Saturday, 31 December 2016 0 comments

२०१७ नया है यह.. नवनवे संकल्प


*२०१७ नया है यह...!*

पाहता पाहता २०१६ या वर्षाने कधी निरोप घेतला हे समजलेही नाही. नव्या वर्षाची अनाहूत ओढ मात्र आता प्रत्येकाच्या मनात घर करून बसली. तसे पाहता नवे वर्ष म्हणजे भूतकाळातील अनुभवांतून भविष्यकाळात काहीतरी अनोखे आणि संस्मरणीय करण्याचा एक नवे पर्वच म्हणावे लागेल.

केशवसुतांनी आपल्या 'तुतारी' या कवितेतून या नव्या वर्षाला आणि नव्या पर्वाला अतिशय मार्मिकपणे साद घातली आहे,

*"जुने जाऊ द्या मरणालागुनि*

*जाळूनी किंवा पुरुनी टाका*

*सडत न एका ठायी ठाका*

*सावध ऐका पुढल्या हाका*

*खांद्यास चला खांदा भिडवूनी"*

केशवसुतांनी जुन्या गोष्टींना कवटाळून न बसता काळाचे भान ठेवून सर्वांनी नवे विचार, नवा ध्यास आत्मसात करण्याचा मूलमंत्र दिला आहे. आणि हाच मूलमंत्र मनाशी धरून आपल्याला नवीन वर्षात *"तिमिरातुनी तेजाकडे"* जाण्याचा मार्ग शोधायचा आहे.

या नव्या वर्षात आपण सर्वजण नवनवे संकल्प मनात निश्चित करीत असतो. परंतु *"नव्याचे नऊ दिवस"*  या म्हणीप्रमाणे काही दिवसानंतर हळूहळू त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. पळवाटांचा आणि कारणांचा आधार घेऊन आपण  केवळ आपल्या संकल्पानांचं नाही तर अप्रत्यक्षपणे आपल्या ध्येयाला बगल देत असतो.

चला तर मग या संकल्पांच्या पूर्ततेसाठी थोडेसे जाणून घेऊ या.

* संकल्प मोजकेच हवेत :*
अनेकदा आपण संकल्पांची भलीमोठी यादी बनवितो परंतु त्यातील एखादाच प्रत्यक्षात आणतो. संकल्प अगदी दोन चार असले तरी चालतील परंतु ते निश्चित असायला हवेत. उदा. डायटिंग करणे, व्यायाम करणे, तेलकट तिखट न खाणे,रोज चालायला जाणे अशी अनावश्यक मोठी यादी बनविण्यापेक्षा "वर्षात १० किलो वजन कमी करणे" हा संकल्प घेऊन इतर गोष्टी उद्दिष्ट्ये म्हणून त्याअंतर्गत घ्यावीत.

* संकल्प अभ्यासपूर्ण असावेत:*
केवळ इतरांनीं केला किंवा मला याची नितांत गरज आहे म्हणून अनुकरणात्मक संकल्प नसावा. त्या संकल्पातून होणारे फायदे-तोटे,लागणारा कालावधी, अपेक्षित खर्च,आवश्यक सहकार्य आणि फलनिष्पत्ती या साऱ्या गोष्टींचा विचार त्यात असावा.

उदा. 'नव्या वर्षात एखादा नवीन व्यवसाय सुरु करायचा" इतपत विचार न करता त्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल, जागा, मनुष्यबळ, संभाव्य धोके,अपेक्षित उत्पन्न आणि बाजारातील संधी या साऱ्या गोष्टींचे कागदावर नियोजन हवे. तसेच त्यासाठीचा कालावधी निश्चित असावा. संकल्प अभ्यासपूर्ण नसल्यास त्याची पूर्तता होण्याची शक्यता आजिबात नसते.

* संकल्प नजरेसमोर असावा:*
आपला संकल्प भिंतीवर किंवा संकल्पाशी संबंधित ठिकाणी मोठ्या अक्षराने कागदावर लिहून चिटकवावा. "लॉ ऑफ अट्रॅक्शन" नुसार एखादी गोष्ट आपण सतत ध्येय म्हणून आपल्या नजरेसमोर ठेवल्याने आपण त्यादृष्टीने कृती करतो व ती झटपट साध्यही होते.

उदा. "परीक्षेत पहिला नंबर मिळवणे" हा संकल्प असेल तर तो कागदावर लिहून पुस्तकांच्या कपाटावर किंवा भिंतीवर चिटकवावा.

* वचनबद्ध रहा:* आपण स्वत:च्या मनाशी जो निश्चय करतो तोच सफल होतो. आपण आपल्या संकल्पप्रति कमालीचे वचनबद्ध राहायला हवे. मनाशी ठाम निश्चय करून आणि हा संकल्प आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकतो याला प्रमाण मानून संकल्प तडीस न्यायला हवा. 

उदा. जर आपल्याला एखाद्या गोष्टीवर अनावश्यक होणार खर्च कमी करायचा असेल तर त्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जाणीवपूर्वक त्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. 

* सकारात्मकतेने पहा:*
आपल्या संकल्पाकडे सकारात्मकतेने पाहायला हवे. अनेकदा आपल्या संकल्पाची लोक खिल्ली उडवतात आणि "केवळ लोक काय म्हणतील?" म्हणून आपण संकल्प अर्ध्यावर सोडत असतो. 
म्हणूनच आपण आपल्या संकल्पाकडे एक निर्धार म्हणून सकारात्मकतेने पाहायचे असते.

उदा: नृत्य शिकण्याचा निर्णय एखाद्या लठ्ठ व्यक्तीने घेतल्यास "तू काय नाचणार? अशा उपहासात्मक टीकांना मनावर न घेता, त्याने शरीराची हालचाल होऊन लठ्ठपणा कमी होऊन नृत्यात नैपुण्यही मिळेल असा सकारात्मक आत्मविश्वास आपण मनाशी बाळगायला हवा.

मित्रांनो  दैनंदिनी लिहिणे,रोज जॉगिंग करणे, नियमित व्यायाम करणे, नित्यनेमाने वाचन करणे, दररोज सकाळी लवकर उठणे, डायटिंग करणे,कुटुंबासाठी वेळ देणे,समाजकार्य करणे,इ संकल्प आपण बनवतोच मनाच्या तात्पुरत्या समाधानासाठी आणि नंतर तोडण्यासाठी. तेरड्याच्या तीन दिवसांच्या रंगाप्रमाणेच काही दिवसांत संकल्पांचा विसर पडत जातो आणि आपण पुन्हा नव्या वर्षाची वाट पाहत बसतो. परंतु या चालढकल करण्याच्या आणि संकल्प अर्धवट वाऱ्यावर सोडण्याच्या नादात आपण आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ वाया घालवत असतो.

प्रत्येक नवे वर्ष आपल्यासाठी नव्या उमेदीने जगण्याची एक संधी घेऊन येत असते आणि याच संधीचे आपल्याला सोने करायचे असते.

 चला तर मग

*छोडो कल कि बाते कल की  बात पुराणी*

*नये दौर मी लिखेंगे मिलकर नयी कहाणी......*

असे म्हणून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि नव्या संकल्पांच्या पुर्ततेसाठी जोशाने सज्ज होऊ या.
*सर्वांना नव्या वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा...!*

 लेखन: सागर नवनाथ ननावरे
सौजन्य : दैनिक प्रभात
www.Sagarnanaware.blogspot.in

Monday, 12 December 2016 0 comments

4G पाहिजे ? ....... आयुष्याच्या 4G बद्दल

4G पाहिजे ? 
आयुष्याच्या 4G  बद्दल प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा लेख 

दर रविवारी प्रभात वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या माझ्या लेखमालेतील रविवार ४ डिसेंबर चा लेख 

सागर ननावरे 
sagarnanaware.blogspot.in

 
;