दुष्काळ जिव्हाळ्याचा
प्रश्न व्हावा
अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या भयंकर झळा सोसत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तर अत्यंत बिकट परिस्थिती पाहायला मिळत
आहे. त्यातही अनेक
संस्था, संघटना,शासन
आणि
पक्षांचे पदाधिकारी या लोकांना मदतीचा ओघ म्हणून विविध उपक्रमही राबवत आहेत हि नक्कीच आनंददायी बाब आहे. परंतु
हा सारा मदतीचा ओघ केवळ प्रसिद्धीसाठी किंवा
दिखाऊ न करता
यात सामाजिक बांधिलकीचा विचार होणे गरजेचे आहे. दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर सोशल
मिडिया आणि विविध
वृत्तपत्रांतून समाजसेवेचे दाखले केवळ सामाजिक प्रतिष्ठेपायी आणि राजकीय स्वार्थासाठी देणे योग्य नाही.
हा मदतीचा ओघ त्यांना तात्पुरता दिलासा देऊ शकतो परंतु त्यानंतर काय? आणि किती
दिवस देणगीदारांच्या आशेवर जगायचं? हा खरा प्रश्न आहे. दुष्काळ ग्रस्तांना मदतीसोबतच रोजीरोटी आणि पोटापाण्यासाठी विविध संधी
उपलब्ध करून देण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने विविध स्तरांतून प्रयत्न होणे
गरजेचे आहे. भाकरी देऊन एकवेळची भूक भागाविण्यापेक्षा भाकरी बनविण्याची संधी देऊन उपासमार रोखणे केंव्हाही चांगलेच. आपत्कालीन परिस्थितीत विविध गावे,
कुटुंबे, पाळीव पशु दत्तक घेऊन दुष्काळावर मात
करण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण करणे गरजेचे आहे. असहिष्णुता,विरोध,राजकारण,आयपीएल या मुद्द्यांपेक्षा दुष्काळासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे नाहीतर उद्या
पाण्यावरून दंगल व्हायला वेळ लागणार नाही.