मराठी पाऊल अडते कुठे ????
माझा मराठीची बोलू
कौतुके।
परि अमृताते हि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके।
मेळवीन।।
या आठवड्यात आपण जागतिक
मराठी भाषा दिवस साजरा करीत आहोत. परंतु जागतिक स्तरावर खरंच मराठी भाषेचा प्रसार
होत आहे का ? निश्चितच नाही उलट ज्या
मातृभूमीतील मातीत ती रुजली,फुलली ती मातीच
इंग्रजीच्या वाऱ्यात सैरभैर धावत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे
कौतुक करताना तिची तुलना अमृताशी केली होती. मायमराठी भाषा ही महाराष्ट्राची
राजभाषा. आपण सर्वजण मराठीचे गोडवे अभिमानाने गातो परंतु काय खरंच तिच्या
संवर्धनासाठी आपण कटिबद्ध आहोत? गेल्या गेल्या काही
वर्षांत मोठमोठ्या शहरात मराठी शाळा बंद झालेल्या दिसल्या. एका प्रसिद्ध शहरात
मराठी शाळा बंद करून त्याठिकाणी मोठमोठे मॉल्स उभारण्याचा मानस आहे. मॉल्स आले की
समजून घ्यायचे तिथे फाडफाड इंग्रजी बोलणारे कर्मचारी नियुक्त केले जाणार. आणि
मराठी शाळांच्या जागेवर इंग्रजी संभाषणाचा बाजार वधारणार. परंतु त्याठिकाणी असणारा
ग्राहक हा मराठी भाषिकच असणार. इंग्रजी भाषेचा स्वीकार करण्यात काहीही गैर नाही.
किंबहुना ती काळाची गरजच आहे. परंतु मराठी भाषेची गळचेपी करून इंग्रजीचा अट्टाहास
करणे मायमराठी संस्कृतीसाठी नक्कीच धोकादायक आहे. हा सर्व प्रकार म्हणजे पिंपळाचे
झाड मुळासकट तोडून त्याजागी शोभेचे विदेशी झाड लावण्या सारखे आहे. राज्यातील विविध
शहरात आज कोट्यावधीची विकासकामे सुरु आहेत. परंतु ज्या भाषेने विकासाचा खरा अर्थ
शिकविला त्या भाषेचाच विकास खुंटतो आहे हे नक्कीच दुर्दैवी आहे. अशी परिस्थिती
केवळ नागपूर शहराचीच नाही. तर गेल्या काही
वर्षांत राज्यात बंद पडणाऱ्या शाळांचा आकडा मराठी भाषेच्या शिक्षणाच्या
भविष्याबाबत चिंता व्यक्त करणारा आहे.
फेब्रुवारी २०१८ मध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत असणाऱ्या तब्बल १३०० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शासकीय भाषेत हा बंद म्हणजेच शाळांचे स्थलांतरण होय. विद्यार्थी पट ० ते १० असल्याचे कारण पुढे ढकलून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पालक, शिक्षक आणि समाजिक संघटनानी याविरोधात रान उठविल्यानंतर मात्र काहीशी मावळ भूमिका घेण्यात आली. १३०० चा आकडा सव्वा पाचशे पर्यंत आणण्यात आला. मराठी शाळांची खालावणारी परिस्थिती पाहता शासनाकडून सातत्याने मोफत आणि दर्जेदार सोयीसुविधा देण्याचा प्रयत्नही केला. मात्र इंग्रजी शाळांत पाल्याचे भविष्य पाहणाऱ्या पालकांवर मात्र कसलाही फरक पडला नाही. पालकांची बदललेली मानसिकताही मराठी शाळा आणि मराठी भाषेच्या मुळावर घाव घालणारी आहे.
कमी पटसंख्या वर्गावरील शिक्षकांचे समायोजन आणि शाळा बंद करण्याचा सरकारचा २०१८ चा निर्णय डोळ्यासमोर ठेवून प्राथमिक शिक्षकांनी घरोघर जाऊन पालकांमध्ये मराठी शाळांविषयी जनजागृती केली होती. अगदी सोशल मीडियावरूनही पालकांना आवाहन केले होते. परंतु याचा काहीही फायदा झाला नाही. आज मराठी शाळांची संख्या इंग्रजी शाळांच्या चौपट असूनही विद्यार्थी संख्येत वाढ दिसत नाही. दिवसेंदिवस मराठी शाळांची विद्यार्थी संख्या कमी होत चालल्याचे दिसून येते. उलट इंग्रजी शाळांची संख्या कमी असूनही त्यांची वाढणारी विद्यार्थी संख्या चक्रावून टाकणारी आहे.तसे पाहता गेल्या बारा पंधरा वर्षांत इंग्रजी शाळांच्या अट्टाहासा पायी दरवर्षी मराठी शाळांची संख्या कमी होत गेली आहे. मुळात मराठी शाळा काय,नाट्यगृहे काय,मराठी सिनेमागृहे काय यां दिवसेंदिवस मावळतीला लागल्याची चिन्हे दिसत आहेत. मुळात मराठी माणसाची केवळ मिरविण्यापुरते मराठी प्रेम हे याला कारणीभूत आहे.
मध्यंतरी मराठीतील
प्रसिद्ध नाट्य कलावंत व अभिनेते प्रशांत
दामले यांनी यावर एक जळजळीत प्रतिक्रिया दिली होती. लंडन येथे एका नाटकाचा प्रयोग
करायला गेले असता एका वृत्तपत्राला त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली होती.
महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद पडण्याला पालकच सर्वस्वी जबाबदार आहेत ! असे मत
त्यांनी व्यक्त केले होते. मराठी माणूस मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक
संस्कार त्यांच्या मुलांना देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. मुलांना
कॉन्व्हेन्ट मधे शिक्षण जरूर द्यावे पण त्यांच्यात मराठी भाषेची आवडही जोपासली
पाहिजे. मराठीतून संवादाची सवय लावली पाहिजे.
मुलांना भाषेची आवड लावली पाहिजे. ही जबाबदारी पालकांची असते. त्यामुळे
पालकांनी ठरवले तरच मराठी भाषेला चांगले दिवस येवू शकतात असेही ते म्हणाले.
मी माझ्या मुलीला नर्सरी ला प्रवेश देण्याच्या उद्देशाने एकदा एका शाळेत गेलो होतो. त्यावेळेस तेथील एका कर्मचाऱ्याने मला माहिती समजावून देण्यात खूप मदत केली होती . त्यावर त्यांचे आभार मानण्यासाठी मी त्यांना "थँक यु म्हणालो. "तेव्हा त्यांनी मला चांगलेच खडसावले आणि म्हणाले, 'साहेब धन्यवाद म्हणा'. त्यावेळेस मला जाणवले की जोपर्यंत असे लोक आहेत तोपर्यंत मायमराठीच्या अस्तित्वाला अजिबात धक्का लागणार नाही. परंतु मी त्यांच्यासारखा होऊ शकलो नाही याची मात्र मला नक्कीच खंत वाटली..
आज मराठी शाळांची संख्या ही मराठी भाषिक जनतेच्या उत्साहावर तारणार आहे.
मराठी पाऊल पडते पुढे
म्हणण्याऐवजी मराठी पाऊल अडते कुठे हे शोधण्याची वेळ आली आहे. याला कारणीभूत दोन
गोष्टी आहेत एक म्हणजे इंग्रजी शिक्षणातूनच उत्तम करियर घडते हा समज. आणि दुसरी
गोष्ट म्हणजे मराठी शाळेत स्वतः शिकल्याची किंवा पाल्यांना शिकविण्याची वाटणारी
लाज आणि भीती . मराठी बोलल्यावर लोक सामान्य समजून हसणार तर नाहीत ना ? ह्याची बरेचदा लाज वाटते. तर आपण उद्या मराठीत
संभाषण करण्याचा चुकून प्रयत्न केला तर ते
समोरच्याला रुचेल ना? समजेल ना ? याबाबत वाटणारी भीती. कारण आजकाल हाय प्रोफाईल संभाषण हे इंग्रजी आणि
काही प्रमाणात हिंदीत केले जाते.
एकीकडे मराठीला अभिजात
भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषिकांनी अस्मिता पणाला लावली आहे. ही नक्कीच
आनंदाची गोष्ट आहे. परंतु या अभिजात भाषेचा प्रचार,प्रसार व गतवैभव राखणेही तितकेच गरजेचे आहे याचेही भान हवे.
माय मराठीचा जागर हा बोलीतून
आणि वर्तनातूनही आवर्जून व्हायला हवा. मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, तिचे संवर्धन व भरभराट होण्यासाठी प्रत्येक
मराठी भाषिकाने प्रयत्न करायला हवेत. व्याख्याने, ग्रंथप्रदर्शन, माहितीपट, मराठी चित्रपट,प्रारूप लेखन,परिसंवाद, कार्यशाळांचे आयोजन,
वक्तृत्व-निबंध स्पर्धांचे आयोजन,लोककला, लोकसंगीत, भारूड, गवळण, कथाकथन, काव्यवाचन याविषयी
कार्यक्रम राबवायला हवेत. मराठी साहित्याचे अनुवाद परकीय भाषांत व्हायला हवेत.
मराठी हीच महाराष्ट्रातील संपर्काची आणि व्यवहारांची भाषा असायला हवी. याची
सुरुवात मराठी भाषिकांनी मराठीत संवाद करून करायला हवी. गेली दोन-तीन दशके मराठी भाषा,संस्कृती,शिक्षण आणि मराठी
बाण्याची चाललेली अक्षम्य हेळसांड आता थांबायला हवीच.
मराठी भाषिक म्हणून केवळ
मिरविण्यापेक्षा मनामनात मराठी भाषा गिरविणे ही काळाची गरज आहे.
मायमराठीच्या उत्कर्षाची
लागावी आता चाहूल
पुन्हा एकदा अभिमानाने
पुढे पडावे मराठी पाऊल
थोडक्यात बोलीभाषेचे
संवर्धन करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठी भाषा,शाळा,साहित्य,कला यांना चांगले दिवस
आणणे हे आपले कर्तव्य आहे. आणि त्याचवेळी आपण अभिमानाने म्हणू .... मराठी पाऊल पडते
पुढे.
लेखक : श्री सागर नवनाथ
ननावरे
स्तंभलेखक / कवी
9657991677
sagarfinancial5@gmail.com
1 comments:
nice
Post a Comment