आपण डिजिटल युगातही
आउटडेटेड ठरणार आहोत.
वाचाल
तर वाचाल या म्हणींचे महत्व आज आपणा प्रत्येकास समजणे अतिशय महत्वाचे आहे.
शालेय जीवनातील पाठ्यपुस्तके आपल्यात बदल घडवितात तर अवांतर वाचनाची
पुस्तके आपले व्यक्तिमत्व घडवीत असतात. आजच्या इको फ्रेंडली जमान्यात
ईबुक,ऑडिओ बुक,पीडीफ च्या माध्यमातून आपण एकाचवेळी हजारो पुस्तके आपल्या
मोबाईलमध्ये जतन करून ठेवू शकतो. वाचनाची सवय जडल्यावर काय वाचावे आणि कसे
वाचावे हेही आपल्याला आपोआपच अवगत होत जाते. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.
ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये
वाचन प्रेरणा
मैदानात या...! प्रत्येक मुलाने व त्याच्या पालकाने आवर्जून वाचावा असा लेख
गेल्या आठवड्यात माझ्या एका मित्राच्या घरी वाढदिवसासाठी गेलो होतो. वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा होत होता. पाच सहा वर्षांचा त्याचा मुलगा निल केक कापण्यासाठी छान छान कपडे घालून हॉलमध्ये आला. अंगकाठीने अगदी तिडतिडित, डोळ्याला चष्म्याचे कवच आणि कपाळावर दोरीएवढ्या आठ्या असे त्याचे व्यक्तिमत्व. केक कापण्याची वेळ आली त्याने मेणबत्त्या फुंकल्या आणि केक कापण्यास सुरुवात केली आणि तेवढ्यात बाकीच्या चिमुकल्यांनी फुगे फोडण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने त्याच्या डोक्याच्या वर बांधलेल्या फुग्याला अगरबत्ती लावली आणि जोराचा फटाक असा आवाज झाला. आणि तो आवाज होताच बर्थडे बॉय निल मात्र जोरात दचकला आणि त्याच्या आईला बिलगून रडू लागला.
मी माझ्या मित्राला म्हणालो , 'अरे याला जरा धीट बनव".
तसा तो बोलला, ' तो थोडा घाबरतो परंतु खूप हुशार आहे त्याला मोबाईल मधले काहीही विचार तो पटक्यात सांगतो, आणि गेम्समध्ये तर त्याचा कुणी हातच धरू शकत नाही"
मो मोठ्या कुतूहलाने विचारले," काय सांगतो कोणत्या गेम्स ?
मी कबड्डी,खो-खो,क्रिकेट किंवा फुटबॉल या खेळांच्या उत्तराची अपेक्षा करीत होतो पण त्याचे उत्तर ऐकून मलाही धक्का बसला.
तो बोलला, " कँडी क्रश, सुपर मारियो,अँग्री बर्ड, तीन पत्ती आणि बरेच मोबाईल गेम्स.
आता मात्र मला त्याच्या त्या तिडतिडित आणि चष्मेबहाद्दर व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा उलघडा चांगलाच झाला होता. मी त्यानंतर त्याला बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या त्यातील त्याला कितपत पटल्या देवजाणे.
खरं तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मुलांसाठीच आनंदाचा आणि धमाल करण्याचा सोहळा असतो. परंतु पालकांसाठी या सुट्ट्यांत आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव देण्याची ही एक सुवर्णसंधी असते. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाण्यासाठी बालचमूंची लगबग असायची परंतु आता मोबाईलमधील व्हिलेज गेम्सने ती सारी धमालच घालवली आहे. मोबाईल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात मैदानी खेळांचे महत्व दिवसेंदिवस लोप पावत चालले आहे. लगोरी,सूर पारंब्या,क्रिकेट,भवरा, कंचे असे देशी खेळ आज बऱ्याच प्रमाणात फक्त पुस्तकातील आठवणी बनल्या आहेत. पोहणे,धडपडत सायकल शिकणे,धावण्याची स्पर्धा,गच्चीवरचा पत्त्यांचा डाव,आणि रात्री बिछाने पसरून चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत झोपी जाणे या बालपणीच्या सुखाला आजची पिढी पारखी झाली आहे.
दिवसभर छोटा भीम, डॉरेमोन, आणि सुपरहिरोजचे कार्टून पाहण्यात मग्न झालेली मुले कार्टून सारखीच दिसू आणि वागू लागली आहेत. मैदानी खेळांचा विसर पडत चालल्याने सशस्क्त आणि सुदृढ मुलांची जागा घरकोंबडी वृत्तीच्या भित्र्या आणि अशक्त मुलांनी घेतली आहे.
पालकांनी आता वेळीच जागे होण्याची गरज आहे मुलगा मोबाईलमधला मास्टर आहे हे कुतूहलाने सांगण्यापेक्षा त्याला मैदानात आणून त्याच्यातील क्षमतांची त्याला जाणीव करून दिली पाहिजे. तंत्रज्ञानाची आवड आणि ज्ञान नक्कीच हवे परंतु याचे रूपांतर तंत्रज्ञानाच्या व्यसनात व्हायला नको याची काळजीही घेतली गेली पाहिजे.
संत तुकाराम महाराज सांगतात की "पुत्र व्हावा ऐसा गुंडा। ज्याचा तिन्ही लोकीं झेंडा॥" म्हणजेच आपल्या मुलाच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्याची कीर्ती सर्वदूर व्हायला हवी. ही उन्हाळ्याची सुट्टी एक चांगली संधी आहे मुलांना मैदानात आणा शारीरिकदृष्ट्या चपळ आणि सुदृढ बनवा. त्यांच्यातील लठ्ठपणा,अशक्तपणा,एकलकोंडीपणा,हट्टीपणा आणि सुस्तपणा जर आपल्याला पळवून लावायचा असेल तर त्यांना मैदानी खेळांचे प्रशिक्षण द्यायलाच हवे. मैदानी खेळांतून अभ्यासाचा ताण दूर होईल.
मुलांमध्ये संघभावना वाढीस लागेल, नेतृत्वगुणांचा विकास होईल, खिलाडूवृत्ती,कल्पकता,लवचिकता या गुणांसोबतच त्यांचा सर्वांगीण विकासही घडून येईल.
चला तर मग बच्चे कंपनी आता मैदानात या , " आ देखे जरा किसमे कितना है दम?"
गेल्या आठवड्यात माझ्या एका मित्राच्या घरी वाढदिवसासाठी गेलो होतो. वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा होत होता. पाच सहा वर्षांचा त्याचा मुलगा निल केक कापण्यासाठी छान छान कपडे घालून हॉलमध्ये आला. अंगकाठीने अगदी तिडतिडित, डोळ्याला चष्म्याचे कवच आणि कपाळावर दोरीएवढ्या आठ्या असे त्याचे व्यक्तिमत्व. केक कापण्याची वेळ आली त्याने मेणबत्त्या फुंकल्या आणि केक कापण्यास सुरुवात केली आणि तेवढ्यात बाकीच्या चिमुकल्यांनी फुगे फोडण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने त्याच्या डोक्याच्या वर बांधलेल्या फुग्याला अगरबत्ती लावली आणि जोराचा फटाक असा आवाज झाला. आणि तो आवाज होताच बर्थडे बॉय निल मात्र जोरात दचकला आणि त्याच्या आईला बिलगून रडू लागला.
मी माझ्या मित्राला म्हणालो , 'अरे याला जरा धीट बनव".
तसा तो बोलला, ' तो थोडा घाबरतो परंतु खूप हुशार आहे त्याला मोबाईल मधले काहीही विचार तो पटक्यात सांगतो, आणि गेम्समध्ये तर त्याचा कुणी हातच धरू शकत नाही"
मो मोठ्या कुतूहलाने विचारले," काय सांगतो कोणत्या गेम्स ?
मी कबड्डी,खो-खो,क्रिकेट किंवा फुटबॉल या खेळांच्या उत्तराची अपेक्षा करीत होतो पण त्याचे उत्तर ऐकून मलाही धक्का बसला.
तो बोलला, " कँडी क्रश, सुपर मारियो,अँग्री बर्ड, तीन पत्ती आणि बरेच मोबाईल गेम्स.
आता मात्र मला त्याच्या त्या तिडतिडित आणि चष्मेबहाद्दर व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचा उलघडा चांगलाच झाला होता. मी त्यानंतर त्याला बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या त्यातील त्याला कितपत पटल्या देवजाणे.
खरं तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मुलांसाठीच आनंदाचा आणि धमाल करण्याचा सोहळा असतो. परंतु पालकांसाठी या सुट्ट्यांत आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव देण्याची ही एक सुवर्णसंधी असते. पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाण्यासाठी बालचमूंची लगबग असायची परंतु आता मोबाईलमधील व्हिलेज गेम्सने ती सारी धमालच घालवली आहे. मोबाईल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात मैदानी खेळांचे महत्व दिवसेंदिवस लोप पावत चालले आहे. लगोरी,सूर पारंब्या,क्रिकेट,भवरा, कंचे असे देशी खेळ आज बऱ्याच प्रमाणात फक्त पुस्तकातील आठवणी बनल्या आहेत. पोहणे,धडपडत सायकल शिकणे,धावण्याची स्पर्धा,गच्चीवरचा पत्त्यांचा डाव,आणि रात्री बिछाने पसरून चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत झोपी जाणे या बालपणीच्या सुखाला आजची पिढी पारखी झाली आहे.
दिवसभर छोटा भीम, डॉरेमोन, आणि सुपरहिरोजचे कार्टून पाहण्यात मग्न झालेली मुले कार्टून सारखीच दिसू आणि वागू लागली आहेत. मैदानी खेळांचा विसर पडत चालल्याने सशस्क्त आणि सुदृढ मुलांची जागा घरकोंबडी वृत्तीच्या भित्र्या आणि अशक्त मुलांनी घेतली आहे.
पालकांनी आता वेळीच जागे होण्याची गरज आहे मुलगा मोबाईलमधला मास्टर आहे हे कुतूहलाने सांगण्यापेक्षा त्याला मैदानात आणून त्याच्यातील क्षमतांची त्याला जाणीव करून दिली पाहिजे. तंत्रज्ञानाची आवड आणि ज्ञान नक्कीच हवे परंतु याचे रूपांतर तंत्रज्ञानाच्या व्यसनात व्हायला नको याची काळजीही घेतली गेली पाहिजे.
संत तुकाराम महाराज सांगतात की "पुत्र व्हावा ऐसा गुंडा। ज्याचा तिन्ही लोकीं झेंडा॥" म्हणजेच आपल्या मुलाच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्याची कीर्ती सर्वदूर व्हायला हवी. ही उन्हाळ्याची सुट्टी एक चांगली संधी आहे मुलांना मैदानात आणा शारीरिकदृष्ट्या चपळ आणि सुदृढ बनवा. त्यांच्यातील लठ्ठपणा,अशक्तपणा,एकलकोंडीपणा,हट्टीपणा आणि सुस्तपणा जर आपल्याला पळवून लावायचा असेल तर त्यांना मैदानी खेळांचे प्रशिक्षण द्यायलाच हवे. मैदानी खेळांतून अभ्यासाचा ताण दूर होईल.
मुलांमध्ये संघभावना वाढीस लागेल, नेतृत्वगुणांचा विकास होईल, खिलाडूवृत्ती,कल्पकता,लवचिकता या गुणांसोबतच त्यांचा सर्वांगीण विकासही घडून येईल.
चला तर मग बच्चे कंपनी आता मैदानात या , " आ देखे जरा किसमे कितना है दम?"
राजांचा महाराष्ट्र
साधारणतः २/३ वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे. मित्रांसोबत गोव्याला जाण्याचा योग आला होता. रात्री पुण्यातून बसलो आणि सकाळी ८ वाजता गोव्याच्या भूमीत आमचे पाऊल पडले. पणजीला उतरलो समोर अनेक टॅक्सीवाले हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी आग्रह करीत होते. काही गोमंतक भाषिक तर काही हिंदीभाषिक टॅक्सीवाले तिथे प्रवाशांची विचारणा करीत होते. एका हिंदीभाषिक टॅक्सीवाल्याने आमच्याशी संवाद साधायला सुरुवात केली परंतु तो पैसे जास्त सांगत असल्याने आम्ही त्याला नकार दिला आणि पुढे चालू लागलो. मात्र तो मागून दबक्या आवाजात बोलला," गोवा घुमने आये हो या सब्जी खरीदने ? आणि याने आमचा मात्र चांगलाच पारा चढला आणि आम्ही त्याच्या या विक्षिप्त टिप्पणीने त्याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. तेवढ्यात तिघे चौघे टॅक्सीवाले त्याच्या बाजूने धावून आले आणि आमच्याशी अरेरावी करू लागले.
परीक्षा आणि भेजा फ्राय
लवकरच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार असल्याने तमाम विद्यार्थी वर्गाच्या मनात आनंदाचा मनमयूर एव्हाना नाचू लागला आहे. परंतु यासाठी प्रत्येकाला परीक्षारूपी आव्हानही पार करायचे आहे.
परीक्षा म्हटलं ना की दिमागाचा भेजाफ्रय होऊन जातो हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडावर असते. एव्हाना ओस पडलेल्या मंदिरात याकाळात विद्यार्थ्यांची दर्शनवरी सुरु झालेली असते. " देवा फक्त एवढी परीक्षा पास होऊ दे, ' देवा सर्व पेपर सोपे येऊ दे', पर्यवेक्षक थोडा ढिला असावा' अशा एक ना अनेक मनोकामना मनात जागृत होतात.
स्वतःच्या समाधानासाठी 'आल इज वेल' चा फिल्मी मंत्र मुखी ठेवून आपण जो तो या लढाईसाठी सज्ज होत असतो. वर्षभरात आकलनात आणलेल्या गोष्टींचे मूल्यमापन या परीक्षेतून होणार असते. यातून नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे पास किंवा नापास असे दोनच निष्कर्ष निघणार असतात, एखाद्या क्रिकेट मॅच प्रमाणे ड्रॉ होण्याचा प्रश्नच इथे नसतो. परीक्षेत सर्व पेपर्स चांगले गेले तर सुट्टीची धमाल अधिकच वाढते परंतु जर पेपर अवघड गेले तर मात्र निकालापर्यंत व्हेंटिलेटर वर असल्यासारखी गत होते. हुशार मुलांसाठी "मेरीटचा ध्यास" तर ढ (?) मुलांसाठी "काठावर पास" असे ध्येय डोळ्यासमोर असते.
विद्यार्थी दशेत जरी या परीक्षा भेजाफ्राय करणाऱ्या वाटत असल्या तरी आपण ज्यावेळी व्यावहारिक जीवनात मात्र याच परीक्षा आपल्याला एक दिशा देऊन जातात. शाळा-कॉलेजातुन बाहेर पडल्यावर आयुष्याच्या खऱ्या परीक्षेसाठी उतरताना याच परीक्षा आपल्याला अधिकाधिक परिपकव आणि सज्ज करीत असतात. याच परीक्षांसाठी सज्ज होताना आपल्याला खालील काही गोष्टी नक्कीच फायदेशीर ठरतील.
१) तणावमुक्त रहा : परीक्षेला सामोरे जाताना आपण नेहमी तणावमुक्त राहिले पाहिजे. कारण तणावाने आपली बौद्धिक क्षमता कमकुवत होऊन ऐनवेळी उत्तरांचा विसरही पडू शकतो. आपण स्वतःकडून वाजवी अपेक्षा ठेवून भीतीवर मात करून तणावमुक्त परीक्षा देऊ शकतो.
२) सकारात्मक रहा : जर मला पेपर अवघड गेला तर? , मी नापास झालो तर ? अशा नकारात्मक विचारांना प्रथमतः आपण दूर ठेवायला शिकले पाहिजे. माझा छान अभ्यास झाला आहे, मी अगदी खात्रीने चांगले मार्क्स मिळवणार, ' खूप सोप्प आहे रे' अशी विधाने आपल्या तोंडून आली पाहिजेत.
आपण आपल्यात जागृत केलेली सकारात्मक ऊर्जा आपल्यासाठीच फलदायी ठरणारी असते. आत्मविश्वासाने परीक्षेची तयारी केल्यास याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार.
३) संकल्पना समजून घ्या : परीक्षा जवळ आल्या की आपण कमी वेळेत अधिक अभ्यास व्हावा म्हणून पाठांतराचा तडाखाच लावतो. परंतु यामुळे कन्फ्युज होऊन ऐनवेळी पंचायत होण्याची शक्यता अधिक असते. मी अमुक वेळेत संपूर्ण पाने वाचून काढणार असे ठरविल्यास आपला कल गुणात्मक न राहता संख्यात्मक होऊन जातो. परिणामी संकल्पनांचे आकलन न झाल्याने केवळ शब्द आठवतात त्याची बांधणी किंवा विस्तार आपल्याला योग्यरीत्या करता येत नाही. म्हणूनच मूठभर मिठापेक्षा चिमूटभर साखर बरी समजून मोजकेच पण महत्वाचे अशा पद्धतीने संकल्पना समजून घ्याव्यात.
४) स्वतःच्या नोट्स काढाव्यात : बऱ्याचदा काही संकल्पना आपल्याला समजायला जड जातात अशावेळी आपण आपल्याला समजेल अशा पद्धतीने त्याच्या नोट्स काढाव्यात. अनेक दीर्घ संकल्पना संपूर्ण पाठ करत बसण्यापेक्षा त्यातील मुख्य मुद्दे काढावेत. उदाहरणार्थ : भारताचा स्वातंत्र्यलढा स्पष्ट करा ? असा प्रश्न असल्यास सात आठ पाने चाळून काढण्यापेक्षा त्याचे पुढीलप्रमाणे मुद्दे काढावेत. जुलुमी ब्रिटिश राजवट - अन्याय अत्याचार- क्रांतिकारक - लढा व सत्याग्रह - आंदोलने - स्वातंत्र्य इ.
५) तुलना नको - बऱ्याचदा आपण आपली इतरांशी तुलना करीत असतो. आणि यामुळेच इतरांची कॉपी करण्याच्या नादात आपण आपल्यातील क्षमतांना बगल देत असतो. आपल्यातील वेगळेपण आणि आपली पद्धत हि आपल्याला जपता आली पाहिजे. परीक्षेच्या काळात इतरांशी तुलना करण्याच्या नादात आपण आपल्या परीक्षेच्या मूळ ध्येयापासून दूर जात असतो. इतरांच्या प्रगतीवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे आपले आपल्या प्रगतीपथावरचे लक्ष विचलित होत असते. त्यामुळे आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने आपल्या चांगल्या निकालासाठी आपणच परीक्षेची पूर्वतयारी केली पाहिजे.
६) कालपेक्षा उदयाला महत्व द्या - परीक्षेच्या काळात ' पेपर अवघड गेला', लिहायला वेळ मिळाला नाही' अशा वेगवेगळ्या कारणांनी आपण चिंतीत होतो. आणि याच चिंतेत आपण होऊन गेलेल्या गोष्टीवर विचार करण्याच्या नादात उद्याच्या पेपरचे नुकसान करीत असतो. त्यामुळे झालेल्या पेपरवर विचार करण्यापेक्षा उद्याच्या पेपरची पूर्वतयारी आपल्याला ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे करता आली पाहिजे.
७) छोटा ब्रेक हवाच - परीक्षेच्या काळात आपण तहानभूक विसरून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करीत असतो. परंतु याचा म्हणावा तेवढा फायदा होत नाही. वेळेवर खाणे पिणे आणि ठराविक काळानंतर थोडावेळ ब्रेक घेतल्याने मन ताजेतवाने होत असते परिणामी त्याचा आपल्या स्मरणशक्तीला फायदा होत असतो. अधून मधून घेतलेला छोटासा ब्रेक आपल्या मेंदूला थोडावेळ विश्रांती देत असतो त्यामुळे विचारप्रक्रियेचा अधिक चालना मिळत असते.
थोडक्यात काय तर परीक्षेची भीती मनात न बाळगता एक आव्हान समजून व आपली क्षमता ओळखून आत्मविश्वासाने व जिद्दीने परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. परीक्षा हा विद्यार्थीदशेतील एक महत्वाचा टप्पा असल्याने त्यासाठी आपण मानसिकरीत्या सज्ज राहणे आवश्यक असते. थ्री इडियट्स मधील बाबा रणछोडदास प्रमाणे केवळ "ऑल इज वेल" म्हणून अपेक्षित साध्य प्राप्त होणार नाही. म्हणूनच परीक्षेला योग्य ते महत्व देऊन आपणच आपल्या यशाचे शिल्पकार ठरले पाहिजे. परीक्षेला भेजाफ्राय म्हणण्यापेक्षा आपला भेजा"ट्राय" करायला काय हरकत आहे.
वाढदिवस : एक प्रेरणा
वाढदिवस म्हटलं की लहान मुळापासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच हवाहवासा वाटणारा दिवस. जन्माला आल्यापासून आपल्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक वाढीचे आकडेवारीत मोजमाप करणारा दिवस म्हणजेच वाढदिवस.
"सोळावं वरीस धोक्याचं", "वीस वर्षांचा घोडा झालास तरी कळत नाही का", वयाची पन्नाशी गाठली आता रिटायर व्हा', अशी आपल्याला मिळणारी सारी शाब्दिक आभूषणे आपल्याला वाढत्या वयाची जाणीव करून देत असतात.
दिवसेंदिवस या वाढदिवसाचं स्वरूप बदलत चाललंय, धांगडधिंगा आणि ओल्यासुक्या पार्ट्यांनी आपण आपले भविष्यातील वाढदिवस कमी करत चाललोय. खरं तर वाढदिवस साजरा करणे, म्हणजे पुढच्या वर्षात पदार्पण करतांना मागच्या एक वर्षाच्या काळात प्रत्येकाने आपल्याला केलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आपल्याला जन्म देणाऱ्या आईबाबांचा, आपल्याला घडविणाऱ्या कुटुंबीयांचा, शिकवण देणाऱ्या गुरुजनांचा आणि अनुभव देणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद देण्याचा खरं तर हा दिवस.
वाढदिवसाची बदलणारी व्याख्या आपण लक्षात घेतली पाहिजे. शेजारच्या गुप्तेंनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस मोठ्या थाटात केला म्हणून मीही माझ्या मुलीचा वाढदिवस थाटामाटात करणार ही स्पर्धा सर्वत्र पाहावयास मिळते. आणि याच स्पर्धेच्या वातावरणात मोठे होताना मुलंही वाढदिवसांकडे भपकेबाजपणाच्या दृष्टीने पाहताना दिसतात.
एकीकडे पार्ट्या, मद्यप्राशन, पैशांची उधळण, महागडी गिफ्ट वाटप, नाचगाणे, रात्रभर चालणारा धिंगाणा पहिला की मन अगदी सुन्न होतं. आणि मनात विचार येऊ लागतात की सेलिब्रेशन च्या नावाखाली आपण जगण्याची व्यख्याच तर बदलत नाही ना?.
परंतु दुसरीकडे संस्कारांच्या जगात औंक्षण करणे, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेणे, गोडधोड जेवण करणे आणि शुभेच्छांचा विनम्रतेने स्वीकार करून सर्वांना धन्यवाद देणे हे दृश्य अल्हाददायीच.
त्याचबरोबर आजही अनेकजण सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नेत्रदान, रक्तदान करण्याचा निर्णय घेतात. तसेच पार्टीऐवजी पुस्तकवाटप, रोपवाटप, शालेय खाऊवाटप आणि जे इतर समाजोपयोगी उपक्रम राबवतात ते नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. गेल्यावर्षी मीही एका अनाथालयाला भेट देऊन खाऊवाटप केला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हे मला मिळालेल्या हजारोंच्या शुभेछांपेक्षाही अमूल्य होते.
खरं तर वाढदिवस ही एक प्रेरणाच म्हणावी लागेल. एक अशी प्रेरणा जी आपल्या भविष्याचे सुस्पष्ट चित्र रेखाटण्याचा मानस मनात जागविते. आपल्या प्रत्येकाचा वाढदिवस हा आपल्यासाठीचे सुरु होणारे एक नवे वर्ष अथवा नवे पर्वच म्हणावे लागेल. गेल्या वर्षांत काय कमावले आणि काय गमावले यातून योग्य तो बोध घेऊन येणाऱ्या वर्षाच्या समृद्धीसाठी आखल्या जाणाऱया संकल्पांचा शुभारंभ आपण याच दिवसापासून करत असतो. नव्या वर्षात येणाऱ्या संधी,आव्हाने आणि अपेक्षित ध्येये यासाठीचा आराखडा आपण आपल्या मनात रेखाटलेला असतो. आणि गरज असते ती आगामी वर्षभरात ते सारे सत्यात उतरविण्याची.
दरवर्षाला आपल्या वाढदिवसाच्या दिनी आपण आपल्या कर्तृत्वाने यशाची उंचउंच शिखरे सर करण्याचा संकल्प केला पाहिजे.
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ।।
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ।।
या संत तुकारामांच्या अभंगातील प्रत्येक ओळ आपल्याला कशी लागू होईल याचा विचार करून आपण आपले व्यक्तिमत्व घडविले पाहिजे. वाढदिवस हा केवळ शारीरिक किंवा उंचीने वाढीचा दिन न ठरता आपल्या ख्यातीच्या वाढीचा दिवस ठरावा.
एप्रिल फुल चा फंडा !
एप्रिल फुल म्हटलं की आपोआपच मनात गुदगुल्या होऊ लागतात. आणि आपण सकाळपासूनच मोठ्या आवेशाने मूर्ख (फुल) बनविण्यासाठी बकरा शोधू लागतो. बकरा शोधण्याच्या आणि त्याला एप्रिल फुल बनविण्याच्या नादात आपला एप्रिल फुल कधी होऊन जातो हे आपल्यालाही कळत नाही.
मुळात एप्रिल फुल ही संकल्पना मला लहानपणी आपण प्रत्येकाने ऐकलेल्या एका गोष्टीसारखी वाटते. आणि ती गोष्ट म्हणजे "लांडगा आला रे आला" त्या गोष्टीतील मेंढपाळ दररोज गावकऱ्यांचा एप्रिल फुल करण्यासाठी 'लांडगा आला रे आला' अशी आरोळी देत असतो. आणि त्याची आर्त हाक ऐकून गावकरीही हातातली सर्व कामे टाकून धावून येत असतात. परंतु एके दिवशी खरोखरच लांडगा येतो आणि कोणीही धावून न आल्यामुळे त्याची काय फजिती होते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे.
आता यातून बोध घ्यायचा किंवा वर्षातून एकदा लोकांना मूर्ख बनविण्यात गैर ते काय ? हे आपल्या प्रत्येकालाच ठरवायचे आहे.
काल अशाच एका सामाजिक कार्यक्रमाला जाण्याचा योग आला अनेक मान्यवर त्या व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील लोक आपले मनोगत व्यक्त करत होते आणि लोकही प्रत्येक वक्त्याला टाळ्यांनी यथायोग्य दादही देत होते. अचानक त्या भागातील राजकीय पुढारी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह तेथे हजर झाले. त्यांचा सत्कार वगैरे उरकला आणि त्यांच्या भाषणाला सुरुवात झाली. त्यांनी नेहमीच्या शैलीत कार्यक्रमाचा मूळ मुद्दा सोडून त्यांनी केलेल्या कामांचा पाढा वाचायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भरमसाठ अशा आश्वासनांची खैरात करायला सुरुवात केली. सर्वजण शांततेने ऐकत होते. भाषण शेवटाकडे चालले होते आणि त्यांची आश्वासने संपत नाहीच तोवर गर्दीतून एका गृहस्थाने दबक्या आवाजात "एप्रिल फुल का ?" असे म्हटले. आणि काही सेकंदातच कार्यक्रमाच्या त्या गर्दीत एकच हशा पिकला. तें पुढारी मात्र पुरतेच भांबावले आणि घाम पुसत आपले भाषण आटोपून व्यासपीठावर आपल्या जागी जाऊन बसले. हा किस्सा विनोदासाठी नक्कीच चांगला आहे परंतु यातून डोकावणारी वास्तविकताही आपल्या लक्षात यायला हवी.
काल मलाही या एप्रिल फुलचा चांगलाच अनुभव आला यात अनेक मित्रांनी मला पद्धतशीर एप्रिल फुलही केले. त्याचवेळी मनात विचार आला की एप्रिल फुल बनविण्यासाठी विशिष्ट अशा एकाच दिवसाची काय गरज आहे. कारण समाजात आपल्या स्वार्थासाठी आणि कार्यभागासाठी अनेकजण बाराही महिने लोकांना एप्रिल फुल बनवत असतातच की !
मुळात प्रामाणिकता आणि विश्वासार्हता आज मोठ्या प्रमाणात लयास जात असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. विविध प्रलोभने,आश्वासने आणि आमिषे दाखवून लुटण्याचे धंधे आज ऑनलाईन आणि ऑफलाईनही चालू आहेत. आपण १ एप्रिलचे औचित्य साधून लोकांना मूर्ख बनविण्याची संधी शोधत असतो, परंतु आपण स्वतः वर्षभर एप्रिल फुल ठरत असतो. मुळात या स्मार्टफोनच्या जमान्यात आपणही स्मार्ट होण्याची आज नितान्त गरज आहे. कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी सुज्ञता आणि गुणग्राहकता आपल्याला आपल्या अंगी बनवायला हवी.
एप्रिल फुल बनवायचाच असेल तर आपणच आपल्यातील वाईट प्रवृत्तींना एप्रिल फुल करायला शिकले पाहिजे. दररोज उशिरा उठण्याच्या सवयीला अचानक पहाटे उठून, व्यायाम करून आपल्या अंगातील आळसाचा एप्रिल फुल केला पाहिजे. स्वतःला नेहमीच अज्ञानी समजणाऱ्या आपल्या मनाला वाचनाची सवय लावून अज्ञानाचा एप्रिल फुल केला पाहिजे. सर्वांशी जिव्हाळ्याने वागून आपल्यातील अहंकाराचा एप्रिल फुल केला पाहिजे. गरजवंतांना मदतीचा हात देऊन आपल्यातील स्वार्थाचा एप्रिल फुल केला पाहिजे. अशा अनेक अयोग्य गोष्टी आहेत ज्यांचा एप्रिल फुल करून आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार ठरू शकतो.
चला तर आता एप्रिल फुल चा फंडा जरा वेगळ्या पद्धतीने अजमावून थोडेसे होपफ़ुल (Hopeful) आणि कलरफुल व्यक्तिमत्व घडवूया.
लेखक : सागर ननावरे
मार्चअखेर : आयुष्याचा ताळेबंद
मार्च महिना म्हटलं की संपूर्ण वर्षभरातील आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद आणि लेखाजोखा मांडण्याचा काळ. या मार्च महिन्यात कोणालाही फोन करायचा म्हटलं तरी प्रत्येकाचा एकच सबब ठरलेला असतो आणि तो म्हणजे "मार्च एंडिंग आहे ना!" .
आपण वर्षअखेरीस आर्थिक ताळेबंद सादर करण्यासाठी ज्याप्रमाणे धावपळ करतो अगदी त्याचप्रमाणे दरवर्षी आपण आपल्या आयुष्याचा ताळेबंद करतो का ? खरं तर हा प्रश्न थोडासा विचित्र जरी वाटत असला तरी त्यातील अर्थपूर्णता आपल्याला समृद्ध करणारी आहे.
सुखाचा गुणाकार करा
दुःखाचा भागाकार करा
ज्ञानाची बेरीज करा आणि
वाईट प्रवृत्तीची वजाबाकी करा
आणि मग बघा आयुष्याच्या गणित अगदी सुटसुटीत होऊन जाईल.
मार्च एंडिंग च्या निमित्ताने जर आपण आपल्या आर्थिक ताळेबंदासोबत जर आयुष्याच्या ताळेबंदाचेही योग्य मोजमाप केल्यास आपल्या प्रगतीचा आलेख नक्कीच उंचावत जाईल.
"वर्षभरात ओंजळीत आले ते सोने आणि ओघळून गेले ते मातीत मिळाले" हा दृष्टिकोन अंगी बाणवून आपण पुढे मार्गाक्रमण केले पाहिजे. जुन्या कटू आठवणी,जुने वाईट अनुभव यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्यापेक्षा त्यातून एक नवा अनुभव घेऊन नव्या प्रभातीकडे लक्ष केंद्रित करायला हवे.
बऱ्याचदा आपण अगदी सहजपणे बोलून जातो की "माझ्या आयुष्याचं गणितच चुकलं" परंतु गणित का चुकलं याचा आपण विचार करत नाही. मुळात गणित चुकलेलंच नसते, चुकलेली असतात ती त्या आयुष्यातल्या गणिताची चिन्हे. कोणत्या वेळी कोणत्या चिन्हांचा वापर करावा याची गफलत झाल्याने हा सारा दोषांचा पाढा आपल्याला वाचावा लागतो. आयुष्यातल्या विविध अनुभवांत बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार हि चिन्हे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वापरल्यास उत्तर अगदी आपल्या मनासारखे येते.
आयुष्याच्या गणितात आत्मविश्वास, मेहनत,चांगली माणसे, ज्ञानार्जनाची साधने, उमेद, जोश, कल्पकता आणि चिकाटी यांची आपल्याला योग्य बेरीज करता आली पाहिजे. निराशा, वाईट प्रवृत्ती, नकारात्मकता, न्यूनगंड,भीती आणि ताणतणाव यांची वजाबाकी आपण हेतुपूर्वक करायला हवी.
तसेच सकारात्मकता, सामाजिक बांधिलकी, आर्थिक सुबत्तता, कौटुंबिक सलोखा, निरोगी स्वास्थ्य, संधी आणि मानसिक स्थैर्य यांचा गुणाकार आपल्याला अवगत असायला हवा.
दुःख, कटू अनुभव,आळस आणि चालढकलपणा यांचा वेळेप्रमाणे भागाकार करता आला पाहिजे.
सर्वांत महत्वाचे म्हणजे आयुष्याच्या गणितातील ताळेबंदात अपेक्षा, गृहितता, परावलंबन आणि रिस्क यांना कधीच हातचा समजू नये किंबहुना त्यांची जागा शक्यतो कंसातच ठेवावी.
खरं तर या मोजमापासाठी कोण्याही मोजपट्टीची, तराजूची किंवा फुटपट्टीची गरज भासत नाही यासाठी आपल्याकडे प्रगल्भतेचा आणि कृतिप्रधानतेचा तल्लख मेंदूरूपी कॅल्क्युलेटर असावा लागतो.
गेल्या वर्षात आयुष्याच्या ताळेबंदात आपण काय कमावले (credit) आणि काय गमावले(debit) याचा पारदर्शक लेखाजोखा (अकौंटिंग) आपल्याला ज्ञात असावा.
हा आयुष्याचा ताळेबंद करताना तो केवळ आपल्या मनाच्या समाधानासाठी नसावा तर आपल्या भविष्याला समृद्ध करण्याच्या हेतूने केलेला असावा.
मित्रांनो मार्च एंडिंग सुरु आहे चला तर मग आपल्या आयुष्याचा ताळेबंद अधिकाधिक सुस्पष्ट आणि पारदर्शक कसा होईल याचा विचार करूया. कारण "खर्च झाल्याच दु:ख नसतं परंतु हिशोब लागला नाही की त्रास होतो..!" अशी म्हणण्याची वेळ आपल्यावर यायला नको एवढीच अपेक्षा.
लेखक: सागर ननावरे
Subscribe to:
Posts (Atom)