विधानसभा निवडणुकीचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. राज्यातच नव्हे तर देशात महाराष्ट्राच्या विधानसभेत कोण बाजी मारते यांची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजतील आणि प्रत्यक्षात नोव्हेंबरमध्ये मतदान होईल, अशी चिन्हे आहेत. त्यातही नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्या आठवड्यात राज्यातील विधानसभा निवडणुका २ टप्प्यात होतील, असे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना संकेत दिले आहेत. त्यानुसार राज्यात १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान विधानसभा निवडणुका लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
राज्याच्या १४ व्या महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे. तत्पूर्वी राज्यात विधानसभा निवडणुका घेऊन नवीन सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. आणि त्यामुळेच राजकीय क्षेत्रात जोरदार हालचालींना वेग आला आहे. यातही स्थानिक स्तरावर इच्छुकांनी फ्लेक्सबाजी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तिकिटासाठी चर्चेत येण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. यात अगदी आजी माजी आमदार त्यांचे कुटुंबीय आणि पदाधिकाऱ्यांसह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक , ते अगदी त्यांचे पीए देखील इच्छुक आहेत. विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीला इच्छुकांची भाऊगर्दी असतेच परंतु यंदा याचे प्रमाण मोठे आहे. यासाठी मागील पाच वर्षांत राज्यात घडलेल्या अनेक अनपेक्षित राजकीय घडामोडी याला कारणीभूत आहेत.
राजकीय भूकंप ही संधी : यंदा इच्छुकांच्या भाऊगर्दीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण आणि त्यानंतर निर्माण झालेले गटतट . शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडल्यानंतर दोनाचे चार पक्ष उदयास आले आणि साहजिकच त्यामुळे इच्छुकांच्या अपेक्षांना धुमारे फुटले. अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यात निवडणूक लढविण्याची भावना निर्माण झाली. अशी संधी पुन्हा येईल की नाही याची शास्वती नसल्याने वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी चांगलीच चढाओढ निर्माण झाली आहे.
कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस : गेली अनेक वर्षे केवळ वरिष्ठ नेते आणि त्यांच्या घरातच तिकिटे मिळणार हे फिक्स असायचे. त्यामुळे तिकिटासाठी इच्छा असूनही सहसा कुणी जास्त जोर लावायचे नाही. मात्र ज्या कार्यकर्ते फक्त अडगळीत पडलेले होते. किंवा नेत्यांच्या सतरंज्या उचलणारे , मागेपुढे घिरट्या घालणारे कार्यकर्ते म्हणून ज्यांना हिणवले जात होते त्यांच्यादेखील आशा पल्लवित झाल्या आहेत. पक्षाची पदे, सहकार संस्था, सरपंच,नगरसेवक, जिल्हा परिषद - पंचायत समिती साठी इच्छुक असणारे कार्यकर्त्यांनाही आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे यंदा कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आल्याचे वातावरण सद्या तरी दिसत आहे.
निष्ठा आणि चळवळीचे भांडवल : एकीकडे राजकीय फुटीनंतर सत्ताधाऱ्यांसोबत गेलेले आम्ही चळवळ केली, क्रांती घडवून आणली याचे भांडवल करून तिकिटासाही आग्रही असल्याचे दिसत आहेत. तसेच सत्तेत राहून लोकांची कामे कशी गतीने होत आहेत याचे दाखले देत आहेत. तर दुसरीकडे आम्ही सत्तेसाठी इकडेतिकडे उड्या न मारता कसे नेते आणि पक्षाशी निष्ठावंत आहोत याचा प्रचार करत आहेत. थोडक्यात काय तर सगळीकडेच आपण कसे योग्य आहोत हे दाखवून तिकिटे मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवार नेत्यांवर दबावतंत्र वापरताना दिसत आहेत.
जागा तेवढ्याच चढाओढ वाढली : विधानसभेसाठी २८८ हा एकदा जरी फिक्स असला तरी पक्ष आणि गटतट वाढल्याने इच्छुकांची गर्दी वाढली आहे . प्रत्येक मतदार संघात एकमेकांविरोधात उभे राहून पर्याय निर्माण करणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली आहे . यापूर्वी एकमेकांना सहकार्य करून साटेलोटे करणारे आता इर्षेने एकमेकांविरोधात उभे राहण्यासाठी सज्ज झाले आहेत.
एकूणच वरील काही करणे लक्षात घेता. पूर्वी पारावर किंवा चौकात बसणारी पुढारी मंडळी आता भावी आमदार म्हणून फ्लेक्स वर झळकू लागली आहेत. परंतु या चढाओढीत वरिष्ठांची माने आणि विश्वास संपादन करण्यात कोण यशस्वी होणार हे तर येणारा काळच सांगेल. तूर्तास फ्लेक्सवरचे भावी आमदार म्हणून समाधान मानण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही.
सागर ननावरे, पुणे
प्रख्यात स्तंभलेखक
देशभरात नुकताच ७८ वा स्वातंत्र्यदिन जल्लोषात पार पडला. ब्रिटिशांच्या गुलामीतून मिळालेले स्वातंत्र्य हा तमाम देशवासियांसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. मात्र ७८ वर्षे उलटल्यावरही खरंच प्रत्येक घटकाला स्वातंत्र्य मिळाले आहे का हा संशोधनाचा विषय आहे. त्यातही देशाच्या प्रगतीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देणाऱ्या देशातील महिलांना खरंच सुरक्षित आणि स्वतंत्र वाटतं का हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. देशात सातत्याने वाढणाऱ्या बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना महिलांच्या स्वातंत्र्यावर एकप्रकारे घाला घालत आहेत.
नुकतीच कोलकत्यात घडलेली बलात्काराची घटना , बदलापूरमधील चिमुरडीवरील अत्याचाराची घटना हेच अधोरेखित करतात की लहान असो किंवा मोठी , कोणतीही महिला आज सुरक्षित नाही. स्वतंत्र भारतात आजही महिलांना त्यांचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे. महिला घराबाहेरही आणि घरातही असुरक्षितच आहेत. त्यांच्यावरील लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे.
परवा बसमधून प्रवास करत असताना तरुण मुलांचे एक टोळके बसमध्ये शिरले. त्यांच्यात मोठ्याने गप्पा- गोष्टी , हसणे खिदळणे चालले होते. त्यांच्या संवादातील एक वाक्य माझ्या कानावर पडले जे अनपेक्षित होते. त्यातील एकजण बोलला , 'इथे एखादी सुंदर मुलगी असती तर सगळ्यांचा प्रवास चांगला झाला असता.' मी त्यांच्याकडे मागे वळून पहिले परंतु अपराधी पणाचा कसलाही भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. देशाचे भविष्य समजले जाणारे असे तरुण आणि एखादा महिलांवर अत्याचार करणारा आरोपी यांच्यात मला काहीही फरक जाणवत नव्हता. त्या बसमध्ये बसलेले इतर प्रवासी आणि विशेषतः महिला देखील यावर व्यक्त झाल्या नाहीत याची खंत मला जाणवली. आणि आपण स्वतःही यावर काही बोललॊ नाही याचे शल्य काहीवेळाने बोचत राहिले. तिथेच समजले की आजचा पुरुषी समाज महिलांकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन बाळगतो ते.
निर्भया प्रकरण, मणिपूर प्रकरण , आताचे कोलकाता हत्याकांड आणि दररोज वाढणारे महिला अत्याचार या भारतमातेच्या , माता भगिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. स्त्रियांचे स्वातंत्र्य म्हणजे फक्त कपडे निवडण्याचे स्वातंत्र्य, अभ्यासाचे स्वातंत्र्य किंवा करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य इथपर्यंतच मर्यादित राहिले आहे. मुक्तपणे संचाराचे स्वातंत्र्य आजही तिच्या वाट्याला आले नाही ही या विकसनशील देशासाठी मोठी शोकांतिका आहे.
तसे पाहता स्वतंत्र भारतातही अजूनही महिला पूर्णपणे स्वतंत्र झालेल्या नाहीत. आजही महिलांना त्यांच्या आवडीचे शिक्षण किंवा नोकरी निवडण्यापूर्वी प्रथम त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संमती घ्यावी लागते. समजा, एखाद्या मुलीला ऍडव्हेंचर सारख्या क्षेत्रात जायचे असेल, तर प्रथम तिला तिच्या घरच्यांना पटवून देण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. यात त्या पालकांचाही दोष नाही. तिच्या कुटुंबीयांच्या मनात ती घराबाहेर सुरक्षित राहील का ? अशी भीती सतत सतावत असते. अलीकडच्या काळात ज्या प्रकारे महिलांवरील लैंगिक अत्याचाराची प्रकरणे वाढली आहेत त्यामुळे ही भीती अधिक दृढ झाली आहे. आणि त्यातही तिलाआचारस्वातंत्र्य देत घरच्यांनी परवानगी दिली तरी समाज तिच्याबाबत शंकाकुशंका व्यक्त करतो. जोपर्यंत स्त्री स्वतःचे नाव आणि प्रतिष्ठा निर्माण करत नाही तोपर्यंत तिला समाजात स्वीकारले जात नाही. अशी इतर अनेक क्षेत्रे आणि अनेक गोष्टी आहेत ज्यात जाण्यापूर्वी तिला खूप विचार करावा लागतो. मग हे असे असताना आपण तिलाही स्वातंत्र्य मिळाले आहे असे कसे बरं म्हणू शकतो .
महिलांवरील लैंगिक अत्याचार हल्लीचेंच नाहीत तर फार पूर्वीपासून सुरू आहेत. परंतु गेल्या दोन दशकांत त्यात झालेली वाढ चिंताजनक आहे. यासाठी सरकारने कितीही कायदे केले तरी ते प्रत्येक गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा प्रत्येक महिलेच्या वेदना जाणून घेऊ शकत नाही. त्यासाठी समाजाला पुढे येऊन ही समाज व्यवस्थाच बदलावी लागणार आहे. जोपर्यंत स्त्रियांकडे माणूस म्हणून पाहिले जात नाही तोपर्यंत हे थांबू शकत नाही. तिला मुक्तपणे जगण्याचे, आचार, विचार आणि संचाराचे स्वातंत्र्य देणे ही प्राथमिक गरज आहे. आणि यासाठी एक बाप, भाऊ, नवरा, मित्र म्हणून आपल्याला ही जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागणार आहे. तिच्या भयमुक्त जगण्यासाठी सामाजिक प्रबोधन करून एक क्रांती घडवावी लागणार आहे.
लेखक : सागर न. ननावरे, पुणे
लेखक
www.sagarnanaware.blogspot.com
नक्कीच 🙏🏻
विद्येचे माहेरघर त्यानंतर आयटी हब मेट्रो सिटी स्मार्ट सिटी अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या राजकारणाला देशाच्या राजकारणात विशेष महत्त्व आहे.
सांस्कृतिक शैक्षणिक शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्याने पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय शहर म्हणून देखील आघाडी घेतलेली आहे पुण्यातील राजकीय घडामोडींची नेहमीच चर्चा होत असते. आता चर्चा आहे ती उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीची. लोकसभा निवडणुकीचा काउंट डाऊन एव्हाना सुरू झाला आहे. 18 व्या लोकसभेसाठी राजकीय पक्ष सज्ज झालेले आहेत. लोकसभा निवडणुकीचे पडघम सर्वत्र वाजू लागले आहेत. पुण्यात देखील गल्लोगल्ली राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. तसे पाहता पुणे लोकसभा मतदारसंघ हा राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणारा पुणे लोकसभा मतदारसंघ भाजपने ताब्यात घेतला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने पुण्याच्या राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडू लागल्या.
लोकसभा निवडणुकीतील पुणे मतदासंघाचा इतिहास हा महत्वपूर्ण राहिलेला आहे.
पुणे मतदारसंघ हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 1952 पासून आजतागायत तब्बल 10 वेळा खासदार निवडून आणण्यात काँग्रेस पक्षाला यश आले आहे. तर 1991 मध्ये भाजपने काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान दिलं. आणि या मतदारसंघातून अण्णा जोशी हे भाजपचे पहिलेच खासदार म्हणून निवडून आले. परंतु 1996 साली माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावरून खासदार झाले. त्यानंतर अनेक वर्षे सुरेश कलमाडी यांचे या मतदारसंघावर विशेष वर्चस्व होते. परंतु 2014 मध्ये देशभरात आलेल्या मोदी लाटेने काँग्रेसच्या सिंहासनाला सुरुंग लावला. आणि तिथूनच पुणे शहरात भारतीय जनता पार्टी ची पाळेमुळे अधिक घट्ट रोवली गेली. 2014 च्या मोदी लाटेत अनिल शिरोळे यांनी तर त्यानंतर गिरीश बापट यांनी हा गड लढवला आणि जिंकला देखील.पुणे लोकसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर पुण्यात भाजपची ताकद निश्चितच वाढली आहे. दोन्ही लोकसभा निवडणुका,त्यानंतरच्या विधानसभा निवडणुका आणि महानगरपालिका निवडणुकीत देखील भाजपने बाजी मारली आहे.
यंदाची लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतरची पहिलीच लोकसभा निवडणूक असल्याने याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे साहजिकच पुण्यातील लढत ही तितकीच उत्कंठावर्धक आणि चुरशीची होणार यात शंका नाही.
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर राजकीय समीकरणे बदलली आहेत. यंदा पुणे लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडी आणि महायुतीत होणार असली तरी, पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसमध्येच होणार असल्याचे सध्या तरी चित्र आहे.
यात वंचित बहुजन आघाडी आणि मनसेसारख्या पक्षांच्या भूमिकेलाही विशेष महत्व असणार आहे. पुण्याच्या 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ज्या मताधिक्याने काँग्रेसचा पराभव केला आहे ते पाहता भाजपचा एकछत्री अंमल चालू झाल्याचे बोलले जात होते. परंतु पुण्यातील मतदारांनी वेळोवेळी आपला कल बदलल्याचे दिसून आले आहे. याचाच परिणाम म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पुण्यातील दोन विधानसभेच्या जागांवर पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपचा बालेकिल्ल्यातच पराभव करून कार्यकर्त्यांच्या आशा वाढवल्या आहेत. परंतु भाजपची पुणे लोकसभा मतदारसंघावर असलेली पकड ही तितकीच मजबूत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यात झालेली बंडखोरी निश्चितच मतदारांवर प्रभाव टाकणारी आहे. आणि त्यामुळेच मतदारांचा कल कोणाकडे आहे यावरच या दोन्ही राजकीय पक्षांची गणिते अवलंबून असणार आहेत. पूर्वीपासूनच शिवसेनेचे पुण्यामध्ये म्हणावे तेवढे वर्चस्व नसल्याने त्यांचा या निवडणुकीत किती परिणाम होईल हे सांगता येणार नाही. परंतु पुणे शहर आणि उपनगरांमध्ये विशेष ताकद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटी नंतर मात्र राजकीय अंदाज बांधणे हे कठीण होऊन बसले आहे.
पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करणाऱ्या काँग्रेसच्या आशा वाढलेल्या होत्या. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाची साथ मिळाल्याने पुन्हा एकदा भाजप भक्कम स्थितीत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
कोणत्या पक्षाच्या वतीने कोणता उमेदवार दिला जातो यावर देखील पुणे लोकसभा मतदारसंघाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
शेवटी राजकीय भूकंप, सहानुभूती आणि बदललेली गणिते यांचा सर्वसामान्य मतदारांवर झालेला प्रभाव हाच या निवडणुकीत निर्णायक ठरणार हे मात्र नक्की.
✍🏻-सागर ननावरे, पुणे
Sagar N Nanaware's bio:
(Sagar Navnath Nanaware)
About Sagar N Nanaware
Renowned youth writer, journalist, and political strategist from Pune, India. Author of the inspirational book "Manacha Antivirus", available online at (link unavailable).
Literary and Journalistic Achievements
- *Columnist*: Wrote a weekly column on personality development for Prabhat every Sunday for 9 consecutive years.
- *Published Articles*: Over 1000 articles published in leading Maharashtra newspapers on personality development, politics, and current affairs over the last 12 years.
- *Emerging Writer*: Honored by Loksatta newspaper in 2008 as an emerging writer.
- *Interviews*: Conducted direct interviews with notable personalities, including Sadhanatai Amte, wife of Baba Amte, in Anandavan in 2008.
- *Poetry*: Started writing poetry in 2005 and has since penned over 500 poems.
- *Published Poems*: More than 250 poems and articles published in various Diwali issues.
Political Strategy and Journalism
- *Political Strategist*: Effective work for candidates in Lok Sabha and Maharashtra Legislative Assembly elections in 2024.
- *Founding Editor*: Served as the founding editor of Swarajya News, a local news portal and channel, for 5 years.
- *Journalistic Experience*: Worked in a high position in a renowned journalist organization in the country.
- *Advocacy*: Visited the Ministry and gave statements for the benefit of journalists during the Corona period.
Creative Projects
- *Story Writing and Screenplay*: Contributed to an upcoming well-known Hindi web series.
- *Shiva Mangalashtika*: Honored to write the country's first Shiva Mangalashtika.
Online Presence
Read Sagar's articles and poetry on his blog at (link unavailable)
Follow Sagar's journey and explore his inspirational book "Manacha Antivirus"!
डेल कार्नेगी यांचे प्रतिष्ठित पुस्तक “हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएंस पीपल” हे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करू इच्छिणाऱ्या लोकांच्या अनेक पिढ्यांसाठी उपयुक्त ठरले आहे.
तुमच्या आयुष्यातील लोकांशी अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करण्यात आणि एक प्रभावशाली आणि आदरणीय व्यक्ती बनण्यास मदत करणारे एक उत्तम पुस्तक. पुस्तकाच्या पानांमध्ये समाविष्ट असलेले शहाणपण आणि सल्ला तुम्हाला अधिक मित्र बनविण्यात आणि अधिक लोकांवर प्रभाव पाडण्यास नक्कीच मदत करेल.
या पुस्तकातील 7 धडे आहेत जे तुम्हाला मित्र बनविण्यात आणि तुमच्या जीवनातील लोकांवर प्रभाव टाकण्यास मदत करू शकतात:
Subscribe to:
Posts (Atom)