Sunday, 14 August 2016

अचूक निर्णयाने यशप्राप्ती 

अचूक निर्णयाने यशप्राप्ती 

आयुष्यात आपल्याला यश मिळावे असे प्रत्येकाला वाटत असते आणि त्यासाठी काहीही करण्याची  तयारीही असते. परंतु यासाठी आपल्या अंगी काही चांगले गुण बाणविणेही आवश्यक असते त्यापैकीच एक महत्वाचा गुण म्हणजे निर्णयक्षमता. 

बऱ्याचदा आपल्यासमोर उपलब्ध असणाऱ्या अनेक पर्यायांपैकी आपल्याला योग्य वाटणाऱ्या एक पर्यायाची  निवड करणे म्हणजे निर्णय घेणे होय

 आयुष्यात आपली अनेकदा " क्या करे क्या ना करे ?' अशी अवस्था होत असते अशावेळी आपण एका  विलक्षण मानसिक तणावाला सामोरे जात असतो. अशा परिस्थितीत आपण निर्णय कसा घ्यावा यासाठी इतरांवर अवलंबून राहतो  त्यातून बरेचदा समाधान मिळते परंतु अपेक्षित इप्सित साध्य होतेच असे नाही. याशिवाय एखादा निर्णय घेताना होणारा मानसिक आणि भावनिक गुंता हा आपल्याला नाकारात्मकतेकडे घेऊन जात असतो आणि यामुळेच बऱ्याचदा यश आपल्याला हुलकावणी देत असते. 

असाच एक मुलगा ज्याला लहानपणापासून फुटबॉलची प्रचंड आवड होती फुटबॉल खेळताना गोल किपर म्हणून तो सर्वांत प्रसिद्ध होता.

 इयत्ता पाचवीपासून त्यानेविविध शालेय, जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडास्पर्धांत भाग घेऊन चांगले यशही मिळवले. पुढे जाऊन मोठे होऊन एक तर चांगला मोठा फुटबॉल प्लेयर व्हायचे किंवा आर्मीमध्ये जाऊन देशाची सेवा करायची हे स्वप्न उराशी त्याने बाळगले होते. एक दिवस असाच मैदानावर तो त्याच्या मित्रांसह फुटबॉल खेळत होता त्याच मैदानावर शेजारी काही मुले क्रिकेट खेळात होती. क्रिकेट खेळणाऱ्या टीम मध्ये एक खेळाडू कमी पडत असल्याने क्रिकेट कोचने त्या गोल किपींग करणाऱ्या मुलाला एक सामन्यासाठी यष्टीरक्षक म्हणून घेतले. गोल किपींग मध्ये असणारे नैपुण्य त्याने यष्टिरक्षणातही तंतोतंत पाळले आणि त्याच्या त्या खेळीने सर्वच अवाक झाले. कारण त्याने केलेले यष्टिरक्षण त्या टीमसाठी आजपर्यंतचे सर्वोत्तम यष्टिरक्षण होते. पुढे जाऊन त्या प्रशिक्षकाने त्याला क्रिकेटमध्ये यष्टिरक्षण करण्याचा सल्ला दिला आणि त्याक्षणी क्रिकेटचे देशातील भविष्य आणि आपल्यातील असणारी क्षमता ओळखून त्याने क्रिकेर्टमध्ये करियर करण्याचा निर्णयही  घेतला. आणि याच फुटबॉल प्लेयरने पुढे क्रिकेटमध्ये आपले योगदान देऊन संपूर्ण  देशाला आणि जगाला आपली दखल घ्यायला लावली.  आणि तो क्रिकेटर म्हणजेच भारताला विषवचशक जिंकून देणारा  भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, यष्टीरक्षक आणि जगातील एक सर्वोत्तम फलंदाज म्हणजेच महेंद्रसिंग धोनी.   

याच धोनीने जर आपल्यातील क्षमता आणि परिस्थिती याचा विचार करून त्यावेळी योग्य निर्णय घेतला नसता तर कदाचित भारतीय संघाला असा यशस्वी आणि निर्णायक खेळी करणारा कॅप्टन मिळाला नसता.  

आयुष्यात  निर्णय हा व्यक्तिगत, कौटुंबिक, कार्यालयीन किंवा सर्वानुमते घेण्याच्या स्वरूपाचाही असू शकतो परंतु तोच निर्णय आपल्याला प्रसंगावधान राहून आणि परिस्थितीचा विचार करून अचूकपणे घ्यावा लागतो. 

 एक  निर्णय आपले पूर्ण आयुष्य बदलू शकतो  किंवा आपल्या  आयुष्यावर परिणामही करू शकतो.  यामुळे निर्णयाला एक जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे आणि त्या अनुशंघाने अचूक निर्णयक्षमता आपल्यात विकसित केली पाहिजे. आलेल्या समस्येवर मात करून एखादा निर्णय जितका अचूक, योग्य, परिस्थितीचा सारासार विचार करून  घेतला जातो तितकी आपली निर्णयक्षमता प्रगल्भ  असते. 

चला तर मग आपला निर्णय अचूक कसा ठरेल यासाठी सदैव प्रयत्नशील राहूया. आपण जो निर्णय घेऊ त्याच्याशी प्रामाणिक आणि सकारात्मक राहूया यश आपलेच असेल

सागर नवनाथ ननावरे 

0 comments:

Post a Comment

 
;