आज जगभरात कोरोना नामक विषाणूने हाहाकार माजविला आहे. जगातील इतर देशांप्रमाणेच भारतातही याचा फैलाव सध्या वेगात सुरु आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी आकडेवारी जनमानसात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण करीत आहे.
कामानिमित्त बाहेरगावी देशात परदेशात असणारी जनता हवालदिल झाली आहे. सक्तीची सुट्टी आणि त्यातही घराच्या बंदीखान्यात कैद असणाऱ्या जनतेला वेध लागले आहेत ते आपापल्या गावी जाण्याचे.
सध्या कोरोनाच्या संसर्गाचे शहरी-ग्रामीण असे विश्लेषण केल्यास निश्चितच शहरांतील परिस्थिती चिंताजनक आहे. बऱ्याच राज्यात ग्रामीण भागात अद्यापतरी दिलासादायक असे वातावरण आहे.
तसे पाहता ग्रामीण भारतातही कोरोनाने आता प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. मात्र शहरांइतकी भयावह परिस्थिती अजून तरी ग्रामीण भागात निर्माण झालेली नाही. आणि त्यामुळेच लोक आपला जीव धोक्यात घालून गावी जाण्यासाठी धडपड करीत आहेत. कोरोनापासून बचाव कसा करावा?
असे विचारल्यास आपण सहजपणे सोशल डिस्टन्स,वारंवार हात साबणाने धुणे, तोंडाला मास्क लावणे,वेळीच डॉक्टरांना दाखविणे आणि इतर स्टॅन्डर्ड प्रिकॉशन्स सांगू. परंतु आता त्यात अजून एक लोकमताचा मुद्दा समाविष्ट केला जात आहे आणि तो म्हणजे,'गावाकडे चला'.
'शहरांत आता काय ठेवलंय उलट परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे, त्यापेक्षा आपला गावाकडे जा, निदान सुरक्षित राहाल' असा सुर चर्चात सर्रास आळवला जात आहे.
आणि म्हणूनच त्यादृष्टीने लोक आपली पावले उचलत आहेत. कोणत्याही परिस्थितीत गाव गाठायचा हे या काळातील जणू अंतिम ध्येय बनू लागले आहे.
नुकताच लॉकडाऊनमध्ये राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि अन्य व्यक्तींसाठी केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरी परतण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. प्रशासनाकडे रीतसर अर्ज करून स्वगृही, गावी जाण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली. आणि काय आश्चर्य जिल्हा तसेच राज्यांतर्गत अर्ज करण्यासाठी वेबसाईट वर अक्षरशः झुंबड उडाली.
राज्यातील विविध मेट्रो सिटीतुन मोठया प्रमाणात अर्ज करण्यात आले. पुणे, नागपूर सारख्या शहरांत तर याचा उच्चंक पाहावयास मिळाला. पहिल्याच दिवशी पुण्यातून गावी जाण्यासाठी तब्बल साडेपाच हजार जणांनी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे नागपुरातून परराज्यात जाण्यासाठी किंवा परराज्यातून नागपुरात येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ९ हजार ५०० नागरिकांचे अर्ज दाखल झाले.
वरील या आकडेवारी वरूनच सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत गावाकडे जाण्याची लोकांत किती ओढ आहे हे दिसून आले.
'गड्या आपला गावचं बरा', गावाकडे चला' अशी साद जनमानसात ऐकायला मिळाली.
आणि आज पुन्हा एकदा आठवण झाली ती स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी दिलेल्या 'खेड्याकडे चला' या देशव्यापी घोषणेची. आपला भारत देश हा पूर्वीपासूनच हा कृषीप्रधान देश राहिला आहे. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला खेड्याचा देश म्हणून ओळखले जायचे.
देशातील बहुसंख्य जनता प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीतीने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे.तसेच देशाची आर्थिक उन्नती कृषी ग्राम विकासावर अवलंबून आहे हे गांधीजीनी ओळखले होते. शेतीप्रधान ग्रामीण भारतातील उत्पादकता, गुंतवणूक, रोजगारनिर्मितीचे महत्त्व यावर 'खेड्याकडे चला' या घोषणेतुन गांधीजींनी लक्ष वेधले होते.
गाव स्वयंपूर्ण झाले तर देश विकसित होईल अशी त्यामागील त्यांची भावना होती.
आज मात्र गावाच्या स्वयंपूर्णतेसाठी नाही तर स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाला गाव आठवत आहे.
इतर वेळी शहरांत असताना गावठी,अप्रगत आणि सोयीसुविधाचा अभाव असणारे गाव आज मात्र इस्पीतळापेक्षाही सुरक्षित आणि मंदिरापेक्षाही पवित्र वाटू लागले आहे.
तसे पाहता गेल्या काही वर्षांत ग्रामीण भारताचे शहरीकरण होण्याचा वेग आपण पाहतच आहे.
शेतीची कसदार जमीन घराखाली आली. सिमेंट ची जंगले फोफावत गेली.शेतात राबणारे हात शहरांकडे रोजीरोटी आणि सुखसुविधासाठी राबू लागले. आणि गावाचे गावपण ही हळूहळू कमी होत गेले. आणि अशा वेळी सातत्याने आठवण झाली ती गांधीनी दिलेल्या खेड्याकडे चला मंत्राची.
आजही हा मंत्र महानगरात घुमतो आहे. परंतु यावेळी कारण आणि परिस्थिती मात्र वेगळी आहे. कोरोनाच्या भीतीवर मात करण्यासाठी आता काळ्या आईची माया खुणवत आहे. स्वतःचा स्वार्थ पुन्हा एकदा मानवाला गावाकडे घेऊन चालला आहे. आणि लोंढेच्या लोंढे गावचा रस्ता पकडत आहेत. गावाच्या विसाव्यास जाण्यात नक्कीच काही गैर नाही. मात्र सध्याची परिस्थिती पाहता पुण्या-मुंबईसारख्या अनेक शहरांहुन गावी जाताना गावाला सर्वस्व मानणाऱ्या गावकऱ्यांचा जीव तर आपण धोक्यात घालत नाही ना? याचाही विचार होणे गरजेचे आहे. आपल्या स्वार्थासाठी आपल्या काळ्या मातीशी एकनिष्ठ असणाऱ्या आपल्या गावाकडील बांधवाना असुरक्षित करणे योग्य नाही.
त्यामुळेच सध्या तरी शहरांत आहे त्या ठिकाणी सुरक्षित राहणे सर्वांच्याच हिताचे आहे. आज शहरी भागात थैमान घालणारा कोरोना गावाच्या वेशीवर आल्यास त्याला आवरणे कठीण जाईल. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा या अतिशय कमी आहेत. त्यामुळे यातून उद्भवनाऱ्या परिस्थितीचा विचार ही करवत नाही. आज अमेरिका सारख्या देशांनी याच गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने तेथे कोरोनाचा कहर दिसत आहे. अमेरिकेच्या मोठ्या शहरांमध्ये पसरलेला विषाणू आता छोट्या भागात आणि खेड्यांमध्येही पोहोचला आहे.
लंडनच्या इंपेरियल कॉलेजमधील संशोधकांच्या भाकीतानुसार येत्या सप्टेंबरपर्यंत अमेरिकेत जवळजवळ 22 लाख मृत्यू होऊ शकतात. हे भाकीत अमेरिका काय अवघ्या विश्वाला चिंतेत टाकणारे आहे. कारण जगातील अनेक राष्ट्रात वाढणारी आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे.
आजच्या घडीला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वागले पाहिजे. याची दाहकता आपल्या वर्तनावर अवलंबून आहे. जर आपण आहे तिथे सुरक्षित राहून स्वतःला आणि आपल्यांना वाचवू शकलो तर आपण अधिकाधिक लोक जिवंत राहू हे लक्षात घ्यायला हवे. खेड्याकडे जाण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा आहे त्या ठिकाणी सुरक्षित राहून कोरोनावर मात केली पाहिजे.
✍🏻 सागर ननावरे
0 comments:
Post a Comment