आज दसरा, हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच 'दसरा', याला आपण विजयादशमी असेही म्हणतो.
हिंदू संस्कृतीत या सणाला किंबहुना या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. या दिवशी आखलेला बेत, केलेला शुभारंभ हा ध्येयप्राप्ती कडे नेणारा असतो अशी आख्यायिका आहे. भगवान श्रीरामाने याच दिवशी रावणाचा वध केला. याच दिवशी छत्रपती शिवरायांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवास प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे मोठे महत्व होते. पराक्रमी बाजीराव पेशवे याच दिवशी आगामी स्वारीचे बेत कायम करीत असत. अनेक शूर, पराक्रमी राजे, योद्धा याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. विजयादशमी म्हणजेच हमखास विजय मिळवून देणारा दिवस. आणि म्हणूनच या विजयादशमीला पूर्वापारपासून सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे.
सीमोल्लंघन म्हणजेच सीमा ओलांडून परीघाबाहेर जाऊन इप्सित साध्य करणे.सीमोल्लंघन म्हणजे 'असत' चा पराभव करून सत वर विजय मिळविणे.
सध्या आपण कोरोना सारख्या भयंकर विषाणूचा सामना करीत आहोत. या वर्षाच्या आरंभीच्या काही महिन्यात आपल्या जीवनात आलेल्या या राक्षसाने मानवी समस्त मानव जातीला संकटात टाकले.
आणि या अनपेक्षित संकटाने संपूर्ण जगाला हादरा बसला. आरोग्याबाबत काळजी वाढली, नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले आणि प्रचंड उदासीनता निर्माण झाली. लोकांच्या शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थावरही त्याचा परिणाम झाला आहे.
नकारात्मकता,न्यूनगंड, भीती, चिंता, तणाव आदि गोष्टींनी मानवी मनाचा अचानक ताबा घेतला. आजही कोरोनाचे भय कायम आहे किंबहुना निराशाजनक मानसिकता बऱ्यापैकी तशीच आहे. परंतु आपण जरी परिस्थिती बदलू शकत नसलो तरी मनस्थिती बदलणे हे मात्र आपल्या हाती आहे.
नवरात्रीने आपल्याला नवा उत्साह दिला आहे.आणि आज दसऱ्याच्या दिनी आपल्याला या नकारात्मकतेवर विजय मिळवून खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी करायची आहे.
आजपासून निराशेवर मात करून आशा पल्लवित करणारी विजयादशमी. भूतकाळाच्या कटू अनुभवावर विजय मिळवून भविष्याच्या स्वप्नांना वाट मोकळी करून देणारी विजयादशमी.
नकारात्मकतेवर विजय मिळवून सकारात्मकतेकडे नेणारी विजयादशमी. बिघडलेल्या परिस्थितीवर विजय मिळवून उज्वल भविष्य घडविणारी विजयादशमी.
या विजयादशमीच्या निमित्ताने आपल्याला जीवनाच्या कुरुक्षेत्रावर आता सीमोल्लंघन करायचे आहे. भीती, नैराश्य, तणाव, न्यूनगंड, अपयश, बेकारी, चिंता,आळस,आरोग्याची काळजी आणि नकारात्मकता या मनातील दशमुखी रावणाचा वध करायचा आहे.
माझे खूप नुकसान झाले, तोटा झाला या गोष्टींना 'छोडो कल की बाते' म्हणत सोडून दिले पाहिजे. त्याचप्रमाणे आता पुढची काही वर्षे मंदीत जाणार मग माझे कसे काय होणार? ही भविष्याबाबतची अनावश्यक चिंताही आता मागे पडायला हवी. मी आज नव्या उमेदीने नव्या पर्वाची सुरुवात कशी करेल यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवे.
प्रसिद्ध अमेरिकन कार्टूनिस्ट बिल किन ने म्हटले आहे की,
Yesterday is history, tomorrow is a mystery, today is a gift of God, which is why we call it the present.
कालचा दिवस भूतकाळ होता उद्याचा दिवस म्हणजे गूढ असेल परंतु आजचा दिवस हा देवाची देणगी आहे. याच सुविचाराला प्रमाण मानून आपल्याला कोरोनानंतरच्या किंबहुना कोरोनामधील जीवनात भविष्याचा वेध घेऊन वर्तमानाला जिंकायचे आहे. कोरोनाचे भय, लॉकडाऊन, तोटा, नुकसान आणि मनस्ताप या भूतकाळाचे विस्मरण व्हायला हवे.वपु काळे म्हणतात, "'क्षण' असा उच्चार करेपर्यंत तो क्षण जुना झालेला असतो.भूतकाळ बनलेला असतो.
तो क्षण गेला ह्याचं दु:ख करण्यात पुढचाही क्षण निघून जातो.
आयुष्य संपत जातं.
इच्छेला वेळ नसते...पण....
वेळ ही थांबणारी गोष्ट नव्हे.."
घडलेल्या गोष्टीतुन बोध घेऊन नव्या संधीचा शोध घेण्याची हिच योग्य वेळ आहे.आणि ज्या कोणाला हे उमजेल तोच उद्याच्या यशाची बीजे पेरू शकणार आहे.
या विजयादशमीच्या निमित्ताने आपल्याला पुढील दहा गोष्टींवर आता लक्ष केंद्रित करायचे आहे.
* भूतकाळातील प्रतिकूल परिस्थितीला अनुभव समजून नव्या ध्येयाचे बीजारोपण करा.
* परिस्थिती कशीही असो मनस्थिती कायम सकारात्मक ठेवा.
* अडचणींचा विचार करून निराश होण्यापेक्षा संधीचे सोने करून आशावादी व्हा
* आरोग्याबाबत नेहमीच जागरूक रहा.निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी जे आवश्यक आहे ते सर्व करा.
* संकटाने किती नुकसान केले यापेक्षा भविष्याबाबत काय धडे दिले याबाबत सकारात्मक संवाद साधा
* इतरांनाही तुमच्या बोलण्यातून प्रेरणा द्या. खचलेल्या मनांना आशेची उभारी देण्याचा प्रयत्न करा.
* या प्रतिकूल परिस्थितीचाही तुम्ही धैर्याने, इच्छाशक्तीने सामना करू शकलात याबद्दल स्वतःलाच शाबासकी द्या. देवाचे,कुटुंबियांचे,गुरुजनांचे आभार माना.
* कामात,वर्तनात,संवादात नावीन्यता आणा. नव्या संधींसाठी नव्या उत्साहाने सज्ज व्हा.
* ध्येयाची आखणी करा त्यातही दूरगामी ध्येयाबाबत आग्रही रहा.
* केवळ आजचा विचार न करता उद्या उदभवणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगासाठी सज्ज रहा.
यंदा आपल्याला सीमोल्लंघन करायचे आहे. आपल्या विचारांनी आणि आचरणाने आपले जीवन समृद्ध करायचे आहे. आणि यासाठी आजच्या दिवसाइतका प्रेरणादायी आणि फलदायी दिवस दुसरा नाही. चला तर मग कोरोनारुपी रावणाने दिलेल्या संकटांवर मात करून खरी विजयादशमी साजरी करूया.
विजयादशमीच्या शुभेच्छा.
लेखन : सागर ननावरे