मार्चअखेर : आयुष्याचा ताळेबंद
मार्च महिना म्हटलं की संपूर्ण वर्षभरातील आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद आणि लेखाजोखा मांडण्याचा काळ. या मार्च महिन्यात कोणालाही फोन करायचा म्हटलं तरी प्रत्येकाचा एकच सबब ठरलेला असतो आणि तो म्हणजे "मार्च एंडिंग आहे ना!" .
आपण वर्षअखेरीस आर्थिक ताळेबंद सादर करण्यासाठी ज्याप्रमाणे धावपळ करतो अगदी त्याचप्रमाणे दरवर्षी आपण आपल्या आयुष्याचा ताळेबंद करतो का ? खरं तर हा प्रश्न थोडासा विचित्र जरी वाटत असला तरी त्यातील अर्थपूर्णता आपल्याला समृद्ध करणारी आहे.
सुखाचा गुणाकार करा
दुःखाचा भागाकार करा
ज्ञानाची बेरीज करा आणि
वाईट प्रवृत्तीची वजाबाकी करा
आणि मग बघा आयुष्याच्या गणित अगदी सुटसुटीत होऊन जाईल.
मार्च एंडिंग च्या निमित्ताने जर आपण आपल्या आर्थिक ताळेबंदासोबत जर आयुष्याच्या ताळेबंदाचेही योग्य मोजमाप केल्यास आपल्या प्रगतीचा आलेख नक्कीच उंचावत जाईल.
"वर्षभरात ओंजळीत आले ते सोने आणि ओघळून गेले ते मातीत मिळाले" हा दृष्टिकोन अंगी बाणवून आपण पुढे मार्गाक्रमण केले पाहिजे. जुन्या कटू आठवणी,जुने वाईट अनुभव यामध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्यापेक्षा त्यातून एक नवा अनुभव घेऊन नव्या प्रभातीकडे लक्ष केंद्रित करायला हवे.
बऱ्याचदा आपण अगदी सहजपणे बोलून जातो की "माझ्या आयुष्याचं गणितच चुकलं" परंतु गणित का चुकलं याचा आपण विचार करत नाही. मुळात गणित चुकलेलंच नसते, चुकलेली असतात ती त्या आयुष्यातल्या गणिताची चिन्हे. कोणत्या वेळी कोणत्या चिन्हांचा वापर करावा याची गफलत झाल्याने हा सारा दोषांचा पाढा आपल्याला वाचावा लागतो. आयुष्यातल्या विविध अनुभवांत बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार हि चिन्हे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वापरल्यास उत्तर अगदी आपल्या मनासारखे येते.
आयुष्याच्या गणितात आत्मविश्वास, मेहनत,चांगली माणसे, ज्ञानार्जनाची साधने, उमेद, जोश, कल्पकता आणि चिकाटी यांची आपल्याला योग्य बेरीज करता आली पाहिजे. निराशा, वाईट प्रवृत्ती, नकारात्मकता, न्यूनगंड,भीती आणि ताणतणाव यांची वजाबाकी आपण हेतुपूर्वक करायला हवी.
तसेच सकारात्मकता, सामाजिक बांधिलकी, आर्थिक सुबत्तता, कौटुंबिक सलोखा, निरोगी स्वास्थ्य, संधी आणि मानसिक स्थैर्य यांचा गुणाकार आपल्याला अवगत असायला हवा.
दुःख, कटू अनुभव,आळस आणि चालढकलपणा यांचा वेळेप्रमाणे भागाकार करता आला पाहिजे.
सर्वांत महत्वाचे म्हणजे आयुष्याच्या गणितातील ताळेबंदात अपेक्षा, गृहितता, परावलंबन आणि रिस्क यांना कधीच हातचा समजू नये किंबहुना त्यांची जागा शक्यतो कंसातच ठेवावी.
खरं तर या मोजमापासाठी कोण्याही मोजपट्टीची, तराजूची किंवा फुटपट्टीची गरज भासत नाही यासाठी आपल्याकडे प्रगल्भतेचा आणि कृतिप्रधानतेचा तल्लख मेंदूरूपी कॅल्क्युलेटर असावा लागतो.
गेल्या वर्षात आयुष्याच्या ताळेबंदात आपण काय कमावले (credit) आणि काय गमावले(debit) याचा पारदर्शक लेखाजोखा (अकौंटिंग) आपल्याला ज्ञात असावा.
हा आयुष्याचा ताळेबंद करताना तो केवळ आपल्या मनाच्या समाधानासाठी नसावा तर आपल्या भविष्याला समृद्ध करण्याच्या हेतूने केलेला असावा.
मित्रांनो मार्च एंडिंग सुरु आहे चला तर मग आपल्या आयुष्याचा ताळेबंद अधिकाधिक सुस्पष्ट आणि पारदर्शक कसा होईल याचा विचार करूया. कारण "खर्च झाल्याच दु:ख नसतं परंतु हिशोब लागला नाही की त्रास होतो..!" अशी म्हणण्याची वेळ आपल्यावर यायला नको एवढीच अपेक्षा.
लेखक: सागर ननावरे