*कोरोनावर मात करायची आहे???*
तर मग वापरा....
*माईंड सॅनिटायझर*
सध्या जगभरात कोरोना नामक व्हायरसने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस वाढणारी आकडेवारी निश्चितच चिंतेत वाढ करणारी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत आपण सर्वजण यावर मात करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत असतो. यातही या संकटावर कसा प्रतिबंध करता येईल यावर विशेष लक्ष देतो. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीचेच घ्या ना. या महामारीत आपण सुरक्षित राहावे असे आपणा प्रत्येकास वाटते. आणि मग त्यासाठी आपण सर्व उपाय अवलंबिण्यावर भर देतो. मग त्यात आयुर्वेद, ऍलिओपॅथी, होमीओपॅथी, नेचूरोपॅथी असे सर्वच उपाय अवलंबिले जातात.
त्यातही सध्याच्या परिस्थितीत आपण विशेष लक्ष देतो ते मास्क आणि सॅनिटायझरवर. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी जगभर ही थेरपी वापरली जाते. आज घरोघरी हॅन्ड सॅनिटायझर वापरले जाते. आणि याच्या वापरातुन एक समाधान मिळत असते. आपला हात आपली त्वचा ही या सॅनिटायझरने निर्जतुक होण्यास मदत होते.
मात्र सध्याच्या परिस्थितीत कोरोनाशी सामना करताना माणूस मानसिकदृष्टयाही कमजोर होत चालला आहे. सतत कानावर पडणाऱ्या नकारात्मक बातम्या, चर्चा आणि घडामोडी मनावर परिणाम करीत आहेत. आणि याकडे मात्र आपण सरळसरळ कानाडोळा करीत आहोत. मानसिक दृष्टया खचलेला माणूस शारीरिकदृष्ट्या लवकर दुर्बल होत असतो.
अशावेळी आज हॅन्ड सॅनिटायझर सोबतच आपल्याला गरज आहे ती 'माईंड सॅनिटायझर"ची. ऐकायला थोडे विचित्र वाटते ना...
मात्र हा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे.
माईंड सॅनिटायझर म्हणजेच मनातील विघातक आणि नकारात्मक संवेदनांचे निरर्जंतूकीकरण करणे. मनाला वेदना देणाऱ्या चिंतेत टाकणाऱ्या व्हायरसला डिलीट करणे.
सध्याच्या काळात घडणाऱ्या घडामोडी मानवी मनावर सखोल परिणाम करीत आहेत. परिणामी माणूस आधी मनाने आणि मग शरीरानेही दुर्बल होत चालला आहे. मनात येणाऱ्या नकारात्मक आणि चिंतादायी लहरी मनपटलावर आघात करीत आहेत. या काळात मानवाला हॅन्ड सॅनिटायझर प्रमाणेच माईंड सॅनिटायझर ची सुद्धा अत्यंत गरज आहे.
म्हणतात ना
*"मन चंगा तो कटोती मे गंगा"*
चला तर मग मनाला सशक्त करण्यासाठी माईंड सॅनिटायझर बद्दल समजून घेऊया...
या माईंड सॅनिटायझरचा मुख्य कंटेन्ट आहे तो म्हणजे "सकारात्मकता" आजच्या या कसोटीच्या काळात भयभीत करणाऱ्या नकारात्मक गोष्टींनी अवघे विश्व् व्यापले आहे.याचा परिणाम हा आपल्या मनाला नकारात्मकतेच्या भयावह खाईत लोटत आहे. त्याच त्या वेदनादायी बातम्या, रोजच रंगणाऱ्या कोरोनाग्रस्ताच्या चर्चा याने मन विषन्न होते. लॉकडाऊनच्या काळात पर्यावरणाचे प्रदूषण दिवसेंदिवस घटत असले तरी मानवी मनातील चिंतेचे आणि भीतीचे प्रदूषण मात्र वाढतच चालले आहे. अशावेळी गरज आहे ती सकारात्मक विचार करण्याची. 'जातील हेही दिवस निघून' असा मनाला दिलासा देण्याची. डोळ्यासमोर आशादायी चित्र सतत आणण्याची.
एका जागतिक सर्वेक्षणानुसार विविध साथीत, आजारांत लोक हे साथीच्या संसर्गापेक्षा भीतीच्या संसर्गानेच जास्त दगावतात. नकारात्मक मानसिकता ही विविध शारीरिक व मानसिक व्याधीना आमंत्रण देत असते.
एक मानसशास्त्रीय कथा आपल्याला माहित असेलच....
परदेशात एका कुप्रसिद्ध कैदयाला फाशीची शिक्षा सुनावली गेली. तेव्हा तेथील काही वैज्ञानिकांनी विचार केला, की आपण या कैद्यावर काही प्रयोग करूयात. तेव्हा त्या कैद्याला सांगितलं गेलं, की तुला फाशी न देता विषारी कोब्रा डसवून मारू.
त्यांनतर त्याच्या समोर एक मोठा विषारी साप आणला गेला. त्या कैद्यांला चांगलाच घाम फुटला. आता त्या कैद्याचे डोळे बंद करून त्यास खुर्चीला बांधले. आणि त्याला साप डसवून नाही, तर दोन टाचण्या टोचण्यात आल्या. आणि काय आश्चर्य त्या कैद्याचा काही सेकंदातच मृत्यू झाला.
पोस्टमॉर्टेम केल्यानंतर समजलं, की कैद्याच्या शरीरात सापाच्या 'व्हेनम'सदृश्य विष आहे.
आता हे विष कुठून आलं,की ज्यामुळे कैद्याचा जीव गेला?
ते विष मानसिक धक्क्यामुळे त्याच्या शरीरानेच उत्पन्न केलं होतं!
आपल्या प्रत्येक संकल्पामुळे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी उत्पन्न होते व त्यानुसार आपल्या शरीरात हार्मोन्स उत्पन्न होतात.
त्यानंतर च्या एका निष्कर्षात असे अढळले की, 90% आजारांचं मूळ कारण नकारात्मक विचारांनी उत्पन्न होणारी ऊर्जाच आहे.
म्हणूनच सध्याच्या या काळात जरी कोरोनाने थैमान घातले असले तरी अशा परिस्थितीत आपल्या मनाला सशक्त करणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा नाही की लॉकडाऊन चे नियम मोडून आचरण करणे.
मनात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण करायला हवी. मनात भीती किंवा चिंता यांचा संचार सुरु झाला की अनेक दुर्घटना घडताना दिसतात. सध्या कोरोनाच्या भीतीने कुठे गावाकडे जाताना अपघातात जीवितहानी होत आहे, कुठे तुरुंगात कैदी एकमेकांना मारहाण करीत आहेत, कुठे खोकला म्हणून मारहाण करून जीव घेतला जात आहे, अफ़वावर विश्वास ठेऊन सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे, कुठे लोकांना वाळीत टाकून त्यांच्या जीवाशी खेळ चालला आहे अशा अनेक दुर्घटना या मानसिक नकारात्मक भावनेमुळेच घडत आहेत. म्हणूनच आता सुज्ञ व्हायला हवे. सदसदविवेकबुद्धीने वागून आपली भूमिका धैर्याने बजवायला हवी.
अशा वेळी खरं तर जबाबदारीने वागून खबरदारी बाळगून या संकटाशी दोन हात करायला हवेत. उद्याच्या कोरोनामुक्त जगाचे आशादायी सामाजिक चित्र मनमंदिरात निर्माण करायला हवे. आपल्या बोलण्या-चालण्यात-वागण्यात कमालीची सकारात्मकता यायला हवी.
आता या माईंड सॅनिटायझरसाठी आपल्याला खालील काही गोष्टी नक्कीच आचरणात आणायला हव्यात.
1. बातम्या या केवळ सद्यस्थितीचे ज्ञान आणि आवश्यक त्या खबरदारी साठीच पाहाव्यात/वाचाव्यात.
2. चर्चा ही सकारात्मक हवी उगाच आपल्या चर्चेतुन समाजात भीतीदायक चित्र निर्माण करू नये.
3. या काळात आपली रोगप्रतिकारकता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत.यासाठी सकस आहार, दैनंदिन चांगल्या सवयी, व्यायाम, प्राणायाम, योगासने, मेडिटेशन यासाठी आवर्जून वेळ काढायला हवा.
4.या काळात नियम आणि संयम याचे अवश्य पालन व्हायला हवे. लक्षात ठेवा 'जिथे सुटला संयम आणि तुटला नियम तिथे समोर उभा 'यम'.
5. याकाळात तडजोड आणि प्राप्त परिस्थितीला स्वीकारून त्याप्रमाणे जीवन जगायला हवे.
बाकी कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक शारीरिक कृती आपण पाळतच असाल अशी खात्री आहे.
आता मनाकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
*मन करारे प्रसन्न*
*सर्व सिद्धीचे कारण*
चला तर मग आता माईंड सॅनिटायझरने या मनाला सशक्त आणि सकारात्मक करूया....
*मिटवू कोरोनाचा ज्वर*
*वापरू माईंड सॅनिटायझर*
✍🏻©️ *लेखक: सागर न. ननावरे*
sagarfinancial5@gmail.com
📞 9657991677
www.sagarnanaware.blogspot.com
0 comments:
Post a Comment