चिकाटी आणि सातत्य
आपल्या प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी होण्याची तसेच इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवण्याची इच्छा असते. आपण प्रत्येकजण त्यादृष्टीने बर्याचदा प्रयत्नही करतो परंतु "नव्याचे नऊ दिवस"या उक्तीप्रमाणे आपण काही काळानंतर त्याला कंटाळून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो . परिणामी आपण आखलेली योजना किंवा आपण ठरवलेले ध्येय पूर्णत्वास जात नाही आणि त्यामुळेयश आपल्याला नेहमीच हुलकावणी देत राहते. आयुष्यात अनेक गोष्टींत असलेला चिकाटी आणि सातत्याचा अभाव हे अपयशाचे मुख्य कारण असते. नवीन वर्षासाठी केलेले अनेक संकल्प आपणवर्षाखेरीसपर्यंत तडीस नेतो का? डायरी लिहिणे,जमा खर्चाच्या नोंदी करणे, नियमित व्यायाम करणे, वाचनास सुरुवात करणे आणि आयुष्यात राहिलेल्या अनेक गोष्टी पूर्ण करणे अशा कितीतरीसंकल्पांना आपण अर्ध्यावरती सोडून देत असतो. आणि याच सवयीचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो आणि त्यातून अपेक्षित ध्येये,उद्दिष्टे आपणास साध्य करता येत नाहीत.
सातत्य आणि चिकाटीचे एक आदर्श उदाहरण म्हणजे जगप्रसिद्ध रॉकी चित्रपटाचा अभिनेता सिल्वेस्टर स्टॅलोन पुढे तो " रॉकी" नावानेच ओळखला जाऊ लागला. लहानपणापासूनच अभिनयाचीआवड असलेला सिल्वेस्टरने आपले पदवीचे शिक्षण अर्धवट सोडून ऑडिशन देण्यासाठी न्यू यॉर्क गाठले. बरेच ऑडिशन देऊनही त्याची निवड होत नव्हती त्यादरम्यान त्याने अपयशाने खचून नजाता पटकथा लिहिण्याचा आपला दिनक्रम सुरूच ठेवला. परंतु सततच्या अपयशाने आणि ऑडिशनने जवळचा संपूर्ण पैसा पाहता पाहता संपूनही गेला आणि त्यामुळे कुटुंबाला दोन घासदेण्यासाठी त्याला पत्नीचे दागिनेही विकावे लागले आणि एक वेळ अशी आली कि त्याला पैशासाठी आपल्या प्रिय कुत्र्यालाही विकावे लागले. अशा परिस्थितीतही मिळेल ते कोणतेही छोटे मोठे काम न करता आता सर्वांसमोर यायचे तर एक चांगला अभिनेता म्हणूनच हा मनाचा ध्यास मात्र ठाम होता. पुढे त्याने स्वतः लिहिलेल्या ‘रॉकी' च्या पटकथेला तब्बल 1500 पेक्षा अधिक वेळारिजेक्ट केले गेले. परंतु त्याने चिकाटी व सातत्य सोडले नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढे त्याच पटकथेवर कमी मानधनावर त्याला अभिनेता म्हणून चमकण्याची संधी एका दिग्दर्शकानेदिली. पुढे 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी' ने जगभरात अनेक विक्रम प्रस्थापित करून जगासमोर एक नवा आदर्श निर्माण केला. पुढे सिल्वेस्टर स्टॅलोनच्या 'रॉकी' आणि 'जम्बो' चित्रपटांच्या सिरीज आणि इतर हिट चित्रपटांनी सिल्वेस्टर स्टॅलोनला जगभरात प्रचंड प्रसिद्धी व श्रीमंती मिळवून दिली. थोडक्यात काय तर सिल्वेस्टर स्टॅलोनने अपयशाने किंवा प्रतिकूल परिस्थितीने अजिबात न डगमगता आपल्या ध्येयप्राप्तीसाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि भव्यदिव्य यशाने जगभरात आपली कीर्ती पसरवली.
आपल्या अस्तित्वासाठी आणि प्रत्येक सजीवाला विशिष्ट गुण आत्मसात करावे लागतात आणि त्यातीलच एक महत्वाचा गुण म्हणजे चिकाटी. आज हाडामांसाच्या मानवप्राण्याला लाजवेल अशी चिकाटी आकाराने अतिसूक्ष्म असणार्या मुंग्यामध्ये पहावयास मिळते. मुंग्या या शरीराने, मेंदूने मानवापेक्षा जरी लहान असल्या तरी त्यांची तुलना आज बलाढ्य प्राण्यांशी केली जाते त्याचे कारण म्हणजे मुंग्यांत असणारा विलक्षण असा चिकाटीचा गुण. समोर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मुंगी आपला कार्यभार सोडत नाही. मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यांवर मात करून मुंगी चिकाटीच्या जोरावर आपली मार्गक्रमणा चालूच ठेवते आणि हाच गुण आपण अवगत करण्याची गरज आहे.
आयुष्य हि एक मॅरथॉन आहे आणि ही मॅरथॉन जिंकण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या अंगी सातत्य आणि चिकाटी असणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर मग आखलेले ध्येय, पाहिलेली स्वप्ने आणिठरवलेल्या गोष्टी आपल्यातील चिकाटीच्या जोरावर पूर्णत्वास नेउन यशाची एक नवी उंची गाठूया......
सागर नवनाथ ननावरे
0 comments:
Post a Comment