Tuesday, 30 August 2016 0 comments

आदर्श हवाच

                               आदर्श हवाच 

कोणत्याही व्यक्तीची जडणघडण ही तो जन्मापासून करत असलेल्या अनुकरणातून होत असते. कोणीही जनताच वेगळ्या धाटणीचा किंवा वेगळ्या विचारसरणीचा नसतो इतरांच्या अनुकरणानेच माणूस शहाणा होत असतो. पुढे जाऊन जसजसे वय वाढते तसतशी अनुकरणाची जागा एक संकल्पना घेते आणि ती म्हणजे 'आदर्शवाद'. आपल्या मनावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तिमत्वाचा किंवा घटनेचा आदर्श घेऊन आपण आयुष्य जगात असतो. छात्र अध्यापकाची पदविका घेत असताना आम्हाला मानसशास्त्र विषयात एक आदर्शवादाचा सिद्धांत होता. ज्यामध्ये आपण ज्या व्यक्तीला आदर्श मानतो त्या व्यक्तीच्या विचारांचा आणि वर्तनाचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. 
 याचाच चांगलाच प्रत्यय मला मागील आठवड्यात आला,
माझा एक मित्र एका सिने अभिनेत्याचा अगदी जबरा फॅन  नेहमी त्याचेच अनुकरण करणारा. त्याच्या प्रत्येक गोष्टीत स्वतःला त्याच्यासारखे ठेवू पाहणारा थोडक्यात काय तर त्याला स्वतःचा आदर्श मानणारा. कालपरवा तो मित्रांबरोबर गडावर फिरायला गेला आणि तिथे पाय घसरून पडला म्हणून त्याला पाहायला मी त्याच्या घरी गेलो. आणि मी त्याला विचारले हे असं कसं काय झाले ? त्यावर शेजारी बसलेला त्याचा मित्र हसत हसत सांगू लागला,' काय सांगायचं साहेब एका उंच पायरीवर उभे राहून सेल्फी काढताना आवडत्या हिरोची ऍक्शन करायला गेला आणि घेतला हात मोडून, मला हसावे की रडावे काही कळेना.
शिवरायांचा इतिहासाची साक्ष देणाऱ्या गडावर गेलेला एक तरुण अवघ्या जगाला आदर्श देणाऱ्या शिवछत्रपतींचा आदर्श घेण्यापेक्षा असा विचित्र आदर्श कसा घेऊ शकतो?

मी विचार करू लागलो सिनेमाप्रेमात किंवा चुकीच्या गोष्टींत आपण इतके आंधळे होतो की आपल्याला चांगल्या वाईटाचा विसरच पडून जातो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या गुरुसोबतच एक आदर्श व्यक्तीही असतो एक असा व्यक्ती की जो प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात त्याच्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. 
म्हणूनच प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्वात आणि आपल्या विचारशैलीत सकारात्मक बदल घडवून आणेल असाच आदर्श आपल्या नजरेसमोर ठेवायला हवा. आपली येणारी पिढी हीसुद्धा आपल्या अनुकरणातूनच स्वतःचे भवितव्य अजमावणार आहे त्यामुळे याचे भान ठेवूनच आपले आचरण आपण ठेवायला हवे. अभिनेते, नेते, उद्योगपती किंवा समाजसेवक कोणीही असो फक्त त्यांच्यातील चांगल्या गोष्टीचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाला एक नवा आकार देणे हे शेवटी आपल्याच हाती असते. सलमान खानला युथ आयडॉल म्हणवणाऱ्यांनी सुदृढ शरीरयष्टीसाठी किंवा दानशूरपणासाठीच फक्त त्याचा आदर्श ठेवावा त्याच्याप्रमाणे गाडी चालवण्याचा प्रयत्न केल्यास काय परिणाम होतील हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भारतासारख्या विशाल देशात जगाला आपली दाखल घ्यायला लावणारे अनेक दिग्ग्ज व्यक्तिमत्व होऊन गेली किंबहुना आजही सक्रिय आहेत आपण त्यांचाच आदर्श घ्यायला हवा. 
शेवटी आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते एकदाच मिळत असतं त्यामुळे मिळालेल्या आयुष्यात आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा कसा आणि कोणाचा आदर्श घेऊन उमटवायचा हे आपल्याच हाती आहे. चला तर मग एक अशा आदर्श आपल्यासमोर ठेऊया ज्याच्या आचार विचारांच्या जडणघडणीतून उद्या लोक आपल्याला आदर्शस्थानी ठेवतील. 
Saturday, 20 August 2016 0 comments

फ़िर मिलेंगे चलते चलते.........चला माणसे जोडूया

                          फ़िर मिलेंगे चलते चलते.........

कालपरवाच एक विचार ऐकण्यात आला जो मनाला अजिबात पटला नाही, तो विचार होता आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा.नाहीतर तासभर साथ देणारी माणसं बस मध्ये पण भेटतात. 
याचाच सरळसरळ अर्थ असाही होतो की फक्त कामापुरती माणसे जोडा. पण आपण जर फक्त कामापुरतीच माणसे जोडली तर भले पैसापाणी अमाप कमवू परंतु तुटपुंजी माणुसकी   मात्र नक्कीच आपल्याही वाट्याला येईल. 
खरं तर आपल्याला एकदाच मिळालेल्या सुंदर आयुष्यात आपण पैशाने फक्त वलय प्राप्त होते परंतु त्याबरोबरच जोडलेल्या माणसांमुळेच आपल्या आयुष्याची समृद्धी ठरत असते.  माणसे जोडणे हि एक कला आहे, एक अशी कला कि जी विनाभांडवल आणि बिनपैशानेसुद्धा आत्मसात करता येते. 
एक दिवस असाच आमचा संपूर्ण स्टाफ जेवायला बसला होता आणि त्यात विषय चालला होता माणसांचा आणि माणुसकीचा. या विषयावर प्रत्येकजण अपप्ल्याला आलेले अनुभव तिथे शेअर करत होता. त्यात आमच्या  सरांनी त्यांच्या ऐकण्यात आलेली माणसे जोडण्याची  एक सुंदर गोष्ट आम्हाला सांगितली आणि ती गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते.
एके दिवशी एका कंपनीचा एक वरिष्ठ अधिकारी कंपनीत बराचवेळ मशीनच्या ऑपरेटिंगचे काम करत बसला होता. पाहता पाहता खूप उशीर झाला सर्वजण आपापली कामे  उरकून एव्हाना  घराकडे परतली होती. 
अचानक त्या कंपनीतील एका मशीनमध्ये बिघाड झाला आणि त्या मशिनच्या एका धोकादायक  भागात तो अधिकारी अडकून पडला. तो जीवाच्या आकांताने मोठमोठ्याने "मला वाचवा मला वाचवा …मि इथे अडकून पडलोय....... कुणीतरी  मला वाचवा प्लीज  " असे ओरडू लागला. परंतु मशिनच्या आवाजाने त्याच्या विनवण्या दुर्दैवाने कुणाच्याही कानावर गेल्या नाहीत. देवाचा जप केला प्रार्थना केल्या परंतु तास उलटून गेला मात्र त्याला आशेचा कोणताच किरण दिसेना. परिणामी परिस्थितीशी हतबल झालेल्या त्या अधिकार्याला येणाऱ्या काही वेळात त्याचा अंत होणार याची पुरेपूर खात्री झाली होती.  
तेवढ्यात त्याला एका माणसाचा अस्पष्ट आवाज ऐकू आला "साहेब ओ साहेब कुठे आहात तुम्ही?"
तसे त्या अधिकार्याने पुन्हा एकदा पूर्ण जीव लावून ओरडण्यास सुरुवात केली. तो ओरडण्याचा आवाज ऐकताच तो माणूस त्या आवाजाच्या दिशेने धावत गेला आणि त्याने त्या अधिकार्याला त्या मशीनमधून शर्थीने बाहेर काढले.
तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून त्या कंपनीचा वॉचमन होता. त्या अधिकार्याने त्याचे आभार मानून त्याला विचारले  " तू गेटवर कामाला आहेस तुला आत यायची परवानगी नाही तरी तू इथे मला वाचवायला आलास, तुला कसे कळले कि मी आत आहे ते?
त्यावर तो  वॉचमन उदगारला " साहेब या कंपनीत तुम्ही एकटेच असे साहेब आहात कि जे रोज येताजाता मला हसतमुखाने नमस्कार करता. आज तुम्ही आत जाताना दिसले परंतु परत बाहेर येताना दिसले नाहीत आणि बराच वेळही निघून गेला म्हणून म्हटलं नक्कीच काहीतरी गडबड असणार...!
त्या माणसाला गहिवरून आले  आपण इतरांच्या मनात माणुसकीच्या नात्याने पेरलेल्या बियाणाने   आज त्याला जीवनदानरुपी फळ दिले होते. 

म्हणूनच आपल्या आयुष्यात रोज येणारा किंवा योगायोगाने काही क्षणांपुरता येणारा प्रत्येक माणूस हा तितकाच महत्वाचा असतो. म्हणून माणूस कोणताही आणि कसाही असो माणूस हा माणसाची भविष्यकाळातील शिदोरी असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात येणारा माणूस मग तो उच्च- नीच, श्रेष्ठ- कनिष्ठ, किंवा कसाही असो प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासता आले पाहिजेत. कारण बर्याचवेळा मूर्तीत देव शोधण्याच्या अट्टाहासापायी आपली  मानवरूपात आलेल्या देवदूताला नाकारण्याची चुक आपल्याला संकटांच्या खाईत लोटू शकते. माणसांच्या आयुष्याची किंमत हि त्याच्या पैसा किंवा प्रतिष्ठेवर ठरत नसून त्याच्या कठीण प्रसंगात धावून येणार्यांच्या संख्येवर समजत असते. 
चला तर मग आपल्या मनाच्या कोपर्यात  धूळ खात पडलेल्या त्या माणुसकीच्या चुंबकाला  माणसे जोडण्यासाठी एक नवी उर्जा देऊया. समोरच्या व्यक्तीला हास्य देऊन, त्याचे मनापासून कौतुक करून, वेळप्रसंगी आभार मानून आणि आपणहून पुढाकार घेऊन उद्याच्या निस्वार्थी व सुंदर नात्याची गुंफण करूया.
हम है राही प्यार के ……फ़िर मिलेंगे चलते चलते.........


सागर नवनाथ ननावरे 
sagar nanaware

Friday, 19 August 2016 0 comments

कशाला हवा वंशाला दिवा?

                                                           कशाला हवा वंशाला दिवा?
                                                                         

                                                           ऑलिम्पिक २०१२ 
                                                             एकूण पात्र = ८३
                                                               पुरुष = ६० 
                                                                  महिला = २३

                                                          ऑलिम्पिक २०१६ 
                                                            एकूण पात्र = ८६
                                                                  पुरुष = ४८
                                                                  महिला = ३८ 

* गेल्या ऑलिम्पिकच्या तुलनेत पात्र खेळाडूंत महिलांचा वाढता आकडा तर पुरुषांची घसरण...
* पदकतालिकेतसुद्धा सिंधू आणि साक्षीमुळे भारत आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या यादीमध्ये...

 सिंधू आणि साक्षी तुमच्या  जिगरबाज खेळाला आमचा सलाम.
 ताई तुमच्यामुळे या देशातील मुलगाच हवा हि मानसिकता हळू हळू बदलेल आणि वंशाचा दिवासुद्धा उद्या मुलीच्या जन्मासाठी दुवा करेल.

नारीशक्तीला सलाम आणि शुभेच्छा 

- सागर नवनाथ ननावरे

Sunday, 14 August 2016 0 comments

अचूक निर्णयाने यशप्राप्ती 

अचूक निर्णयाने यशप्राप्ती 

आयुष्यात आपल्याला यश मिळावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि त्यासाठी काहीही करण्याची  तयारीही असते. परंतु यासाठी आपल्या अंगी काही चांगले गुण बाणविणेही आवश्यक असते त्यापैकीच एक महत्वाचा गुण म्हणजे निर्णयक्षमता. 

बऱ्याचदा आपल्यासमोर उपलब्ध असणाऱ्या अनेक पर्यायांपैकी आपल्याला योग्य वाटणाऱ्या एक पर्यायाची  निवड करणे म्हणजे निर्णय घेणे होय

 आयुष्यात आपली अनेकदा " क्या करे क्या ना करे ?' अशी अवस्था होत असते अशावेळी आपण एका  विलक्षण मानसिक तणावाला सामोरे जात असतो. अशा परिस्थितीत आपण निर्णय कसा घ्यावा यासाठी इतरांवर अवलंबून राहतो  त्यातून बरेचदा समाधान मिळते परंतु अपेक्षित इप्सित साध्य होतेच असे नाही. याशिवाय एखादा निर्णय घेताना होणारा मानसिक आणि भावनिक गुंता हा आपल्याला नाकारात्मकतेकडे घेऊन जात असतो आणि यामुळेच बऱ्याचदा यश आपल्याला हुलकावणी देत असते. 

असाच एक मुलगा ज्याला लहानपणापासून फुटबॉलची प्रचंड आवड होती फुटबॉल खेळताना गोल किपर म्हणून तो सर्वांत प्रसिद्ध होता.

 इयत्ता पाचवीपासून त्यानेविविध शालेय, जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडास्पर्धांत भाग घेऊन चांगले यशही मिळवले. पुढे जाऊन मोठे होऊन एक तर चांगला मोठा फुटबॉल प्लेयर व्हायचे किंवा आर्मीमध्ये जाऊन देशाची सेवा करायची हे स्वप्न उराशी त्याने बाळगले होते. एक दिवस असाच मैदानावर तो त्याच्या मित्रांसह फुटबॉल खेळत होता त्याच मैदानावर शेजारी काही मुले क्रिकेट खेळात होती. क्रिकेट खेळणाऱ्या टीम मध्ये एक खेळाडू कमी पडत असल्याने क्रिकेट कोचने त्या गोल किपींग करणाऱ्या मुलाला एक सामन्यासाठी यष्टीरक्षक म्हणून घेतले. गोल किपींग मध्ये असणारे नैपुण्य त्याने यष्टिरक्षणातही तंतोतंत पाळले आणि त्याच्या त्या खेळीने सर्वच अवाक झाले. कारण त्याने केलेले यष्टिरक्षण त्या टीमसाठी आजपर्यंतचे सर्वोत्तम यष्टिरक्षण होते. पुढे जाऊन त्या प्रशिक्षकाने त्याला क्रिकेटमध्ये यष्टिरक्षण करण्याचा सल्ला दिला आणि त्याक्षणी क्रिकेटचे देशातील भविष्य आणि आपल्यातील असणारी क्षमता ओळखून त्याने क्रिकेर्टमध्ये करियर करण्याचा निर्णयही  घेतला. आणि याच फुटबॉल प्लेयरने पुढे क्रिकेटमध्ये आपले योगदान देऊन संपूर्ण  देशाला आणि जगाला आपली दखल घ्यायला लावली.  आणि तो क्रिकेटर म्हणजेच भारताला विषवचशक जिंकून देणारा  भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, यष्टीरक्षक आणि जगातील एक सर्वोत्तम फलंदाज म्हणजेच महेंद्रसिंग धोनी.   

याच धोनीने जर आपल्यातील क्षमता आणि परिस्थिती याचा विचार करून त्यावेळी योग्य निर्णय घेतला नसता तर कदाचित भारतीय संघाला असा यशस्वी आणि निर्णायक खेळी करणारा कॅप्टन मिळाला नसता.  

आयुष्यात  निर्णय हा व्यक्तिगत, कौटुंबिक, कार्यालयीन किंवा सर्वानुमते घेण्याच्या स्वरूपाचाही असू शकतो परंतु तोच निर्णय आपल्याला प्रसंगावधान राहून आणि परिस्थितीचा विचार करून अचूकपणे घ्यावा लागतो. 

 एक  निर्णय आपले पूर्ण आयुष्य बदलू शकतो  किंवा आपल्या  आयुष्यावर परिणामही करू शकतो.  यामुळे निर्णयाला एक जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे आणि त्या अनुशंघाने अचूक निर्णयक्षमता आपल्यात विकसित केली पाहिजे. आलेल्या समस्येवर मात करून एखादा निर्णय जितका अचूक, योग्य, परिस्थितीचा सारासार विचार करून  घेतला जातो तितकी आपली निर्णयक्षमता प्रगल्भ  असते. 

चला तर मग आपला निर्णय अचूक कसा ठरेल यासाठी सदैव प्रयत्नशील राहूया. आपण जो निर्णय घेऊ त्याच्याशी प्रामाणिक आणि सकारात्मक राहूया यश आपलेच असेल

सागर नवनाथ ननावरे 

Wednesday, 10 August 2016 0 comments

चिकाटी आणि सातत्य



                                 चिकाटी आणि सातत्य
आपल्या प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी होण्याची तसेच इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवण्याची इच्छा असते. आपण प्रत्येकजण त्यादृष्टीने बर्याचदा प्रयत्नही करतो परंतु "नव्याचे नऊ दिवस"या उक्तीप्रमाणे आपण काही काळानंतर त्याला कंटाळून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो . परिणामी आपण आखलेली योजना किंवा आपण ठरवलेले ध्येय पूर्णत्वास जात नाही आणि त्यामुळेयश आपल्याला नेहमीच हुलकावणी देत राहते. आयुष्यात अनेक गोष्टींत असलेला चिकाटी आणि सातत्याचा अभाव हे अपयशाचे मुख्य कारण असते. नवीन वर्षासाठी केलेले अनेक संकल्प आपणवर्षाखेरीसपर्यंत तडीस नेतो का? डायरी लिहिणे,जमा खर्चाच्या नोंदी करणे, नियमित व्यायाम करणे, वाचनास सुरुवात करणे आणि आयुष्यात राहिलेल्या अनेक गोष्टी पूर्ण करणे अशा कितीतरीसंकल्पांना आपण अर्ध्यावरती सोडून देत असतो. आणि याच सवयीचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो आणि त्यातून अपेक्षित ध्येये,उद्दिष्टे आपणास साध्य  करता येत नाहीत.
सातत्य आणि चिकाटीचे एक आदर्श उदाहरण म्हणजे  जगप्रसिद्ध  रॉकी चित्रपटाचा अभिनेता  सिल्वेस्टर स्टॅलोन पुढे तो " रॉकी" नावानेच ओळखला जाऊ लागला. लहानपणापासूनच अभिनयाचीआवड असलेला सिल्वेस्टरने आपले पदवीचे शिक्षण अर्धवट सोडून ऑडिशन देण्यासाठी न्यू यॉर्क गाठले. बरेच ऑडिशन देऊनही त्याची निवड होत नव्हती त्यादरम्यान त्याने अपयशाने खचून नजाता पटकथा लिहिण्याचा आपला दिनक्रम सुरूच ठेवला. परंतु सततच्या अपयशाने आणि ऑडिशनने जवळचा संपूर्ण पैसा पाहता पाहता संपूनही गेला आणि त्यामुळे कुटुंबाला दोन घासदेण्यासाठी त्याला पत्नीचे दागिनेही विकावे लागले आणि एक वेळ अशी आली कि त्याला पैशासाठी आपल्या प्रिय कुत्र्यालाही विकावे लागले. अशा परिस्थितीतही मिळेल ते कोणतेही छोटे मोठे काम न करता आता सर्वांसमोर यायचे तर एक चांगला अभिनेता म्हणूनच  हा मनाचा ध्यास मात्र ठाम होता. पुढे त्याने स्वतः लिहिलेल्या ‘रॉकी' च्या  पटकथेला तब्बल 1500 पेक्षा अधिक  वेळारिजेक्ट केले गेले. परंतु त्याने चिकाटी व सातत्य सोडले नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढे त्याच पटकथेवर कमी मानधनावर त्याला अभिनेता म्हणून चमकण्याची संधी एका दिग्दर्शकानेदिली. पुढे 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी' ने जगभरात अनेक विक्रम प्रस्थापित करून जगासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. पुढे सिल्वेस्टर स्टॅलोनच्या 'रॉकी' आणि 'जम्बो' चित्रपटांच्या सिरीज आणि इतर हिट चित्रपटांनी सिल्वेस्टर स्टॅलोनला जगभरात प्रचंड प्रसिद्धी व श्रीमंती मिळवून दिली. थोडक्यात काय तर सिल्वेस्टर स्टॅलोनने अपयशाने किंवा प्रतिकूल परिस्थितीने अजिबात न डगमगता आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि भव्यदिव्य यशाने जगभरात आपली कीर्ती पसरवली. 
आपल्या अस्तित्वासाठी आणि प्रत्येक सजीवाला विशिष्ट गुण आत्मसात करावे लागतात आणि त्यातीलच एक महत्वाचा गुण म्हणजे चिकाटी. आज हाडामांसाच्या मानवप्राण्याला लाजवेल अशी चिकाटी आकाराने अतिसूक्ष्म असणार्या मुंग्यामध्ये पहावयास मिळते. मुंग्या या  शरीराने, मेंदूने मानवापेक्षा जरी लहान असल्या तरी त्यांची तुलना आज बलाढ्य प्राण्यांशी केली जाते त्याचे कारण म्हणजे मुंग्यांत असणारा विलक्षण असा चिकाटीचा गुण. समोर परिस्थिती कितीही प्रतिकूल  असली तरी मुंगी आपला कार्यभार  सोडत नाही.  मार्गात येणाऱ्या प्रत्येक  अडथळ्यांवर मात करून मुंगी चिकाटीच्या जोरावर आपली मार्गक्रमणा चालूच ठेवते आणि हाच गुण आपण अवगत करण्याची गरज आहे.
आयुष्य हि एक  मॅरथॉन आहे आणि ही मॅरथॉन जिंकण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या अंगी सातत्य आणि चिकाटी असणे अत्यंत गरजेचे आहे.  चला तर मग आखलेले ध्येय, पाहिलेली स्वप्ने आणिठरवलेल्या गोष्टी आपल्यातील चिकाटीच्या जोरावर पूर्णत्वास नेउन यशाची एक नवी उंची गाठूया......
सागर नवनाथ ननावरे 
0 comments

  कोई कहे.... केहता रहे                                              
 लोक काय म्हणतील ???
माणूस हा समाजशील प्राणी म्हणून भूतलावर गणला जातो. कारण संघटन, सामाजिकता आणि स्वातंत्र्य यासारख्या अनेक गोष्टी मानवाला सहज प्राप्त झालेल्या आहेत. परंतु समाजशील असलेला मानवप्राणी जेव्हा समाजिक दडपणाखाली जगतो तेव्हा त्याच्या प्रगतीला मर्यादा येऊ लागतात. सामाजिक दडपण म्हणजेच कोणतीही सुयोग्य गोष्ट करताना समाजाच्या मताचा गरजेपेक्षा जास्त विचार करणे, थोडक्यात सामाजिक दडपणाचे ब्रीदवाक्य म्हणजे "लोक काय म्हणतील?"
घरात डान्स करावा म्हटलं  तर घरचे काय म्हणतील?, ऑफिस मध्ये बिनधास्तपणे गीत गुणगुणावस वाटलं तर  स्टाफ काय म्हणेल? घराशेजारच्या मैत्रिणीशी मनमोकळ्या गप्पा माराव्याश्या वाटल्या तर आजूबाजूचे काय म्हणतील? आणि अशातून लाजरे बुजरेपणा आला तर पुन्हा "लोक काय म्हणतील?" 
खरं तर आपल्या आयुष्याच्या प्रवासातला "लोक काय म्हणतील?"  हा मनाचा एक  बिघडलेला सिग्नल असतो. जो सिग्नल आपल्याला हव्याहव्याश्या वाटणाऱ्या कृतींना नेहमीच लाल दिवा दाखवून थांबवत असतो. या सिग्नल ची आपल्याला इतकी सवय लागून जाते कि यामुळे आपल्या ध्येयाकडे जाण्याचा आपला वेग आपोआपच कमी होत असतो. 
या विषयावरच एका प्रेरणादायी कार्यक्रमात ऐकण्यात आलेली एक गोष्ट याला अगदी तंतोतंत लागू पडते.  सात आणि पाच वर्षे वय असणारी दोन भावंडे एकदा घराशेजारी खेळत होती. मोठा भाऊ पुढे पळत होता आणि लहान भाऊ त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत होता. दोघांचा खेळ ऐन रंगात आलेला असतानाच मोठ्या भावाचा पाय घसरला आणि तो एका खोल खड्ड्यात जाऊन पडला. मोठा भाऊ मोठमोठ्याने रडू लागला बाहेर काढण्यासाठी विनवण्या करू लागला परंतु काहीकेल्या त्याला बाहेर पडता येईना. लहान भाऊही अस्वस्थ झाला आपला मोठा भाऊ खड्ड्यात पडला आहे आजूबाजूला कोणीच नाही आता याला बाहेर कसे काढायचे याचा विचार करू लागला. परंतु वयाने लहान असणारा तो छोटा भाऊ तरी काय करणार म्हणून तो मोठा भाऊ अजूनच जोरजोरात रडू लागला. तेवढ्यात लहान भावाने एका झाडाखाली पडलेला एक मोठा कासरा घेतला  आणि  शेजारीच पडलेल्या एका मजबूत लाकडाच्या मध्यभागी  तो कासरा बांधला. त्यानंतर  एक टोक आपल्या हातात धरून दुसरे लाकूड असणारे टोक भावाच्या दिशेने भिरकावले. मोठ्या भावाने त्या लाकडाला घट्ट पकडले तसे छोटा भाऊ आपली पूर्ण शक्ती पणाला लावून त्याला ओढू लागला. पाहतापाहता तो मोठा भाऊ खड्ड्याबाहेर आला रडतरडत घरी आला. त्याने घडलेला सर्व प्रसंग घरी सांगितला परंतु कोणालाच विश्वास बसेना हा लहान मुलगा काय त्याला वाचवणार आणि हा चमत्कार कसा शक्य झाला  म्हणून बोलू लागले.  तेवढ्यात त्यांच्या घराशेजारच्या एका सद्गृहस्थाने  त्यांना सांगितले  "छोट्याला हे सारे शक्य झाले कारण, तू हे करू शकत नाही असं त्याला सांगणारे तिथे कोणी नव्हते'.
आपल्याही आयुष्याचं असंच असतं कोणतेही पाऊल उचलायचे म्हटले कि लोकांना काय वाटेल, लोकं  हसणार तर  नाहीत ना, आपल्याला नावं तर ठेवणार नाहीत ना या गोंधळात आपण पडलेलो असतो. आणि यामुळे स्वतः त्याच जागी राहून इतरांची भरभराट पाहण्यात आपले अख्खे आयुष्य खर्ची होते. अनावश्यक प्रतिष्ठेची भीती आणि दडपण या गोष्टींनी आपल्याला अपेक्षित यशाची शिखरे  गाठता येत नाहीत. आपल्याला एका गोष्टीचा पूर्णपणे विसर पडलेला असतो कि आपल्याला हसणारे, नावं  ठेवणारे लोकच एकदिवस आपल्यासाठी टाळ्याही वाजवू शकतात. 
म्हणूनच चला तर मग आपल्या हक्काने मिळालेले सुंदर आयुष्य लोकांच्या मर्जीनुसार जगण्यापेक्षा आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला योग्य न्याय देऊन आयुष्य आणखी सुंदर करूया. भौतिक स्वातंत्र्याचा उदो उदो करून मनाच्या पारतंत्र्यात अडकण्यापेक्षा सर्व चौकटी तोडून मनाप्रमाणे जगूया, कोणजाणे कदाचित कधीतरी लोक चांगले म्हणतील.

सागर ननावरे 


 
;