Wednesday, 25 September 2024 0 comments

फ्लेक्सवरच्या आमदारांची गर्दी ...



 विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. राज्यातच नव्हे तर देशात महाराष्ट्राच्या विधानसभेत कोण बाजी मारते यांची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजतील आणि प्रत्यक्षात नोव्हेंबरमध्ये मतदान होईल, अशी चिन्हे आहेत. त्यातही नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात राज्यातील विधानसभा निवडणुका २ टप्प्यात होतील, असे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  पत्रकारांशी बोलताना संकेत दिले आहेत. त्यानुसार राज्यात १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान विधानसभा निवडणुका लागण्याची  दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

                        राज्याच्या १४  व्या महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे. तत्पूर्वी राज्यात विधानसभा निवडणुका घेऊन नवीन सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. आणि त्यामुळेच राजकीय क्षेत्रात जोरदार हालचालींना वेग आला आहे. यातही स्थानिक स्तरावर इच्छुकांनी फ्लेक्सबाजी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तिकिटासाठी चर्चेत येण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. यात अगदी आजी माजी आमदार त्यांचे कुटुंबीय आणि पदाधिकाऱ्यांसह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक , ते अगदी त्यांचे पीए देखील इच्छुक आहेत. विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीला इच्छुकांची भाऊगर्दी असतेच परंतु यंदा याचे प्रमाण मोठे आहे. यासाठी मागील पाच वर्षांत राज्यात घडलेल्या अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी याला कारणीभूत आहेत. 

राजकीय भूकंप ही संधी  :  यंदा इच्छुकांच्या भाऊगर्दीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण आणि त्यानंतर निर्माण झालेले गटतट . शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडल्यानंतर दोनाचे चार पक्ष उदयास आले आणि साहजिकच त्यामुळे इच्छुकांच्या अपेक्षांना धुमारे फुटले. अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यात निवडणूक लढविण्याची भावना निर्माण झाली. अशी संधी पुन्हा येईल की नाही याची शास्वती नसल्याने वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी चांगलीच चढाओढ निर्माण झाली आहे. 

  कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस  :  गेली अनेक वर्षे केवळ वरिष्ठ नेते आणि त्यांच्या घरातच तिकिटे मिळणार हे  फिक्स असायचे. त्यामुळे तिकिटासाठी इच्छा असूनही सहसा कुणी जास्त जोर लावायचे नाही. मात्र ज्या कार्यकर्ते फक्त अडगळीत पडलेले होते. किंवा नेत्यांच्या सतरंज्या उचलणारे , मागेपुढे घिरट्या घालणारे कार्यकर्ते म्हणून ज्यांना हिणवले जात होते त्यांच्यादेखील आशा पल्लवित झाल्या आहेत. पक्षाची पदे, सहकार संस्था, सरपंच,नगरसेवक, जिल्हा परिषद - पंचायत समिती साठी इच्छुक असणारे कार्यकर्त्यांनाही आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे यंदा कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आल्याचे वातावरण सद्या तरी दिसत आहे. 

निष्ठा आणि चळवळीचे भांडवल : एकीकडे राजकीय फुटीनंतर सत्ताधाऱ्यांसोबत गेलेले आम्ही चळवळ केली, क्रांती घडवून आणली याचे भांडवल करून तिकिटासाही आग्रही असल्याचे दिसत आहेत. तसेच सत्तेत राहून लोकांची कामे कशी गतीने होत आहेत याचे दाखले देत आहेत. तर दुसरीकडे आम्ही सत्तेसाठी इकडेतिकडे उड्या न मारता कसे नेते आणि पक्षाशी निष्ठावंत आहोत याचा प्रचार करत आहेत. थोडक्यात काय तर सगळीकडेच आपण कसे योग्य आहोत हे दाखवून तिकिटे मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवार नेत्यांवर दबावतंत्र वापरताना दिसत आहेत.    

जागा तेवढ्याच चढाओढ वाढली :  विधानसभेसाठी २८८ हा एकदा जरी फिक्स असला तरी पक्ष आणि गटतट वाढल्याने इच्छुकांची गर्दी वाढली आहे . प्रत्येक मतदार संघात एकमेकांविरोधात उभे राहून पर्याय निर्माण करणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली आहे . यापूर्वी एकमेकांना सहकार्य करून साटेलोटे करणारे आता इर्षेने एकमेकांविरोधात उभे राहण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

एकूणच वरील काही करणे लक्षात घेता. पूर्वी पारावर किंवा चौकात बसणारी पुढारी मंडळी आता भावी आमदार म्हणून फ्लेक्स वर झळकू लागली आहेत. परंतु या चढाओढीत वरिष्ठांची माने आणि विश्वास संपादन करण्यात कोण यशस्वी होणार हे तर येणारा काळच सांगेल. तूर्तास फ्लेक्सवरचे भावी आमदार म्हणून समाधान मानण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही.

सागर ननावरे, पुणे 
प्रख्यात स्तंभलेखक

 
;