चला आयपीएल जिंकू या...!
नुकताच आयपीएल (इंडियन प्रीमिअर लीग) चा थरार मुंबई आणि पुणे संघात झालेल्या अंतिम सामन्याने संपन्न झाला. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात या दीड पावणेदोन महिन्यांत क्रिकेटप्रेमींना मात्र अनेक थरारक लढतींची मनोरंजक जणू मेजवानीच मिळाली. आपल्या आवडत्या संघासाठी आणि खेळाडूंसाठी प्रत्येकाने आपल्या मनात एक खास जागाच करून ठेवली होती. या आयपीएल चा थरार काहींनी प्रत्यक्ष मैदानांत जाऊन अनुभवला तर अनेकांनी टीव्हीवरून याचा आनंद घेतला.
खरं तर अंतिम सामन्याच्या थरारानंतर सोशल मीडियावर पुणेकर आणि मुंबईकर फॅन्सने एकमेकांना धारेवर धरून हि आयपीएल जणू प्रतिष्ठेचीच करून टाकली होती. दोन्ही शहरातले क्रीडाप्रेमी एकमेकांवर तोंडसुख घ्यायची एकही संधी सोडत नव्हते. आणि यात या दोन्ही शहराबाहेरचे मात्र ‘पुणे असो व मुंबई "कप" तर महाराष्ट्रातच येणार’ असे म्हणून स्वतःच्या मनाची समजूत घालत होते.
या साऱ्या मैदानाबाहेरच्या तुफानी फटकेबाजीने मला लोकांची क्रिकेट आणि आयपीएल बद्दलची कमालीची तळमळ पाहायला मिळाली. आणि मग मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले की जर मनोरंजनासाठी किंवा आपल्या विभागाच्या समर्थनासाठी आपण आपल्यात इतका उत्साह आणू शकतो. जर हाच उत्साह आपण आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी किंवा स्वतःसाठी वापरात आणला तर याने आपला किती मोठा फायदा होईल?
आयपील आपण सर्वांनी एन्जॉय केलीच पण आता मैदानापलीकडची आणि आयुष्याच्या जवळची आयपीएल आपल्याला जिंकायची आहे.
ही IPL म्हणजेच
आय (I) - मी ( स्वतःसाठी वेळ देणे)
पी (P) - पॅरेंट्स ( स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ देणे )
एल (L) - लाईफ (लार्जर दॅन लाईफ जगणे)
ही आय पी एल आपल्याला एखादा कप नाही जिंकून देणार पण ही आयपीएल आपल्यातील आत्मविश्वासाला मात्र नक्कीच "वेकअप" करेल.
पहिल्या आय मध्ये आपण आपल्या स्वतः साठी वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे. कामाचा व्याप,तणाव,जबाबदाऱ्यांचे ओझे अशा एक ना अनेक गोष्टीची पूर्तता करण्याच्या नादाद आपण आपल्या स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करीत असतो. परिणामी अशक्त मानसिकता,ताणतणाव,मधुमेह,उच्च रक्तदाब,व्यसनाधीनता आणि इतर अनेक विकार आपल्याला जडत असतात. म्हणूनच आपल्याला
स्वतःसाठी वेळात वेळ काढून व्यायाम,वाचन,छंद जोपासणे आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या गोष्टींना आपण प्राधान्य द्यायला हवे. कारण आपला स्वविकास हाच उद्या आपल्याला यशाच्या शिखरावर नेणारा असतो.
यातील दुसरा पी पॅरेंट्सचा म्हणजेच यात आपले कुटुंबीय,आप्तस्वकीय,गुरुजनवर्ग आणि आपले हितचिंतक यांना वेळ देणे आणि त्यांचा आदर करणे. आजच्या धावपळीच्या जगण्यात आपण सर्वजण इतके पैशाच्या मागे धावतो की पैसे मिळतो पण सुख मिळत नाही. आणि हेच सुख मिळण्यासाठी आपण नेहमी आपल्या पॅरेंट्सला वेळ दिला पाहिजे. लवकर घरी जाणे,कुटुंबियांसोबत वेळ घालविणे, त्यांना घेऊन फिरायला जाणे हे व्हायला हवे . त्याचप्रमाणे आपल्या आप्तस्वकीयांच्या आवर्जून भेटीगाठी घेणे त्यांची विचारपूस करणे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे याकडेही आपले लक्ष हवे. त्याचबबरोबर आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे गुरुजन, ज्येष्ठ, थोर यांच्या सान्निध्यात वेळ घालवून त्यांच्याकडून नेहमी प्रेरणा घेतली पाहिजे.
यातले शेवटचे अक्षर म्हणजे एल लार्जेर दॅन लाईफ चा म्हणजेच आपल्याला मिळालेल्या आयुष्यापेक्षाही मोठी अचिव्हमेंट साध्य करणे. थोडक्यात काय तर आपली प्रगती इतकी उच्च असावी कि पुढील अनेक पिढ्यांत आपल्या प्रगतीची चर्चा व्हावी. आपल्या असामान्य कर्तृत्वाने आपला आदर्श नेहमी घेतला जावा अशी प्रतिमा आपल्याला तयार करता आली पाहिजे. आणि अशी लार्जर दॅन लाईफ जगण्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यात ध्येय ठरवावी लागतील आणि त्या ध्येयप्राप्तीसाठी आपल्याला स्वतःला वाहून घ्यावे लागेल. यासठी ठासून भरलेला आत्मविश्वास, अनोखी जिद्द, मेहनतीची तयारी आणि ध्येयाप्रती कमालीची एकाग्रता आपल्याला आपल्या नसानसात भरावी लागेल. एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून उदयास येण्यासाठी ज्या ज्या कौशल्यांची आणि क्षमतांची गरज असते अशा सर्व गोष्टी आपल्याला आपल्या अंगी बाणवाव्या लागतील.
मित्रांनो आयपील ची धामधूम संपली आहे आणि हीच योग्य वेळ आहे आपल्या आयुष्याच्या आयपीएल वर लक्ष केंद्रित करण्याची. आपले ध्येय त्या उंची षटकारासारखे हवे, आपल्या प्रत्येक उद्दिष्टाचा चौकार सीमेपार जायला हवा, वेगाने येणाऱ्या प्रत्येक संकटांचा सामना करून त्यांना टोलविण्याची ताकद आपल्याकडे हवी.
आपले प्रत्येक पाऊल योग्य हवे, आपल्या लक्ष्याच्या दिशेने आपली डिलिव्हरी पाहिजे, येणाऱ्या प्रत्येक संधीला आपल्याला झेलता आले पाहिजे आणि आपल्या प्रत्येक उद्दिष्टाचे (ओव्हर) चे आपल्याकडे नियोजन असायला हवे. मग बघा क्रिकेटची आयपील कोणीही जिंकू पण आपल्या आयुष्याच्या आयपीएलचे विजेते नेहमी तुम्हीच असणार. चला तर मग आयपीएल पाहू या सेटमॅक्स ची नाही "गोलसेट'' ची !
लेखक
सागर नवनाथ ननावरे