Monday, 12 December 2022

छत्रपती संभाजी महाराजांचे राज्यकर्त्यांना पत्र


प्रति , 
वाचाळवीर 
राज्यकर्ते व राजकारणी 
हिंदवी स्वराज्य मुलुख

              मी छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले अतिशय खेदजनक अंतकरणाने तुम्हास निरोप धाडत आहे. मी आणि माझ्या मर्द मावळ्यांनी रक्ताचे पाणी करून, बलिदान देऊन तुमच्यासाठी निर्मिलेल्या स्वराज्याची सध्याची वाताहत आता पाहवत नाही. यासाठीच का केला होता आम्ही अट्टाहास ? असे म्हणायची वेळ आता आली आहे. 
                                  स्वराज्य म्हणजे काय ठाऊक आहे तुम्हास ? स्वराज्य म्हणजे काय तर आपले म्हणजेच स्वतःचे राज्य (आपल्या लोकांचे). स्वाभिमान जपणारे माझ्या रयतेचे राज्य. स्वकियांना न्याय मिळवून देणारे राज्य.  स्व- संरक्षणासाठी सुसज्ज असणारे राज्य.  आणि याच पवित्र अशा स्वराज्याची तुम्ही लोकांनी काय अवस्था करून ठेवली आहे. स्वराज्याचा अर्थच बदलून स्व-हिताचे, स्वार्थ साधण्याचे राज्य असाच काहीसा केला आहे. अठरा पगड आणि बारा बलुतेदार यांना घेवून निर्माण केलेल्या स्वराज्याची ही हेळसांड आता पाहवत नाही. जातीपाती काय, दंगली काय, विकलेला स्वाभिमान काय आणि शरमेने झुकलेल्या नाकर्त्या माना काय. जणूकाही पुन्हा एकदा मोघलाईचा उदय आपण सुरु करीत आहात. 
                             आता तर काय आमच्या आबासाहेबांच्या म्हणजेच साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा,पराक्रमाचा वरवरचा उदोउदो करताना तुम्ही इतके बेभान झाले आहात की आमच्या कर्तृत्वाचे अक्षरशः धिंडवडेच काढणे बाकी आहे. मला तुमच्यासारख्या भक्षकांच्या वक्तव्यांची तमा नाही. परंतु आबासाहेबांच्या कर्तुत्वाला कालबाह्य समजून नवे नकली अन स्वार्थी(राजकारणासाठी) आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असाल तर खबरदार . हे आम्ही सहन करून घेणार नाही. हा केवळ आमचाच नाही तर स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या तमाम वीर मावळ्यांचा अपमान आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या शिकवणीचा अपमान आहे.  मूठभर लोकांचे गटतट करून त्यांना आपलेसे करून या स्वराज्याचे स्वामी समजण्याचा मूर्खपणा करू नका. कारण केवळ जयजयकार करून गप्प न बसता वेळप्रसंगी स्वाभिमानी बाण्याने तुम्हाला घायाळ करणारे कट्टर मावळे आजही या स्वराज्यात आहे याचे भान ठेवा. गाफील राहू नका, सत्तेच्या सारीपाटासाठी चाललेला हा विकृत डाव वेळीच थांबवा. अन्यथा राजकारणातून आणि या स्वराज्यातून तुमचा कडेलोट व्हायला वेळ लागणार नाही. 
आबासाहेबांबद्दल आम्ही यापूर्वीही म्हटलंय 
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं यः ।
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:)स शिवछत्रपतिजयत्यजेयः ॥
अशा न भूतो न भविष्यती राजांच्या नावाला आणि कर्तुत्वाला गालबोट लावू नका. 
                                            इथुन पुढे स्वराज्याबद्दल आणि स्वराज्यकर्त्यांबद्दल एकही अपशब्द निघाला तर  तुम्हाला मुलाहिजा मिळणार नाही. इतिहास घडविण्यात तुमचा वाटा नाही परंतु तो बिघडविण्यात आपली नसलेली अक्कल लावू नका. लोकांची माथी भडकवून त्यांचे आयुष्य मातीमोल करू नका. रयतेच्या इमानाशी आणि विश्वासाशी अजिबात दगाफटका नको. महापुरुषांबद्दल बोलताना तारतम्य बाळगा. जर आदराने त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायचे नसेल तर स्वार्थासाठी त्यांचा जयजयकार करू नका. त्यांच्या नावाने विखार पेरण्यापेक्षा त्यांचे विचार पेरून सुराज्य साकार करा. माझे हे शब्द शिरसावंद्य समजा आणि शहाणे व्हा. जास्त काही सांगणार नाही. पुन्हा पत्र धाडणार नाही टकमक टोक अजूनही साबूत आहे लक्षात ठेवा. 
जय जिजाऊ जय शिवराय


(पत्रलेखन - सागर ननावरे, पुणे )

(आजची बिघडलेली सामाजिक परिस्थिती पाहता आमच्यासारख्या शिवप्रेमींना अतोनात वेदना होत आहेत. सर्रास चाललेली गळचेपी पाहता याविरुद्ध आवाज उठविण्याचेही धाडस होत नाही. आणि म्हणूनच लेखणीचे शस्त्र घेऊन दोन्ही महाराजांची माफी मागून या पत्राद्वारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे. या निमित्ताने का होईना जनजागृती होईल अशी आशा)

0 comments:

Post a Comment

 
;