Monday, 6 February 2017

मुलांना कोषमुक्त जीवन जगू द्या

                         मुलांना कोषमुक्त जीवन जगू द्या

‘अवघे विश्वची माझे घर ‘असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. पण आज आपल्या मुलांपलीकडे दुसरे जगच नाही असे समजणाऱ्या पालकांकडे पहिले की वाईट वाटते. आपला परिवार म्हणजेच आपलं जग आणि घरातील माणसे म्हणजेच अवघा समाज अशी शिकवण नकळतच मुलांवर बिंबवली जात आहे.
शाळेवर छात्रशिक्षक म्हणून काम करताना एकदा सात दिवसांसाठी एका शिबिरासाठी आम्ही निघालो होतो. पहाटे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी आणि त्यांना निरोप देण्यासाठी आलेले पालक असा एक घोळका जमला होता. कोणी आई आपल्या मुलाचे वारंवार पापे घेत होती तर कोणी रडत होती, नीट राहा ,जेवण करा, काळजी घ्या… असे शब्द सतत कानावर पडत होते. काही पालक तर ‘मुलांशी फोनवर बोलू द्या’ म्हणून आयोजकांपाशी हट्ट धरत होते.
अशी ही सारी परिस्थिती पाहिल्यावर मनात विचार आले कशी घडणार ही मुले आणि कधी जगणार कोषाबाहेरचं जीवन. त्यांना बाहेरच जग अनुभवता यावं, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांना शेअरिंग म्हणजे काय हे कळावं आणि अनुभवसमृद्धीत वाढ व्हावी हा या विविध शिबिरांमागचा उद्देश असतो. बाहेरच्या गर्दीत मुलाचे संस्कार हरवू नयेत म्हणून आपण त्यांना जर हाताला धरून ठेवले तर कशी कळणार त्यांना सामाजिकता आणि कधी येणार परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता.
मुलांबाबत प्रेम असणे, काळजी वाटण साहजिक आहे पण असे त्यांना आपल्या विश्वात डांबून आपण अतिरेकाने त्याचं बालपण तर हिरावून घेत नाही ना? याचा प्रत्येक पालकाने विचार करणे गरजेचे आहे. या अशा वागण्याने आजकालच्या मुलांना उन्हाळ्याची सुटी आणि मामाचे गाव अशा संकल्पनांचा विसर पडत चालला आहे. या घरकोंबडी वृत्तीमुळे मुलांच्या सूरपारंब्या, कबड्डी, खो खो, आट्यापाट्या आणि विविध शारीरिक हालचालींची जागा आज मोबइल आणि कॉम्पुटर गेम्सने घेतली आहे. पोहणे, धडपडत सायकल शिकणे, धावण्याची स्पर्धा, गच्चीवरचा पत्त्यांचा डाव आणि रात्री बिछाने पसरून चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत झोपी जाणे या बालपणीच्या सुखाला आजची पिढी पारखी झाली आहे.
पैशाच्या स्पर्धेत धावताना आपण आपल्या मुलांच्या संगोपनावर किती दुर्लक्ष करतो, याची जाणीव आपल्याला व्हायला हवी,यासाठी पालकांनी पुढाकार घ्यायला हवा. मुलांच्या निकोप वाढीसाठी पालकांनी त्यांच्यावर लादलेली जीवनपद्धती आणि घातलेले सुरक्षाकवच त्यांना मारक ठरणार नाही, याची पालकांनी काळजी घ्यायला हवी.
मुलांच्या बाह्य व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध शिबिरांबरोबरच आंतरिक विकास आणि व्यक्ती घडवण्यावर भर देणारे कार्यक्रम,चित्रपट, नाट्य,आणि विविध प्रोग्रॅमसाठी पालकांनी स्वतः मुलांसोबत हजेरी लावली पाहिजे. जाणीवपूर्वक बाहेरच्या कार्यक्रमांना एकटे पाठवून बाह्य जगाचा परिचय त्यांना करायला दिला पाहिजे. यातूनच मुलांची वेगवेगळ्या विचारप्रवाहांशी ओळख होऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व परिपक्व व्हायला मदत होईल.
आज संपर्काची इतकी साधनं उपलब्ध असताना कोणतीही भीती पालकांनी बाळगू नये उलट यामुळे मुलं स्मार्ट होतात, हे लक्षात घ्यावं. स्मार्टनेस म्हणजे फक्त ब्रॅंडेड वस्तू, कपडे किंव इंग्रजी बोलणे नाही. स्मार्टनेस म्हणजे आत्मविश्वास, निर्णयक्षमता, व्यवहारिकता. मुळात मुलांना चुका करण्याची संधीच आपण दिली तरचं त्यांचे निर्णयकौशल्य वाढेल. या सर्वातून मुलं इतकी तावून सुलाखून निघतील की उद्या मोठं झाल्यावर, जगताना, व्यवसाय करताना ज्या अडचणी आणि आव्हानं समोर येतील त्याला तोंड देण्यासाठी मुलं सदैव तयार असतील .
थोडक्‍यात पालकांनी मुलांवर लक्ष जरूर ठेवावं मात्र आयुष्याच्या रणांगणात कधीतरी मोकळ सोडावं.
या संदर्भात पालकांसाठी खालील ओळी आवर्जून सुचवाव्याशा वाटतात ,
‘मुलांसाठी असू द्या मायेची उब
अन भावभावनांचा पसारा
पण उद्याच्या भविष्यासाठी
खुला राहू द्या विश्व सारा’



लेखक : सागर ननावरे 

(सदर लेख मे महिन्यातील प्रभात वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला आहे)  

0 comments:

Post a Comment

 
;