देशभरात नुकताच ७८ वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात पार पडला. ब्रिटिशांच्या गुलामीतून मिळालेले स्वातंत्र्य हा तमाम देशवासियांसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. मात्र ७८ वर्षे उलटल्यावरही खरंच प्रत्येक घटकाला स्वातंत्र्य मिळाले आहे का हा संशोधनाचा विषय आहे. त्यातही देशाच्या प्रगतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देणाऱ्या देशातील महिलांना खरंच सुरक्षित आणि स्वतंत्र वाटतं का हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. देशात सातत्याने वाढणाऱ्या बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना महिलांच्या स्वातंत्र्यावर एकप्रकारे घाला घालत आहेत.
नुकतीच कोलकत्यात घडलेली बलात्काराची घटना , बदलापूरमधील चिमुरडीवरील अत्याचाराची घटना हेच अधोरेखित करतात की लहान असो किंवा मोठी , कोणतीही महिला आज सुरक्षित नाही. स्वतंत्र भारतात आजही महिलांना त्यांचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे. महिला घराबाहेरही आणि घरातही असुरक्षितच आहेत. त्यांच्यावरील लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे.
परवा बसमधून प्रवास करत असताना तरुण मुलांचे एक टोळके बसमध्ये शिरले. त्यांच्यात मोठ्याने गप्पा- गोष्टी , हसणे खिदळणे चालले होते. त्यांच्या संवादातील एक वाक्य माझ्या कानावर पडले जे अनपेक्षित होते. त्यातील एकजण बोलला , 'इथे एखादी सुंदर मुलगी असती तर सगळ्यांचा प्रवास चांगला झाला असता.' मी त्यांच्याकडे मागे वळून पहिले परंतु अपराधी पणाचा कसलाही भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. देशाचे भविष्य समजले जाणारे असे तरुण आणि एखादा महिलांवर अत्याचार करणारा आरोपी यांच्यात मला काहीही फरक जाणवत नव्हता. त्या बसमध्ये बसलेले इतर प्रवासी आणि विशेषतः महिला देखील यावर व्यक्त झाल्या नाहीत याची खंत मला जाणवली. आणि आपण स्वतःही यावर काही बोललॊ नाही याचे शल्य काहीवेळाने बोचत राहिले. तिथेच समजले की आजचा पुरुषी समाज महिलांकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन बाळगतो ते.
निर्भया प्रकरण, मणिपूर प्रकरण , आताचे कोलकाता हत्याकांड आणि दररोज वाढणारे महिला अत्याचार या भारतमातेच्या , माता भगिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. स्त्रियांचे स्वातंत्र्य म्हणजे फक्त कपडे निवडण्याचे स्वातंत्र्य, अभ्यासाचे स्वातंत्र्य किंवा करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य इथपर्यंतच मर्यादित राहिले आहे. मुक्तपणे संचाराचे स्वातंत्र्य आजही तिच्या वाट्याला आले नाही ही या विकसनशील देशासाठी मोठी शोकांतिका आहे.
तसे पाहता स्वतंत्र भारतातही अजूनही महिला पूर्णपणे स्वतंत्र झालेल्या नाहीत. आजही महिलांना त्यांच्या आवडीचे शिक्षण किंवा नोकरी निवडण्यापूर्वी प्रथम त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संमती घ्यावी लागते. समजा, एखाद्या मुलीला ऍडव्हेंचर सारख्या क्षेत्रात जायचे असेल, तर प्रथम तिला तिच्या घरच्यांना पटवून देण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. यात त्या पालकांचाही दोष नाही. तिच्या कुटुंबीयांच्या मनात ती घराबाहेर सुरक्षित राहील का ? अशी भीती सतत सतावत असते. अलीकडच्या काळात ज्या प्रकारे महिलांवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे वाढली आहेत त्यामुळे ही भीती अधिक दृढ झाली आहे. आणि त्यातही तिलाआचारस्वातंत्र्य देत घरच्यांनी परवानगी दिली तरी समाज तिच्याबाबत शंकाकुशंका व्यक्त करतो. जोपर्यंत स्त्री स्वतःचे नाव आणि प्रतिष्ठा निर्माण करत नाही तोपर्यंत तिला समाजात स्वीकारले जात नाही. अशी इतर अनेक क्षेत्रे आणि अनेक गोष्टी आहेत ज्यात जाण्यापूर्वी तिला खूप विचार करावा लागतो. मग हे असे असताना आपण तिलाही स्वातंत्र्य मिळाले आहे असे कसे बरं म्हणू शकतो .
महिलांवरील लैंगिक अत्याचार हल्लीचेंच नाहीत तर फार पूर्वीपासून सुरू आहेत. परंतु गेल्या दोन दशकांत त्यात झालेली वाढ चिंताजनक आहे. यासाठी सरकारने कितीही कायदे केले तरी ते प्रत्येक गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा प्रत्येक महिलेच्या वेदना जाणून घेऊ शकत नाही. त्यासाठी समाजाला पुढे येऊन ही समाज व्यवस्थाच बदलावी लागणार आहे. जोपर्यंत स्त्रियांकडे माणूस म्हणून पाहिले जात नाही तोपर्यंत हे थांबू शकत नाही. तिला मुक्तपणे जगण्याचे, आचार, विचार आणि संचाराचे स्वातंत्र्य देणे ही प्राथमिक गरज आहे. आणि यासाठी एक बाप, भाऊ, नवरा, मित्र म्हणून आपल्याला ही जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागणार आहे. तिच्या भयमुक्त जगण्यासाठी सामाजिक प्रबोधन करून एक क्रांती घडवावी लागणार आहे.
लेखक : सागर न. ननावरे, पुणे
लेखक
www.sagarnanaware.blogspot.com
नक्कीच 🙏🏻