Sunday, 12 June 2022

12 जून, मन 'सुन्न' करणारा दिवस


भोर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील आमचं कुटुंब हे तसं छोटं आणि एक सर्वसामान्य कुटुंब....ज्या कुटुंबाला पंचक्रोशीत एक वेगळी ओळख देण्याचं काम एका व्यक्तिमत्वाने केलं. आणि ते म्हणजे माझे आजोबा अर्थात आमच्या सर्वांचे भाऊ. त्यांना सर्व नातवंडात माझा जास्तच लळा..आणि लळा असणारच कारण त्यांचा वारसा तेवत ठेवणारा मी त्यांच्या वंशाचा दिवा.

लहानपणी मनावर कोरणाऱ्या गोष्टी असोत किंवा भाऊंच्या तरुणपणातील किस्से असोत भाऊ मला कुशीत घेऊन आवडीने सांगायचे. हळूहळू मी मोठा होऊ लागलो आणि शिक्षणासाठी बाहेरगावी पडलो. तरीसुद्धा भाऊ मला आवर्जून भेटायला येत. यात्रेला गावी गेल्यावर भाऊंसोबत अधिकाधिक वेळ घालवायला मिळायचा. गावाच्या भजनी मंडळातील त्यांचे योगदान असो किंवा कुस्तीच्या फडातील भूमिका असो त्यातून नेहमीच मला लीडरशिप चे धडे मिळाले.

गेल्या महिन्यात माझी कन्या परीच्या वाढदिवसाला 11 मे रोजी माझ्याकडे पुण्याला आले. चांगले आठ दहा दिवस आनंदाने राहिले. पण एके दिवशी पोटात दुखतंय म्हणून विव्हळू लागले. मी तात्काळ त्यांना क्लिनिकमध्ये नेले. इंजेक्शन औषध दिले. मला वाटलं त्याने भाऊंना फरक पडेल पण हळू हळू दिवस जसे पुढे जाऊ लागले तशी भाऊंची प्रकृती खराब होऊ लागली..त्यांनी अचानक अन्नत्याग केला. शरीर साथ देईना... केवळ द्रव्य ग्रहण करून कसेबसे दिवस सरू लागले... हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांनी घरी नेण्याचा आग्रह केला. त्यांना घरी आणले आणि प्रकृतीत काहीशी सुधारणा दिसू लागली. परंतु अन्नग्रहण मात्र बंद होते. त्यात मी त्यांना भेटायला गेलो माझ्या गळ्यात पडून ते रडू लागले. तू माझ्यापासून दूर जाऊ नको म्हणाले. परंतु नोकरीं नावाच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या मला नाईलाजास्तव भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व द्यावे लागले..आणि तीच भेट माझ्यासाठी अखेरची ठरली.

मात्र ते पुनरागमन करतील याची आम्हांला खात्री होती. गावातील भजनी मंडळाने ते बरे व्हावेत म्हणून आमच्या घरी भजन ठेवले. आणि काय आश्चर्य बिछान्यात पडून असणारे भाऊं भजनात चक्क गवळणी गाऊ लागले तेही त्याच तालासुरात आणि जोशात.. हे ऐकून मनाला हायसे वाटले. यंदाच्या जत्रेतही भाऊं कुस्तीच्या फडात मल्लाना भिडवताना दिसणार अशी आशा निर्माण झाली.  कोरोनासारख्या लाटेतही आपले स्वास्थ टिकवून ठेवणारे, मैलांचा प्रवास पायी करणारे आमचे भाऊ शंभरी सहज पार करणार अशी खात्री झाली.

आणि ती काळरात्र उजाडली.. काळरात्र कसली तो तर एकादशीचा दिवस होता. आयुष्यभर भाऊंनी भजनातून ज्या विठ्ठलाची सेवा केली. त्या विठ्ठलाने त्यांची शंभरी स्वर्गलोकी करण्याचा जणू चंग बांधला. आणि शेवटी 'आले देवाचिया मना तिथे कोणाचे काही चालेना' ही उक्ती खरी ठरली. 12 जून रोजी माझा विठ्ठल त्याच्या विठ्ठलाच्या आदेशापुढे नमला. आणि आम्हाला पोरके करून गेला. गावात 'देवा' म्हणून प्रचलित असणारे भाऊ देवाला प्रिय झाले. हे अतीव दुःख निशब्द करणारे आहे.
 
आपलं वय वाढतं पण या वाढणाऱ्या वयाबरोबर आपली लोकं पण आपल्याला सोडून जातात. अशावेळी आपण उगाच मोठे झालो असं वाटायला लागतं.

 गावी आलो की आपुलकीने विचारपूस करणारे...पाठीवर शाबासकीची थाप देणारे... घरातल्या खाटेवर निवांत बसणारे आपल्या घरातले ज्येष्ठ व्यक्तिमत्व असते ना... ते त्या घराची खरी शान असते...त्यांच्या नुसत्या असण्यानेच घराला एक आधार असतो..... आज आमच्याही घरचा आधारवड हरवलाय..... भजनीमंडळ, कुस्तीच्या फडातील  आणि आमच्या जीवनातील एक वादळ अचानक शांत झालंय... भाऊ तुमची उणीव नक्कीच भासणार परंतु तुमच्या कष्टाची आणि जिद्दीची जाणीव नेहमीच असणार.....असीम कृतज्ञता.. भावपुर्ण श्रद्धांजली 💐

0 comments:

Post a Comment

 
;