कुछ मीठा हो जाये...!
'डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवली तर सगळी कामे होतात' असं म्हटलं जातं.
मुळात क्रोध आणि अहंकार आपल्या स्वभावाच्या गणितातून वजा व्हावा हा त्यामागचा मूळ उद्देश. आणि हे गणित जमल्यास आयुष्याचं गणित बरोबर यायला वेळ लागत नाही हेही तितकंच खरं.
आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने डोक्यावर बर्फाच्या लाद्या आणि तोंडात साखरेची पोती घेऊन जो तो फिरताना नक्कीच दिसणार. "छोडो कल की बाते" असे म्हणत जुने वाद,वैर, हेवेदावे विसरून आज मनात जिव्हाळा पेरण्यासाठी जो तो सज्ज असणार.
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणून प्रेमाचा हलवासुद्धा मनामनात नक्कीच शिजणार. कारण नात्यांत स्नेहाचा गोडवा वाढविणारा हा मकर संक्रांतीचा सण प्रत्येकासाठी आनंदाचा आणि उत्साहाचा असतो.
खरं तर हा गोडवा केवळ मुखातून न दिसता एकमेकांच्या सुखांतून दिसून यायला हवा. आज प्रत्येकजण भौतिक सुखांच्या मॅरेथॉन मध्ये जीव प्राण एक करून धावत आहे. प्रत्येकाला पुढे जायचे आहे. प्रत्येकाला पैसे,संपत्तीची आणि सुख हवे आहे. अपेक्षेइतके मिळवून सुद्धा जो तो इथे उपाशीच आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या स्वार्थासाठी जो तो धावतच आहे. धावताना आपल्या मागून पुढे कोणी जात असल्यास पाय आडवा टाकून एकमेकांना पाडण्याचा प्रयत्नही होत आहे. ही मॅरेथॉन जिंकण्यासाठी गोड गोड बोलून खोड मोडण्याचाही डाव तेजीत चालला आहे. आपला फायदा होण्यासाठी जिभेवर साखरेचा गोडवा आणणारे काम होताच साखर जशी विरघळून जाते तसे गायब होतात. राजकारण,सेल्स,समाजकारण,आणि अनेक क्षेत्रांत अशा गुडी गुडी टॉक करणाऱ्या मधमाशा डंख मारून मध घेऊन पसार होत आहेत.
उदाहरण द्यायचेच झाल्यास अगदी संपत्तीचा ताबा मिळेपर्यंत आईबाबांना रोज गोड गोड खाऊ देणारे ताबा मिळाल्यावर मात्र खाण्यापिण्याचाही हिशोब काढतात. प्रत्येक नात्यांना याचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे सूर्य कोणत्या राशीत प्रवेश करतो काय आणि मकरसंक्रांत काय यांना याचे काहीही देणेघेणे नाही.
मुळात निस्वार्थी प्रेमाची देवाणघेवाण होण्यापेक्षा इप्सित साध्य होण्यासाठी ओढून ताणून मुखावर गोडवा आणला जात आहे हेही तितकेच सत्य. " मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार" अशी गदिंच्या रचनेप्रमाणे सध्या परिस्थिती आहे. आपली कामे करून घ्यायची असतील ना तर गोड बोललेच पाहिजे असा ट्रेंड सर्रास पाहायला मिळतो. "कामापुरता मामा" बनून गोड बोलून आपला स्वार्थ साधणाऱ्या संधीसाधू लोकांसाठी तर वर्षभर संक्रांतच असते. परंतु "ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाल्ला जात नाही " याचेही भान त्यांनी ठेवायला हवे. कारण एक ना एक दिवस पितळ उघडे पडल्यास तात्पुरत्या गोडव्याच्या जागी कायमचा कडवटपणा यायला वेळ लागत नाही. माणसाने आता आपली नैतिकता बदलायला हवी. आपली मानसिकता बदलायला हवी. प्रत्येक गोष्टींत स्वार्थ शोधण्यापेक्षा कधीतरी जीवनाचा अर्थही शोधायला हवा. औपचारिक आनंद वाटण्यापेक्षा दिलखुलासपणे आपलेपणाची भावना आपल्या कृतीतून व्यक्त व्हायला हवी.
गोडवा मुखाच्या दारात असण्यापेक्षा माणसाच्या उरात असण्याला जास्त महत्व आहे. आजही समाजात इतरांच्या सुखात आनंद वाटणारी माणसे शिल्लक आहेत म्हणून माणुसकीचा स्नेह अबाधित आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने
जुनी नाती समृद्ध करून, तुटलेली नाती आवर्जून पूर्ववत करण्याचा संकल्प यावर्षी करूया. मकर संक्रांतीला सूर्य आपली जागा बदलत असतो परंतु आपल्याला मात्र यादिनी इतरांना आपल्या हृदयात जागा द्यायची असते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. आपल्याला मात्र नात्यांचा स्नेह जपत इतरांच्या हृदयात आदराने प्रवेश करायचा आहे.
ज्याप्रमाणे उद्यापासून दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते. त्याचप्रमाणे आपल्यातील जिव्हाळा दिवसाप्रमाणे वाढत जावा आणि कटुता रात्रीप्रमाणे लहान होत जायला हवी. आकाशात उंच भरारी घेणाऱ्या प्रगतीच्या पतंगाचा धागा आपल्याला माणसे जोडून मजबूत करायचा आहे.
या मकर संक्रांतीला थोडा वेगळा विचार करूया. ओठांतील गोडवा पोटासाठी (स्वार्थासाठी) न आणता अंतरीचा स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी आणूया. चला तर मग
नात्यांतील स्नेह आणि जिव्हाळा वृद्धिंगत करण्यासाठी दिल से कुछ मीठा हो जाये." तुम्हा सर्वाना मकर संक्रांतीच्या स्नेहपूर्वक शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला
0 comments:
Post a Comment