Thursday, 30 October 2014 0 comments
'पंच 'अन्यायाचा’
आशियाई क्रीडा स्पर्धेतील वादग्रस्त कृतीबद्दल भारताची बॉक्सर सरिता देवी हिच्यावर आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने अनिश्चित काळापर्यंत बंदी घातली आणि मनात तीव्र अन्यायाविरोधी भावना निर्माण झाली.या निर्णयामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला सरिता  मुकणार तर आहेच पण तिच्या उज्वल भविष्याला यामुळे पायबंद बसण्याचा धोकाही आहेच. भारताच्या नावलौकिकात मनाचा तुरा रोवणाऱ्या एका जिद्दी महिलेवर निष्पक्षपातीपणे निर्णय देऊन अन्याय होतो आणि आपले भारतीय पदाधिकारी याबाबत काहीही बोलत नाहीत हि मोठी शोकांतिका आहे. ब्राँझपदक विजेत्या सरिताने पुष्पगुच्छ स्वीकारला, पण ब्राँझपदक स्वीकारण्यास नकार दिला आणि आपले पदक तिने रौप्यपदक विजेत्या पार्क कडे दिले हाच काय तो गुन्हा. तिची ही कृती योग्य की अयोग्य हा चर्चेचा भाग झाला. पण अन्यायाने परिसीमा गाठली की त्याला प्रत्युत्तर देण्याची भावना बळावत जाते आणि तिनेही तेच केले मग काय चुकले त्यात तिचे. हे सारे भावनेच्या भरात घडले तिच्याहातून तर ती दोषी आणि जाणीवपूर्वक पंचानी चुकीचा निर्णय दिला हे योग्य हा कुठला न्याय. त्या वेळेस भारतीय संघटनेने शेपूट घालून साधा अपील सुद्धा नोंदवला नव्हता ,अपीलसाठी ५०० $ सुद्धा सरिताला जमवावे लागले  आणि आता भारतीय संघटना सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहे.मंगोलियन खेळाडू हरतो, त्या वेळी त्यांचे पदाधिकारी त्याच्यासाठी लढतात; पण सरिताची बाजू मांडायला एकही भारतीय पदाधिकारी तेथे नव्हता. पदक हिरावून घेतल्याचा ठोसा बसल्याचे तिला दुःख नाही; त्या ठोशाने झालेली जखम भळभळत राहणार आहे, याच्या यातना जास्त आहेत. आता भारतीय संघटनेने  आंतराष्ट्रीय संघटनेला जाब विचारायलाच हवा . सारीतादेवी ने माफी मागून खिलाडूवृत्ती दाखवली आहे त्याचप्रमाणे भारतीय संघटनेनेसुद्धा याविरोधात दखल घेतली पाहिजे. हा लढा फक्त एकट्या सारीतादेवीचा नाही तर तमाम उदयोन्मुख महिला खेळाडूंच्या भविष्याचा आहे आणि याची दखल आपण सर्व क्रीडाप्रेमी भारतीयांनी घेतली  पाहिजे.

-सागर नवनाथ ननावरे
भोर,पुणे
भ्रमणध्वनी ; 7276829977 
 
;