*डिजीटल माणुसकी*
*- सागर ननावरे ©*
पूर्वी मानवाच्या मूलभूत गरजा म्हटल्या की अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गरज सांगितल्या जायच्या. परंतु *आज मूलभूत गरजा सांगताना अन्न,वस्त्र ,निवारा आणि मोबाईल अशा चार मूलभूत गरजा सांगाव्या लागतील.* मोबाईल ही आज चैनीची वस्तू राहिलेली नसून ती आज प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची वस्तू झालेली आहे.
आज संपूर्ण देश डिजिटल इंडिया च्या दिशेने पाऊल टाकत आहे. प्रत्येक गोष्टीत डिजिटलायझेशन झपाट्याने होत आहे. डिजिटल क्रांतीमुळे आपल्या सर्वांचा वेळ,पैसा आणि श्रम नक्कीच काही प्रमाणात वाचत आहे.
तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे. मैलोमैलांचें अंतर आता मिनिटांवर येऊन ठेपले आहे . व्हॉट्स अप, फेसबुक प्रत्येकासाठी जीव की प्राण झाला आहे. आपण सर्वजण डिजिटल जगाचा एक भाग होत चाललो आहोत. परंतु यातही एका गोष्टीची मात्र नक्कीच खंत वाटते. आणि ती गोष्ट म्हणजे *आजकाल माणुसकीही डिजिटल होत चालली आहे.* पूर्वी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे लोक आता मोबाईलमध्ये नाती टिकवू लागले आहेत.
*कठीण प्रसंगात एकमेकांना आधार देणारे हात आता मोबाईल घेऊन डिजिटल माणुसकी दाखविण्यात कमालीचे व्यस्त आहेत.*
काही दिवसांपूर्वी मी गाडीवर बाजीराव रोडने चाललो होतो. सिग्नल लागला म्हणून गाडी थांबवून सिग्नलचा हिरवा दिवा लागायची वाट पाहत होतो. समोर रस्त्याच्या बाजूला एक वृद्ध गृहस्थ रस्ता ओलांडण्यासाठी थांबले होते. तेवढ्यात एक विशीतला तरुण धावत आला आणि त्याने त्या वृद्ध गृहस्थांचा हाथ पकडला. आणि त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करू लागला. हे दृश्य पाहून मला अजूनही माणुसकी जीवनात असल्याचा साक्षात्कार होऊ लागला. आणि त्या मुलाचेही कौतुक वाटू लागले. त्या गृहस्थांनाही आधार मिळाल्याने आनंद वाटला. पुढे त्या दोघांनी रस्ता ओलांडला. रस्ता ओलांडताच त्या वृद्ध गृहस्थाने त्या मुलाच्या डोक्यावरून व गालावरून हात फिरवून त्याचे कौतुक केले. तेवढ्यात त्या तरुणाने आपल्या खिशातील चकचकीत महागडा मोबाईल काढला. आणि बाबांसोबत सेल्फी काढू लागला. बाबा थोडे हिरमुसले. त्यांना काय बोलावे ते कळेना. आणि तेवढ्यात रस्त्याच्या बाजूला त्या गृहस्थांना सोडून,डोळ्याला गॉगल लावून आणि मोबाईलमध्ये मान घालून तो तरुण पुढे निघून गेला. आता मात्र मोबाईलप्रेमाचा आणि खोट्या बेगड्या मदतीचा राग येऊ लागला. काही वेळाने योगायोगाने एका स्टेशनरी दुकानात माझी त्या तरुणाशी गाठ पडली.
मी त्याला त्या प्रसंगाबाबत विचारणा केली असता मोठ्या दिमाखाने तो मला म्हणाला, कसं आहे भाऊ फेसबुकवर आपले ३ अकौंट आणि सात हजारापेक्षा जास्त मित्र आहेत. व्हॉट्स अप आणि इंस्टा वर माझे मोठे नेटवर्क आहे. आणि म्हणून थोडा सोशल वर्क आणि माणुसकी शेअर झाली पाहिजे ना.
मी त्याच्याकडे पाहतच राहिलो.
एवढ्यावर न थांबता तो मला पुढे बोलला," भाऊ आता गॅरेंटेड हजारावर लाईक्स मिळतील बघ. तुझा पण नम्बर आणि नाव दे तुला पण माझ्या लिस्ट मध्ये ऍड करतो.
हा प्रसंग मला बरेच काही सांगून गेला. स्वतःच्या सोयीनुसार माणुसकीचे कसे अर्थ लावले जातात हे समजले. खरंच *मनाच्या गाभाऱ्यातून माणुसकी डिलीट होत चालली आहे. फुकटच्या प्रसिद्धीच्या व्हायरसने एव्हाना प्रत्येकाच्या मनावर आघात केला आहे.*
रस्यावर अपघात झाल्यास त्या व्यक्तीला मदतीचा हात देण्याऐवजी त्याचे चित्रण करण्याचा दानवी ट्रेंड समाजात रुजू लागला आहे.
*एकमेकांच्या गाठीभेटी,आशीर्वाद,शुभेच्छा,श्रद्धांजली आणि इतर अनेक बाबी डिजिटल झाल्या आहेत. नात्यांचा अर्थ संपत चालला असून औपचारिकता मात्र सोशल मीडियातून जपली जात आहे. एखाद्याच्या मदतीला धावून जाण्यापेक्षा सोशल मीडियावर मदतीची आलोचना करून माणुसकीचा दिखावा केला जात आहे.*
*व्हॉटस अप च्या जगामधी*
*बिजी लागत्यात नाती*
*बिजी झालेत दिवस अन*
*बिजी झाल्यात राती*
अशी काहीशी अवस्था आज पाहायला मिळते आहे. आपण वेळीच आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करून शहाणे व्हायला हवे. आपल्या आप्तजणांना भेटून,विचारपूस करून त्यांच्यासोबत वेळ घालवून नाती वृद्धिंगत केली पाहिजेत. प्रतिकूल परिस्थितीत इतरांच्या मदतीला कसलाही हेतू न ठेवता धावून जाता आले पाहिजे. मोबाईलच्या रेंजप्रमाणे नाती न जोडता मनाने आणि आपुलकीने नाती जोडली पाहिजेत.
*डिजिटल माणुसकीपेक्षा लॉजिकल माणुसकी अंगिकारली पाहिजे.*
*आताच बदल करायला हवा. नाहीतर उद्या आपल्या सुखदुःखात प्रत्यक्ष माणसे कमी आणि मोबाईलवर इमोजी आणि मेसेजेस जास्त दिसतील.*